अडीच दिवसांतच विंडिजचा खेळ खल्लास!

भारताचा वेस्ट इंडिजवर १ डाव, १४० धावांनी दमदार विजय

Story: न्यूज डेस्क । गोवन वार्ता |
04th October, 11:57 pm
अडीच दिवसांतच विंडिजचा खेळ खल्लास!

अहमदाबाद : येथील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये झालेला भारत आणि वेस्टइंडिज यांच्यातील पहिला कसोटी सामना भारतीय संघाने १ डाव आणि १४० धावांनी केवळ अडीच दिवसांत जिंकला.
या सामन्यात वेस्टइंडिजचा पहिला डाव अवघ्या १६२ धावांवर आटोपला. या धावांच्या प्रत्तुत्तरात भारतीय संघाने ४४८ धावांचा डोंगर उभारून पहिला डाव घोषित केला. दुसऱ्या डावात फलंदाजीसाठी आलेल्या वेस्टइंडिजचा डाव अवघ्या १४६ धावांवर आटोपला. यासह भारतीय संघाने हा सामना १ डाव आणि १४० धावांनी आपल्या नावावर केला.
या सामन्यात वेस्टइंडिजने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पण हा निर्णय पूर्णपणे फसला. कारण वेस्टइंडिजचा पहिला डाव अवघ्या १६२ धावांवर आटोपला. वेस्टइंडिजच्या एकही फलंदाजाला अर्धशतकी खेळी करता आली नाही. भारतीय संघाकडून गोलंदाजी करताना मोहम्मद सिराजने सर्वाधिक ४, जसप्रीत बुमराहने ३, कुलदीप यादवने २ आणि वॉशिंग्टन सुंदरने १ गडी बाद केला.
भारतीय संघाने उभारला ४४८ धावांचा डोंगरवेस्टइंडिजचा पहिला डाव स्वस्तात आटोपल्यानंतर भारतीय संघाला पहिल्याच दिवशी फलंदाजीला येण्याची संधी मिळाली. भारतीय संघाकडून सलामीला आलेल्या यशस्वी जैस्वालने ३६ धावांची खेळी केली. तर केएल राहुलने दमदार शतक झळाकावले. साई सुदर्शन अवघ्या ७ धावा करत माघारी परतला. तर कर्णधार शुबमन गिलने ५० धावांची खेळी केली. शेवटी ध्रुव जुरेल आणि रवींद्र जडेजाने मिळून महत्त्वपूर्ण भागीदारी केली. ध्रुव जुरेलने १२५ खेळी केली. तर रवींद्र जडेजा १०४ धावांवर नाबाद राहिला. भारतीय संघाने पहिला डाव ५ गडी बाद ४४८ धावांवर घोषित केला.
भारतीय संघाने पहिल्या डावात मोठी आघाडी घेतली. दुसऱ्या डावात फलंदाजीला आलेल्या वेस्टइंडिजला हवी तशी कामगिरी करता आलेली नाही. वेस्टइंडिजकडून अथेंजने सर्वाधिक ३८ धावांची खेळी केली. दुसऱ्या डावातही भारतीय गोलंदाजांचा बोलबाला पाहायला मिळाला. दुसऱ्या डावात गोलंदाजी करताना रवींद्र जडेजाने सर्वाधिक ४ गडी बाद केले. तर मोहम्मद सिराजने ३, कुलदीप यादवने २ आणि वॉशिंग्टन सुंदरने १ गडी बाद केला. यासह हा सामना १ डाव १४० धावांनी आपल्या नावावर केला. यासह २ सामन्यांच्या मालिकेत १-० ने आघाडी घेतली आहे.
रवींद्र जडेजाची शानदार कामगिरी
अहमदाबाद कसोटी सामन्यात जडेजाने अप्रतिम खेळाचे प्रदर्शन केले. दुसऱ्या दिवशी त्याने फलंदाजीत शानदार शतक झळकावले, ज्यामुळे भारतीय डावाला मजबूत पाया मिळाला. त्यानंतर, वेस्ट इंडिजच्या दुसऱ्या डावात त्याने गोलंदाजीतही कमाल दाखवली आणि ५४ धावांत ४ महत्त्वपूर्ण बळी घेतले. त्याच्या या अष्टपैलू योगदानामुळे भारताच्या विजयाचा मार्ग सुकर झाला.
जडेजाचा ऐतिहासिक पराक्रम
