आयकर विभागाची कारवाई
पणजी : आयकर खात्याच्या गोवा विभागाने करचुकवेगिरीच्या संशयावरून बुधवारी पहाटेपासून सांतोन-सावर्डे येथील लोह उत्पादन कंपनीवर छापा सुरू केला होता. तो गुरुवारी रात्री उशीरापर्यंत सुरू होता. याशिवाय विभागाने कोलवा तसेच जुने गोवा येथे कंपनीच्या मालकाच्या तसेच अधिकाऱ्यांच्या घरावर छापे टाकले.
सांतोन-सावर्डे येथील लोह उत्पादन कंपनीच्या एका मालकाच्या कोलवा येथील बंगल्यावर बुधवार, ८ रोजी पहाटे आयकर अधिकाऱ्यांनी प्रथम छापा टाकला. याच दरम्यान आयकर अधिकाऱ्यांनी कंपनीत छापासत्र सुरू केले. त्यानंतर बुधवारी दुपारीच कोलवातील बंगल्यावरची कारवाई पूर्ण झाली. त्यावेळी आयकर अधिकाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात दस्तावेज, लेखा नोंदी आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणे जप्त केली. याच दरम्यान बुधवारी मध्यरात्री आयकर अधिकाऱ्यांनी जुने गोवा येथील इमारतीच्या एका फ्लॅटवर छापा टाकला. ही कारवाई गुरुवारी सकाळी संपली होती. दरम्यान, कंपनीच्या वरील फॅक्टरीतील तपास गुरुवार ९ रोजी रात्री उशिरापर्यंत सुरू होता. या कंपनीशी संबंधित इतर मालकांच्या दिल्ली, हैदराबाद व इतर राज्यांतील ठिकाणांवरही आयकर विभागाने एकाच वेळी छापा टाकला.