ऑस्ट्रेलियाचा पाकिस्तानवर १०७ धावांनी दणदणीत विजय

महिला विश्वचषक : बेथ मुनीचे शतक, किम गार्थचे तीन बळी

Story: न्यूज डेस्क । गोवन वार्ता |
09th October, 12:19 am
ऑस्ट्रेलियाचा पाकिस्तानवर १०७ धावांनी दणदणीत विजय

कोलंबो : आयसीसी महिला वनडे वर्ल्ड कप २०२५च्या नवव्या सामन्यात ऑस्ट्रेलिया महिला संघाने पाकिस्तानचा १०७ धावांनी पराभव करून दुसरा विजय नोंदवला. कोलंबोच्या आर. प्रेमदासा स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करत ५० षटकांत ९ बाद २२१ धावा केल्या.
ऑस्ट्रेलियाकडून विकेटकीपर-बॅटर बेथ मुनीने शानदार शतक झळकावत १०९ धावा (११४ चेंडू, ११ चौकार) केल्या. तिच्या सोबत अलाना किंगने नाबाद ५१ धावा करून संघाचा डाव सावरला.
पाकिस्तानकडून नाश्रा संधूने तीन गडी बाद केले, तर रमीन शमीमने दोन बळी घेतले. पाकिस्तानच्या गोलंदाजांनी सुरुवातीला चांगली कामगिरी करत ७६ धावांवर ऑस्ट्रेलियाचे सात फलंदाज बाद केले होते, पण मूनी आणि किम गार्थ यांनी ३९ धावांची भागीदारी करत डाव स्थिरावला.
२२२ धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या पाकिस्तानचा डाव मात्र सुरुवातीपासूनच कोसळला. फक्त ३२ धावांवर अर्धा संघ माघारी परतला. अखेर ३६.३ षटकांत संपूर्ण संघ केवळ ११४ धावांवर गारद झाला.
पाकिस्तानकडून सिद्रा अमीनने ३५ धावा (५२ चेंडू, ५ चौकार) करत थोडा प्रतिकार केला, तर रमीन शमीमने १५ धावा केल्या. बाकीच्या फलंदाजांना ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांचा सामना करता आला नाही.
ऑस्ट्रेलियाकडून किम गार्थने तीन विकेट्स घेत पाकिस्तानचा डाव उद्ध्वस्त केला. तिच्या साथीला मेगन शट आणि एनाबेल सदरलँड यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. या विजयासह एलिसा हीलीच्या नेतृत्वाखालील ऑस्ट्रेलिया संघाने स्पर्धेत आपला विजयरथ कायम ठेवला, तर फातिमा सनाच्या नेतृत्वाखालील पाकिस्तान संघाला दुसरा पराभव पत्करावा लागला.
सर्वाधिक एकदिवसीय विजय (एकाही पराभवाशिवाय)
१८ विजय - न्यूझीलंड विरुद्ध आयर्लंड
१७ विजय - ऑस्ट्रेलिया विरुद्ध आयर्लंड
१७ विजय - ऑस्ट्रेलिया (विरुद्ध आयर्लंड
१५ विजय - आयर्लंड विरुद्ध आयर्लंड
१३ विजय - इंग्लंड विरुद्ध आयर्लंड
आज भारताचा सामना द. आफ्रिकाशी
आयसीसी महिला वनडे वर्ल्ड कप २०२५ स्पर्धेतील दहावा सामना यजमान टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात रंगणार आहे. दोन्ही संघांचा हा या मोहिमेतील तिसरा सामना असेल. भारतीय महिला संघाचे नेतृत्व हरमनप्रीत कौर करणार आहे, तर लॉरा वोल्वार्ड्ट दक्षिण आफ्रिकेच्या महिला संघाची कर्णधार म्हणून मैदानात उतरणार आहे. दोन्ही संघांनी आतापर्यंत उत्कृष्ट कामगिरी केली असून, हा सामना रोमांचक होण्याची शक्यता आहे. भारताने या आधी श्रीलंका आणि पाकिस्तानला मात दिली आहे. तर दक्षिण आफ्रिकेने इंग्लंड विरुद्ध पराभव तर न्यूझीलंड विरुद्ध विजय मिळवला आहे. हा सामना डॉ. वाय. एस. राजशेखर रेड्डी एसीए-वीडीसीए क्रिकेट स्टेडियम, विशाखापट्टणम येथे पार पडणार आहे.

आजचा सामना
भारत वि. द​क्षिण आफ्रिका

स्थळ : डॉ. एसीए-वीडीसीए स्टेडियम, विशाखापट्टणम
वेळ: दुपारी ३ वा.
प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स नेटवर्क, जिओ हॉटस्टार