दूधसागर पर्यटन हंगामाला ऑफलाईन पद्धतीने सुरुवात

तात्पुरता तोडगा; ऑनलाईन बुकिंग स्थगित

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
11th October, 12:19 am
दूधसागर पर्यटन हंगामाला ऑफलाईन पद्धतीने सुरुवात

धारबांदोडा : दूधसागर टूर ऑपरेटर असोसिएशनची अधिकृत वेबसाईट परत मिळेपर्यंत दूधसागर पर्यटन हंगाम ऑनलाईन पद्धतीने सुरू होऊ देणार नाही, असा ठाम निर्णय कुळे येथील दूधसागर टूर ऑपरेटर असोसिएशनने घेतला होता. अखेर या वादावर तात्पुरता तोडगा निघाल्यानंतर शुक्रवार, १० ऑक्टोबरपासून ऑफलाईन पद्धतीने दूधसागर धबधबा पर्यटन हंगामाला अधिकृत सुरुवात करण्यात आली.

२ ऑक्टोबर रोजी दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर विनय तेंडुलकर व बालाजी गावस यांच्या उपस्थितीत या हंगामाची अनौपचारिक सुरुवात झाली होती. त्यानंतर वन खात्याने गुरुवारी घोषणा केली होती की, शुक्रवारपासून ऑनलाईन बुकिंग प्रणालीद्वारे दूधसागर पर्यटन हंगाम सुरू करण्यात येईल. मात्र, दूधसागर टूर ऑपरेटर असोसिएशनने यावर तीव्र आक्षेप घेतला. त्यांच्या वेबसाईटसंबंधीचा प्रश्न सुटेपर्यंत कोणत्याही परिस्थितीत हंगाम ऑनलाईन सुरू होऊ देणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली.

यावेळी गोवा पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापक दीपक नार्वेकर, गॅवीन डायस, धारबांदोडा पंचायतीचे सरपंच विनायक गावस, वन खात्याचे राऊंड फॉरेस्टर आनंद बावकर, अनुपमा जाधव, विलास देसाई, मच्छिंद्र देसाई, दूधसागर टूर ऑपरेटर असोसिएशनचे अध्यक्ष नीलेश वेळीप, इतर पदाधिकारी व जीप मालक उपस्थित होते.

जीप मालकांचे पैसे असोसिएशन आकारणार

या तात्पुरत्या तोडग्यानुसार, पर्यटकांचे बुकिंग ऑफलाइन पद्धतीने करण्यात येणार असून, फाटक उघडून जीप गाड्यांना प्रवेश देण्यात आला. जीप मालकांचे पैसे असोसिएशनकडून आकारले जातील. त्याचबरोबर गोवा पर्यटन विकास महामंडळ, गोवा वन विकास महामंडळ आणि वन खात्याचे शुल्क वन खात्याच्या गेटवर शासनाकडून आकारले जाणार आहे. हा तोडगा पुढील निर्णय होईपर्यंत कायम राहणार आहे.