गोमेकॉत उपचार सुरू : अन्य एक महिला कर्मचारी जखमी
वाळपई : होंडा औद्योगिक वसाहतीत कार्यरत असलेल्या गोवा बागायतदारच्या पॅकिंग सेंटरमध्ये काम करणाऱ्या एका महिलेच्या हाताला जबर दुखापत झाल्याने तिला गोवा मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आले. तर, अन्य एक कर्मचारी दिया गावस हिला साखळी सरकारी सामाजिक रुग्णालयात प्राथमिक उपचार करून घरी पाठविण्यात आले. सदर घटना शनिवारी संध्याकाळच्या सत्रात घडली.
शिवानी नीलेश गावस (रा. तळेखोल महाराष्ट्र) येथील महिला गोवा बागायतदार या संस्थेच्या होंडा औद्योगिक वसाहतीमध्ये कार्यरत असलेल्या पॅकिंग कारखान्यांमध्ये काम करीत होती. ४ वाजण्याच्या सुमारास अचानकपणे तिचा हात पॅकिंग करणाऱ्या मशीनमध्ये अडकल्याने तिच्या हाताला मोठी जखम झाली. त्याच ठिकाणी काम करणारी अन्य कर्मचारी दिया गावस हिलाही काही प्रमाणात मार बसला. दोघांनाही ताबडतोब साखळी सरकारी सामाजिक रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. दरम्यान, शिवानी गावस तिच्या हाताला जास्त मार बसल्यामुळे प्राथमिक उपचारानंतर तिला गोवा मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आले. रात्री उशिरापर्यंत तिच्या हातावर शस्त्रक्रिया करण्याचे प्रक्रिया सुरू होती. तर दिया गावस हिच्यावर प्राथमिक उपचार करून तिला घरी पाठवण्यात आले.
शिवानी गावस ही गेल्या काही महिन्यांपासून सदर ठिकाणी काम करीत होती. अनावधानाने तिचा हात मशीनमध्ये अडल्यामुळे तिला मार बसला. यामुळे अन्य कर्मचाऱ्यांत खळबळ निर्माण झाली.
दरम्यान, याबाबतची माहिती स्थानिक पोलीस यंत्रणेला देण्यात आल्यानंतर अधिकाऱ्यांनी ताबडतोब घटनास्थळी धाव घेऊन घटनेचा पंचनामा केला. निरीक्षक विदेश शिरोडकर यांच्या मार्गदर्शनाखाली इतर कर्मचारी अधिक तपास करीत आहेत.
शिवानीची प्रकृती स्थिर
गोवा बागायतदार आस्थापनाच्या सूत्रांकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, शिवानी गावस यांची प्रकृती स्थिर असून कोणत्याही प्रकारचा धोका नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. तिच्यावर उपचार सुरू असून गोवा बागायतदार संस्थेतर्फे तिची पूर्णपणे काळजी घेण्यात येईल, असे सूत्रांनी स्पष्ट केले आहे.