सां जुझे द आरियाल येथे कारवाई : टॅब, राऊटर, मोडेमसह ४.४० लाख रोख जप्त
मडगाव : सां जुझे द आरियाल येथील नेसाय गेटनजीक एका बंदिस्त जागेत सुरू असलेल्या ऑनलाईन जुगारावर मायना कुडतरी पोलिसांनी छापा टाकला. छाप्यात २० संशयितांना अटक केली. तसेच ४.४० लाखांची रोख रक्कम, ४ टॅब, एक राऊटर व एक मोडेम जप्त करण्यात आला. संशयितांची जामिनावर मुक्तता करण्यात आली आहे.
नेसाय गेटनजीक एका बंदिस्त जागेत जुगार सुरू असल्याची माहिती मायना कुडतरी पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार, पोलिसांनी रविवारी पहाटे ३.२५ वाजता सदर घटनास्थळी छापा टाकला. घटनास्थळावर जुगार खेळण्यासाठी आलेल्या २० जणांना ताब्यात घेत अटकेची कारवाई केली. यात संशयित रत्नाकर केळवेकर (रा. मुगाळी), सचिन सिंग (रा. रुमडामळ हाऊसिंग बोर्ड), इरफान ब्यादगी (रा. सां जुझे दी अरीयाल, मूळ कर्नाटक), दिनीझ मिरांडा (रा. कोट्टा, दवर्ली), सिलजॉन फर्नांडिस (रा. सुरावली), मोहम्मद अजमत हुसेन (रा. नावेली), डेंझिल डायस (रा. कोलवा), रॉनी मोराईस (रा. आके), हनुमंत लमाणी (रा. झरीवाडा, दवर्ली), परसप्पा लमाणी (रा. गदग, कर्नाटक), आशिष इर्लेकर (रा. फातोर्डा), अभिषेक चौबे (रा. बोर्डा), मोहम्मद इम्रान सनगर (रा. दवर्ली), इस्माईल बेपारी (रा. दवर्ली), फिरोझ धारवाडकर (रा. बेतूल), अँजेलो डिसोझा (रा. फोंडा), सिकंदर लिंबूवाले (रा. मोतीडोंगर), सरवार बाशा गुट्टल (रा. नेसाय), श्रावण कुमार (रा. बोर्डा) व देवेंद्र सबरसे (रा. रुमडामळ) यांना जुगार खेळताना रंगेहाथ अटक केली.
संशयितांची जामिनावर मुक्तता
मायना कुडतरी पोलिसांनी या जुगार अड्ड्यावरुन ४.४० लाखांची रोख रक्कम, चार टॅब, एक मोडेम, एक राऊटर असा मुद्देमाल जप्त केला. अटक करण्यात आलेल्या सर्व संशयितांची मागाहून जामिनावर मुक्तता करण्यात आली. याप्रकरणी मायना कुडतरी पोलीस उपनिरीक्षक गौरव नाईक पुढील तपास करीत आहेत.