महिला विश्वचषक : टाझमिन ब्रिट्सची शतकी खेळी
इंदूर : आयसीसी महिला विश्वचषक २०२५ मधील सामन्यात दक्षिण आफ्रिकेने न्युझीलंडला ६ गडी राखून विकेट्सने हरवले. हा सामना होळकर स्टेडियम, इंदूर येथे सोमवारी पार पडला.
न्युझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि न्यूझीलंडचा
संघ निर्धारित ५० षटकांत २३१ धावा करून सर्वबाद झाला.
न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना ४७.५ षटकांत २३१ धावा केल्या. सामन्याच्या पहिल्याच चेंडूवर माजी कर्णधार सूजी बेट्स शून्यावर बाद झाली. कर्णधार सोफी डिवाइनने मात्र दमदार खेळी करत ८५ धावा केल्या, पण ती शतकापासून दूर राहिली. त्यांना दक्षिण आफ्रिकेच्या फिरकीपटू नोंकुलुलेको मलाबाने क्लीन बोल्ड केले. मलाबाने १० षटकांत केवळ ४० धावा देत ४ गडी बाद केले. ब्रूक हॅलिडेनेही ४५ धावांची खेळी केली.२३२ धावांचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेची सुरुवात डळमळीत झाली. कर्णधार लॉरा वूलवार्ट फक्त १४ धावा करून बाद झाल्या. मात्र त्यानंतर टैजमिन ब्रिट्स आणि सुने लीस यांनी दुसऱ्या गड्यासाठी १५९ धावांची भागीदारी करत विजयाचा पाया रचला.
ब्रिट्सने केवळ ८७ चेंडूत आपले सातवे आणि या वर्षातील पाचवे वनडे शतक पूर्ण केले. ती महिला क्रिकेटमध्ये सर्वात कमी सामन्यांत (४१) ७ शतक ठोकणारी खेळाडू ठरली. शतकानंतर ब्रिट्स बाद झाली, पण लीसने ८३ नाबाद धावा करत ४१ व्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर चौकार मारून दक्षिण आफ्रिकेला विजय मिळवून दिला.न्यूझीलंडची सलग दुसरी हार
न्यूझीलंडला सलग दुसऱ्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. याआधी न्यूझीलंडच्या संघाला ऑस्ट्रेलियाकडून पराभव स्वीकारावा लागला होता. दक्षिण आफ्रिकेचा हा विजय त्यांच्या आत्मविश्वासासाठी महत्त्वाचा ठरला आहे.
मॅरिझॅन कॅपने रचला इतिहास
आयसीसी महिला वनडे वर्ल्ड कप २०२५ मध्ये दक्षिण आफ्रिकेच्या दिग्गज अष्टपैलू खेळाडू मॅरिझॅन कॅपने इतिहास रचला आहे. ती आता दक्षिण आफ्रिकेकडून सर्वाधिक वनडे सामने खेळणारी महिला क्रिकेटर ठरली आहे. तिने ही कामगिरी इंदूर येथील होळकर क्रिकेट स्टेडियमवर न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात केली.
मॅरिझॅन कॅपने या सामन्यात आपल्या कारकीर्दीचा १५५ वा वनडे सामना खेळला आणि दक्षिण आफ्रिकेच्या माजी कर्णधार मिग्नॉन डु प्रीझचा विक्रम मोडला. डु प्रीझने कारकीर्दीत १५४ वनडे सामने खेळले होते. या विक्रमसह कॅपने दक्षिण आफ्रिकन क्रिकेट इतिहासात नवीन अध्याय जोडला आहे. तसेच, ती महिला वनडे क्रिकेट इतिहासात सर्वाधिक सामने खेळणाऱ्या खेळाडूंच्या यादीत सातव्या स्थानावर पोहोचली आहे.
मॅरिझॅन कॅप आपल्या अष्टपैलू प्रदर्शनासाठी ओळखली जाते. तिने २००९ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले आणि तेव्हापासून ती संघाची सर्वात विश्वासू खेळाडू म्हणून ओळखली जाते. तिचा अनुभव आणि कामगिरी दक्षिण आफ्रिकन संघासाठी महत्त्वपूर्ण ठरली आहे.
सर्वाधिक सामने खेळणाऱ्या महिला क्रिकेटपटू
मिताली राज (भारत) : २३२ सामने
झूलन गोस्वामी (भारत) : २०४ सामने
शार्लोट एडवर्ड्स (इंग्लंड) : १९१ सामने
सूजी बेट्स (न्यूझीलंड) : १७३ सामने
स्टेफनी टेलर (वेस्ट इंडीज) : १७० सामने
एलिस पेरी (ऑस्ट्रेलिया) : १५९ सामने
मॅरिझॅन कॅप (दक्षिण आफ्रिका) : १५५ सामने
सोफी डिव्हाइन (न्यूझीलंड) : १५४ सामने