कौटुंबिक समस्यांमुळे जीवन संपवणाऱ्यांचे प्रमाण सर्वाधिक

एका वर्षात ५ टक्क्यांनी वाढ : एनसीआरबी अहवालातून माहिती

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
19 hours ago
कौटुंबिक समस्यांमुळे जीवन संपवणाऱ्यांचे प्रमाण सर्वाधिक

पणजी : मागील काही वर्षांत राज्यात आत्महत्यांचे प्रमाण वाढले आहे. कौटुंबिक समस्यांमुळे आत्महत्या करणाऱ्यांचे प्रमाण सर्वाधिक आहे. राज्यात २०२२ मध्ये एकूण ३०२ आत्महत्यांची नोंद झाली होती. यातील ६३ आत्महत्या (२०.८६ टक्के) या कौटुंबिक समस्यांमुळे झाल्या होत्या. २०२३ मध्ये एकूण ३२७ पैकी ८६ आत्महत्या (२६.२९ टक्के) या कौटुंबिक समस्यांमुळे झाल्या होत्या. कौटुंबिक समस्यांमुळे होणाऱ्या आत्महत्यांचे प्रमाण एका वर्षात ५.४३ टक्क्यांनी वाढ झाली.

राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाच्या (एनसीआरबी) ‘भारतातील अपघाती मृत्यू आणि आत्महत्या २०२३’ या अहवालांतून ही माहिती मिळाली आहे.

एनसीआरबी अहवालानुसार, दोन्ही वर्षी कौटुंबिक समस्यांनंतर आत्महत्येचे दुसरे प्रमुख कारण मानसिक अथवा शारीरिक आजार हे होते. २०२२ मध्ये एकूण ८१ (२६.८२ टक्के) आजारी व्यक्तींनी आत्महत्या केली होती. २०२३ मध्ये ८६ आजारी व्यक्तींनी आपले जीवन संपवले. यानंतर अमली पदार्थ अथवा मद्यपानाचे व्यसन असल्याने आत्महत्या करण्याचे प्रमाण अधिक होते. २०२२ मध्ये ३१ (१०.२६ टक्के) तर २०२३ मध्ये २९ (८.८६ टक्के) व्यसनाधीन व्यक्तींनी आत्महत्या केली होती. २०२२ मध्ये प्रेम प्रकरणांतून २७ जणांनी आत्महत्या केली. २०२३ मध्ये देखील २७ जणांनी याच कारणास्तव आत्महत्या केल्याचे अहवालात म्हटले आहे.

काही प्रकरणांत आत्महत्येचे नेमके कारण स्पष्ट होत नाही. २०२२ मध्ये २५ तर २०२३ मध्ये ३७ जणांनी आत्महत्या कशासाठी केली याची माहिती मिळू शकली नाही. २०२२ मध्ये कर्जबाजारीपणामुळे १८ जणांनी आत्महत्या केली होती. २०२३ मध्ये ही संख्या कमी होऊन १० झाली. २०२२ मध्ये नोकरी, व्यवसाय नसल्याने १४ जणांनी तर २०२३ मध्ये १२ जणांनी आत्महत्या केली. २०२२ मध्ये गरिबीमुळे एका व्यक्तीने तर २०२३ मध्ये ४ जणांनी आत्महत्या केली. २०२२ मध्ये परीक्षेत यश न आल्याने ४ विद्यार्थ्यांनी आत्महत्या तर २०२३ मध्ये या कारणामुळे एकही आत्महत्या झाली नाही.

पुरुषांचे प्रमाण अधिक

राज्यात २०२२ च्या तुलनेत २०२३ मध्ये आत्महत्यांचे प्रमाण ८.२ टक्क्यांनी वाढले होते. २०२२ मध्ये एकूण ३०२ व्यक्तींनी आत्महत्या केली. २०२३ मध्ये ३२७ जणांनी आत्महत्या केली. २०२२ मध्ये २३२ पुरुष व ७० महिला व २०२३ मध्ये २४९ पुरुष व ७८ महिलांनी आत्महत्या केली होती.