टीम इंडियाचा स्टार अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाने वेस्ट इंडिजविरुद्ध अहमदाबाद येथे झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात शानदार कामगिरी करत नवा ऐतिहासिक विक्रम आपल्या नावावर केला आहे. जडेजाच्या अष्टपैलू कामगिरीमुळे त्याला ‘प्लेयर ऑफ द मॅच’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या पुरस्कारासह त्याने भारतात कसोटी सामन्यांमध्ये सर्वाधिक वेळा ‘प्लेयर ऑफ द मॅच’ पुरस्कार जिंकणारा खेळाडू बनण्याचा मान मिळवला.
रवींद्र जडेजाने हा पुरस्कार जिंकत भारताचा दिग्गज फिरकीपटू अनिल कुंबळेचा विक्रम मोडला. कुंबळेने ६३ कसोटी सामन्यांमध्ये ९ वेळा हा पुरस्कार जिंकला होता. मात्र, जडेजाने अवघ्या ५० कसोटी सामन्यांमध्ये १० वेळा हा पुरस्कार मिळवत आपली सातत्यपूर्ण आणि सामन्याचा निकाल बदलणारी क्षमता दाखवून दिली. या कामगिरीमुळे तो भारतातील सर्वात प्रभावी खेळाडूंपैकी एक ठरला आहे. भारतीय संघाचा पीसीटी वाढला
वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यापूर्वी भारतीय संघ डब्ल्यूटीसी २०२५-२७ गुणतक्त्यात तिसऱ्या स्थानावर होता आणि या विजयानंतरही तो तिसऱ्याच स्थानावर कायम आहे. मात्र, या विजयामुळे भारताचा पीसीटी (पॉइंट्स परसेंटेज) ४६.६७ वरून ५५.५६ पर्यंत वाढला आहे. भारतीय संघाने आतापर्यंत एकूण ६ कसोटी सामने खेळले असून, त्यापैकी ३ सामने जिंकले, २ गमावले, तर १ सामना अनिर्णित राहिला.
गुणतक्त्यात ऑस्ट्रेलिया अव्वल
डब्ल्यूटीसी २०२५-२७ गुणतक्त्यात ऑस्ट्रेलिया संघ पहिल्या क्रमांकावर आहे. ऑस्ट्रेलियाने आतापर्यंत खेळलेल्या ३ सामन्यांपैकी सर्वच सामने जिंकले असून, त्यांचा पीसीटी १००.०० आहे. दुसऱ्या स्थानावर श्रीलंका संघ आहे. श्रीलंकेने २ सामने खेळले असून, त्यापैकी १ जिंकला आणि १ सामना अनिर्णित राहिला. त्यांचा पीसीटी ६६.६७ आहे. भारत तिसऱ्या स्थानी कायम आहे.
सचिनचा विक्रम अजूनही अबाधित
भारतासाठी कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक ‘प्लेयर ऑफ द मॅच’ पुरस्कार जिंकण्याचा विक्रम अजूनही सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे. त्याने 200 कसोटी सामन्यांमध्ये 14 वेळा हा पुरस्कार मिळवला आहे. यादीत पुढील क्रमांकावर राहुल द्रविड आणि रवींद्र जडेजा यांचा समावेश आहे, ज्यांनी अनुक्रमे 163 आणि 86 टेस्ट सामन्यांमध्ये 11 वेळा हा पुरस्कार जिंकला आहे.
भारतात सर्वाधिक ‘प्लेयर ऑफ द मॅच’ जिंकणारे भारतीय
रवींद्र जडेजा : १० पुरस्कार, ५० सामने
अनिल कुंबळे : ९ पुरस्कार, ६३ सामने
विराट कोहली : ८ पुरस्कार, ५५ सामने
सचिन तेंडुलकर : ८ पुरस्कार, ९४ सामने
रविचंद्रन अश्विन : ७ पुरस्कार, ६५ सामने
भारतासाठी ‘प्लेयर ऑफ द मॅच’ पुरस्कार जिंकणारे खेळाडू
सचिन तेंडुलकर : १४ पुरस्कार, २०० सामने
राहुल द्रविड : ११ पुरस्कार, १६३ सामने
रवींद्र जडेजा : ११ पुरस्कार, ८६ सामने
आर. अश्विन : १० पुरस्कार, १०६ सामने
विराट कोहली : १० पुरस्कार, १२३ सामने
संक्षिप्त धाव फलक :
वेस्ट इंडिज : (पहिला डाव) सर्वबाद १६२, (दुसरा डाव) सर्वबाद १४६
भारत : पहिला डाव ५ बाद ४४८ (घोषित)