जडेजा, जुरेल व राहुलची शतके : विंडिजवर २८६ धावांची आघाडी
अहमदाबाद : अहमदाबाद कसोटीचा दुसरा दिवस भारतीय फलंदाजांच्या नावे राहिला. भारताने वेस्ट इंडिजविरुद्ध मजबूत आघाडी घेतली आहे. शुक्रवारी दुसऱ्या दिवशी खेळ संपला तेव्हा भारतीय संघाने ५ बाद ४४८ धावा केल्या होत्या. अष्टपैलू रवींद्र जडेजा १०४ आणि वॉशिंग्टन सुंदर ९ धावांवर नाबाद आहेत. त्याआधी ध्रुव जुरेल आणि केएल राहुल यांनीही शतके झळकावली.
ध्रुव जुरेलला खारी पियरेने १२५ धावांवर बाद केले. केएल राहुल (१०० धावा) ला जोमेल वॉरिकनने बाद केले आणि कर्णधार शुभमन गिल (५० धावा) ला रोस्टन चेसने बाद केले.
गुरुवारी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेल्या कॅरेबियन संघाला फक्त १६२ धावा करता आल्या. वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने ४ आणि जसप्रीत बुमराहने ३ बळी घेतले.
चौथ्यांदा तीन शतकांचा विक्रम
केएल राहुलने १९७ चेंडूंमध्ये १२ चौकारांसह १०० धावा केल्या, तर ध्रुव जुरेलने २१० चेंडूंमध्ये १२५ धावांची खेळी करत कसोटी कारकीर्दीतील पहिले शतक झळकावले. रवींद्र जडेजाने १७६ चेंडूंमध्ये ६ चौकार आणि ५ षटकारांसह नाबाद १०१ धावा केल्या. यंदा तिसऱ्यांदा एकाच डावात तीन भारतीय फलंदाजांनी शतके ठोकली. यापूर्वी लीड्स येथे इंग्लंडविरुद्ध यशस्वी जैस्वाल, शुबमन गिल आणि ऋषभ पंत यांनी, तर मॅनचेस्टर येथे शुबमन गिल, रवींद्र जडेजा आणि वॉशिंगटन सुंदर यांनी शतके झळकावली होती. १९७९, १९८६ आणि २००७ नंतर २०२५ हे चौथे वर्ष आहे, जेव्हा भारतात एका कॅलेंडर वर्षात एका डावात तीन किंवा त्याहून अधिक फलंदाजांनी शतके केली.
जुरेलचा पराक्रम
जुरेल भारताचा असा पाचवा यष्टिरक्षक-फलंदाज ठरला, ज्याने आपल्या टेस्ट कारकिर्दीतील पहिले शतक वेस्ट इंडिजविरुद्ध नोंदवले. यापूर्वी विजय मांजरेकर, फारुख इंजिनियर, अजय रात्रा आणि ऋद्धिमान साहा यांनीही वेस्टइंडीजविरुद्ध आपले पहिले कसोटी शतक ठोकले होते. जुरेलच्या या खेळीमुळे त्याने संधीचा पुरेपूर फायदा घेत आपले स्थान भारतीय संघात अधिक मजबूत केले आहे.जुरेल भारतीय कसोटी क्रिकेटच्या इतिहासात, १२ वा यष्टिरक्षक-फलंदाज ठरला आहे, ज्याने या फॉरमॅटमध्ये यष्टीरक्षक म्हणून शतक झळकावण्याचा पराक्रम केला आहे.
जडेजाची धोनीच्या विक्रमाशी बरोबरी
गेल्या काही वर्षांपासून रवींद्र जडेजाने कसोटी क्रिकेटमध्ये घरच्या आणि परदेशी मैदानांवर अष्टपैलू खेळाडू म्हणून आपली छाप सोडली आहे. हे त्याच्या कसोटी कारकिर्दीतील सहावे शतक आहे. यासह त्याने एमएस धोनीच्या ६ शतकांच्या रेकॉर्डशी बरोबरी केली. २०२५ मध्ये जडेजाने क्रमांक ६ किंवा त्याखालील स्थानावर फलंदाजी करताना ७ वेळा ५० हून अधिक धावांची खेळी केली आहे. यासह त्याने व्हीव्हीएस लक्ष्मण यांच्या २००२ मधील रेकॉर्डशीही बरोबरी केली, त्याने २३ डावांमध्ये ७ वेळा अशी कामगिरी केली होती.
क्रमांक ६ वर हजार धावांचा टप्पा
रवींद्र जडेजा कसोटी क्रिकेटमध्ये भारताकडून क्रमांक ६ वर फलंदाजी करताना १००० धावा पूर्ण करणारा सातवा भारतीय खेळाडू ठरला आहे. या स्थानावर त्याने २६ डावांमध्ये ५६.७२ च्या सरासरीने १०२० हून अधिक धावा केल्या आहेत. जडेजापूर्वी व्हीव्हीएस लक्ष्मण, सौरव गांगुली, युवराज सिंग, रवी शास्त्री, एमएस धोनी आणि रोहित शर्मा यांनी या स्थानावर हजार किंवा त्याहून अधिक धावा केल्या आहेत.
शुभमन गिलने ३०० चौकारांचा टप्पा केला पार
कर्णधार शुभमन गिलने या सामन्यात ५० धावांची खेळी करत एक खास विक्रम नोंदवला. तो २१ व्या शतकात मायदेशात कर्णधार म्हणून पहिल्याच डावात ५० पेक्षा अधिक धावा करणारा पहिला भारतीय कर्णधार ठरला. यापूर्वी विराट कोहली, रोहित शर्मा आणि महेंद्रसिंग धोनी यांना हा पराक्रम करता आला नव्हता. याआधी सुनील गावस्कर यांनी १९७८ मध्ये वानखेडे येथे वेस्ट इंडिजविरुद्धच्या २०५ धावांची खेळी साकरत हा विक्रम नोंदवला होता. गिलने त्याच्या खेळीत ५ चौकारांसह ५० धावा केल्या आणि कसोटी क्रिकेटमध्ये त्याच्या ३०० चौकारांचा टप्पा पूर्ण केला.बॉक्स
संक्षिप्त धावफलक
वेस्ट इंडिज (पहिला डाव) : सर्वबाद १६२
भारत (पहिला डाव) ५ बाद ४४८