विश्वनाथन विरुद्ध कास्पारोव्ह : ३० वर्षांनी पुन्हा आमनेसामने
नवी दिल्ली : बुद्धिबळातील भारताचे माजी विश्वविजेते विश्वनाथन आनंद आणि रशियाचे दिग्गज ग्रँडमास्टर गॅरी कास्पारोव्ह हे तब्बल ३० वर्षांनंतर पुन्हा एकदा समोरासमोर उभे ठाकणार आहेत. हा रोमांचक सामना बुधवारपासून 'क्लच बुद्धिबळ: द लिजेंड्स टूर्नामेंट' मध्ये सेंट लुईस बुद्धिबळ क्लब येथे खेळला जाणार आहे.
ही स्पर्धा १२ बाज्यांची असून, त्यासाठी एकूण १,४४,००० डॉलर्स (सुमारे १.२० कोटी रुपये) इतकी इनामी रक्कम ठेवण्यात आली आहे. यामध्ये विजेत्याला ७०,००० डॉलर्स (सुमारे ६२ लाख रुपये), तर उपविजेत्या खेळाडूला ५०,००० डॉलर्स (सुमारे ४४ लाख रुपये) एवढी रक्कम मिळणार आहे. सामना बरोबरीत सुटल्यास दोन्ही खेळाडूंना ६०,००० (सुमारे ५३ लाख रुपये) डॉलर्स मिळतील. याशिवाय २४,००० डॉलर्स (सुमारे २१ लाख रुपये) चा अतिरिक्त बोनस देखील निश्चित करण्यात आला आहे.
आनंद आणि कास्पारोव्ह हे शेवटचे १९९५ मध्ये न्यूयॉर्क येथील वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या १०७ व्या मजल्यावर झालेल्या विश्व अजिंक्यपद स्पर्धेत आमनेसामने आले होते. त्यावेळी २० बाज्यांच्या त्या सामन्यात कास्पारोव्हने १०.५-७.५ अशा फरकाने विजय मिळवला होता. कास्पारोव्हने २००४ मध्ये सक्रिय बुद्धिबळातून संन्यास घेतला असून, तो आता केवळ ब्लिट्झ किंवा प्रदर्शनी सामन्यांमध्ये भाग घेतो, तर आनंद आजही काही अव्वल स्पर्धांमध्ये खेळताना दिसतात.
तीन दिवसांत ठरणार बादशहा
ही स्पर्धा तीन दिवस चालेल, ज्यात दररोज चार बाज्या खेळल्या जातील- दोन रॅपिड आणि दोन ब्लिट्झ प्रकारातील. पहिल्या दिवशी प्रत्येक विजयासाठी १ गुण, दुसऱ्या दिवशी २ गुण, आणि तिसऱ्या दिवशी ३ गुण मिळणार आहेत. या विशेष गुण पद्धतीमुळे शेवटच्या दिवसापर्यंत सामन्यातील चुरस कायम राहण्याची अपेक्षा आहे.
‘फ्रीस्टाइल बुद्धिबळ’मध्ये पहिली टक्कर
विशेष म्हणजे, हा सामना आता ‘फ्रीस्टाइल बुद्धिबळ’ म्हणून ओळखला जात आहे. यामध्ये खेळाडूंना पारंपरिक नियमांच्या बंधनातून काहीशी सूट मिळते. बुद्धिबळप्रेमींसाठी ही केवळ दोन दिग्गजांची लढत नसून, तीन दशके जुन्या प्रतिस्पर्धेची पुनरुज्जीवित कथा आहे.