७ लाखांचे सोन्याचे दागिने, एक लाखांची रोकड लंपास
पेडणे : वळपे-विर्नोडा येथील नीलेश प्रभाकर आरोंदेकर यांच्या राहत्या घरात झालेल्या घरफोडीत सुमारे ७ लाख रुपयांचे सोन्याचे दागिने व १ लाख रुपयांची रोकड असा एकूण ८ लाख रुपयांचा ऐवज चोरीला गेला आहे. ही घटना ६ ऑक्टोबर रोजी घडली असून ८ ऑक्टोबर रोजी पेडणे पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली आहे.
तक्रारदार नीलेश आरोंदेकर यांच्या कुटुंबात पत्नी आणि मुलगा असे तिघे राहतात. ६ ऑक्टोबरच्या सकाळी पती-पत्नी नोकरी व व्यवसायानिमित्त बाहेर गेले होते, तर मुलगा कॉलेजला गेला होता. दुपारी कॉलेजमधून परतल्यावर मुलाला घराचा दरवाजा उघडा दिसला. संशय आल्याने त्याने त्वरित आई-वडिलांना फोन करून माहिती दिली. यानंतर आरोंदेकर दांपत्य घरी आले असता त्यांनी पाहिले की कपाटातील सोन्याचे मंगळसूत्र, बांगड्या, कानातील डूल, गळ्यातील साखळी तसेच कपाटात ठेवलेली एक लाख रुपयांची रोकड चोरीस गेली आहे.
घटनेची माहिती मिळताच पेडणे पोलिसांनी ठसेतज्ञ व श्वानपथकाला घटनास्थळी पाचारण केले. श्वानाने घरापासून सुमारे ७० मीटर अंतरावर असलेल्या सर्विस रोडपर्यंत मार्ग दाखवला.
पेडणे पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे.
घरावर पाळत ठेऊन चोरी केल्याचा संशय
प्राथमिक चौकशीनुसार, चोराने घरातील सदस्यांवर पूर्वीपासून पाळत ठेवून ही चोरी केली असावी, असा पोलिसांचा अंदाज आहे. तसेच अलीकडेच म्हापसात झालेल्या दरोडा प्रकरणातील चोरट्यांचा या चोरीशी संबंध असल्याची शक्यता स्थानिकांतून व्यक्त केली जात आहे.