प्रथम श्रेणी सामन्यात असा विक्रम करणारा ठरला पहिला गोमंतकीय फलंदाज. पर्वरीत जीसीएच्या मैदानावर गोवा विरुद्ध चंदीगड यांच्यात रणजी ग्रुप स्टेज सामना सुरू.
पणजी: गोव्याच्या क्रिकेट इतिहासात एका नव्या विक्रमाची नोंद झाली आहे. गोव्याचा २४ वर्षीय युवा फलंदाज अभिनव तेजराणा याने आपल्या प्रथम श्रेणी पदार्पणातच द्विशतक झळकावून ऐतिहासिक कामगिरी केली आहे. पर्वरी येथील गोवा क्रिकेट असोसिएशन ॲकॅडमीच्या मैदानावर चंदीगडविरुद्ध सुरू असलेल्या रणजी करंडक २०२५-२६ च्या गट साखळी सामन्यात अभिनवने हा पराक्रम केला.
गोव्याचा पहिला, देशातील १३ वा खेळाडू
अभिनव तेजराणा हा प्रथम श्रेणी पदार्पणात द्विशतक झळकावणारा पहिला गोमंतकीय फलंदाज ठरला आहे. तसेच, तो भारतात अशी कामगिरी करणारा केवळ १३ वा खेळाडू बनला आहे.
अभिनवची दमदार खेळी आणि तिसऱ्या विकेटसाठी विक्रमी भागीदारी
गोव्याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी निवडल्यानंतर अभिनव तेजराणा तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला. त्याने ३०१ चेंडूंमध्ये आपले द्विशतक पूर्ण केले. या डावखुऱ्या फलंदाजाने ३२० चेंडूंमध्ये २१ चौकार आणि ४ षटकारांसह नाबाद २०५ धावांची प्रभावी खेळी केली.
या खेळीदरम्यान गोव्याची धावसंख्या ११५/३ अशी असताना, अभिनवने ललित यादव सोबत चौथ्या विकेटसाठी ३०९ धावांची विक्रमी भागीदारी रचली. हा विक्रम गोव्याच्या चौथ्या विकेटसाठीच्या विक्रमी भागीदारीपेक्षा केवळ एका धावेने कमी ठरला. दरम्यान, बिहारच्या साकिबुल गनीच्या नावावर प्रथम श्रेणी पदार्पणात सर्वाधिक ३४१ धावा करण्याचा विक्रम आहे. अभिनव तेजराणाच्या या उल्लेखनीय कामगिरीमुळे गोव्याच्या क्रिकेटला नवा चेहरा आणि नवी ऊर्जा मिळाली आहे. दुपारपर्यंत गोव्याची धावसंख्या दुपारपर्यंत गोव्याची धावसंख्या ४२५/४ झाली होती. ललित यादव १५९ धावा तर समर दुभाषी १७ धावांवर नाबाद आहेत.