हीथरची झुंजार अर्धशतकी खेळी; गुणतालिकेत इंग्लंड अव्वल स्थानी
गुवाहाटी : महिला एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेच्या ८ व्या सामन्यात इंग्लंड महिला संघाने बांगलादेश महिला संघाचा ४ विकेटने पराभव करत स्पर्धेत आपला सलग दुसरा विजय नोंदवला. मंगळवारी गुवाहाटीतील बरसापारा स्टेडियमवर झालेल्या या कमी धावसंख्येच्या परंतु थरारक सामन्यात बांगलादेशला प्रथम फलंदाजी करताना केवळ १७८ धावा करता आल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडने १०३ धावांत ६ विकेट्स गमावल्या होत्या, पण अनुभवी माजी कर्णधार हीथर नाईट हिच्या संयमी अर्धशतकाने संघाला विजय मिळवून दिला.
पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा १० विकेटने धुव्वा उडवल्यानंतर इंग्लंडचा हा स्पर्धेतला दुसरा विजय ठरला. या विजयासह इंग्लंडने गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले आहे. दुसरीकडे, पहिल्या सामन्यात पाकिस्तानचा ७ विकेटने पराभव करणाऱ्या बांगलादेशला स्पर्धेतला पहिला पराभव स्वीकारावा लागला.
बांगलादेशची खराब सुरुवात
नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या बांगलादेशची सुरुवात अत्यंत खराब झाली. संघाच्या २४ धावा असताना रुबया हैदर (४ धावा) बाद झाली आणि त्यानंतर कर्णधार निगर सुल्तानाला (० धावा) खातेही उघडता आले नाही. यानंतर शर्मीन अख्तर आणि शोभना मोस्तारी यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. दोघांनी ६० चेंडूंत ३४ धावांची भागीदारी केली. शोभना मोस्तारीने संयमी फलंदाजी करत १०८ चेंडूंत ६० धावांची (८ चौकार) महत्त्वपूर्ण खेळी केली. शर्मीन अख्तर ५२ चेंडूंत ३० धावा करून बाद झाली.
मध्य फळी पूर्णपणे कोसळली असताना, राबेया खान ही एकमेव फलंदाज ठरली जिने आक्रमक फलंदाजी केली. तिने केवळ २७ चेंडूंमध्ये ६ चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने ४३ धावा ठोकल्या, ज्यामुळे बांगलादेशला १७८ धावांपर्यंत मजल मारता आली. बांगलादेशच्या धावसंख्येत १७ अवांतर (वाइड आणि लेग बाईज) धावांचे मोठे योगदान होते.
इंग्लंडच्या गोलंदाजांचा प्रभावी मारा
इंग्लंडकडून गोलंदाजीत सोफी एक्लेस्टोन हिने शानदार कामगिरी करत तीन बळी घेतले. तर चार्ली डीन, अॅलिस कॅप्सी आणि लिन्सी स्मिथ यांनी प्रत्येकी दोन-दोन विकेट्स घेतल्या. लॉरेन बेलला एक विकेट मिळाली.
इंग्लंडने १०३ धावांत गमावल्या ६ विकेट
१७९ धावांचे सोपे लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या इंग्लंड संघाची सुरुवातही तितकीच निराशाजनक झाली. केवळ २९ धावांत एमी जोन्स (१ धाव) आणि टॅमी ब्यूमोंट (१३ धावा) पॅव्हेलियनमध्ये परतल्या. कर्णधार नताली सायव्हर-ब्रंट आणि अनुभवी हीथर नाईट यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. सायव्हर-ब्रंटने ४१ चेंडूंत ३२ धावा केल्या, पण ती बाद झाल्यावर इंग्लंडची फलंदाजी गडगडली. सोफिया डंकली आणि एम्मा लंब प्रत्येकी १ धाव काढून लवकर बाद झाल्या. अॅलिस कॅप्सी (२० धावा) संघाला १०० धावांच्या पुढे घेऊन गेली, पण ती बाद झाली आणि इंग्लंडने १०३ धावांत ६ विकेट्स गमावल्याने सामना बांगलादेशच्या बाजूने झुकला होता.
हीथर नाईटची यशस्वी झुंज
अशा बिकट परिस्थितीत, माजी कर्णधार हीथर नाईट हिने एका बाजूने किल्ला लढवत अत्यंत संयमी आणि झुंजार अर्धशतक पूर्ण केले. तिने उर्वरित फलंदाजांना सोबत घेऊन कोणतीही चूक न करता संघाला विजयाच्या दिशेने नेले आणि इंग्लंडला ४ विकेट्सने विजय मिळवून दिला. नाईटच्या या खेळीमुळेच इंग्लंडला गुणतालिकेत अव्वल स्थान राखता आले.
शोभनाचे अर्धशतक
बांगलादेशकडून शोभानाने सर्वाधिक ६० धावा केल्या, १०८ चेंडूंचा सामना केला आणि आठ चौकार मारले. राबेया खाननेही फक्त २७ चेंडूंमध्ये ४३ धावा केल्या, सहा चौकार आणि एक षटकार मारला. इंग्लंडकडून सोफी एक्लेस्टोनने तीन विकेट्स घेतल्या. चार्ली डीन, अॅलिस कॅप्सी आणि लिन्सी स्मिथने प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. लॉरेन बेलने एक विकेट्स घेतली.
संक्षिप्त धावफलक
बांगलादेश : ४९.४ षटकांत सर्वबाद १७८ धावा.
इंग्लंड : ४६.१ षटकांत ६ बाद १८२ धावा.
सामनावीर : हीथर नाइट