डिचोली : वन-म्हावळिंगे येथे अडीच वर्षीय चिमूकलीचा खून

शरीरावर आढळले मारहाणीचे व्रण. एका संशयिताला डिचोली पोलिसांनी घेतले ताब्यात. तपास सुरू.

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
3 hours ago
डिचोली : वन-म्हावळिंगे येथे अडीच वर्षीय चिमूकलीचा खून

डिचोली : तालुक्यातून एक अत्यंत क्रूर आणि हृदयद्रावक घटना समोर आली आहे. वन-म्हावळिंगे, कुडचिरे पंचायत क्षेत्रात आपल्या कुटुंबियांसोबत वास्तव्यास असलेल्या सुमारे अडीच वर्षांच्या चिमूकलीचा (मूळ कर्नाटक येथील) खून केल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी डिचोली पोलिसांनी संशयावरून एकाला ताब्यात घेतले असून, अधिक तपास सुरू आहे.

शरीरावर मारहाणीचे व्रण, मृत्यू गुदमरून

बुधवारी रात्रीच्या सुमारास संबंधित मुलीला डिचोली येथील सामाजिक आरोग्य केंद्रात आणण्यात आले असता, डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. चिमुकलीच्या शरीरावर काठीने मारहाण केल्याचे स्पष्ट व्रण डॉक्टरांना आढळले होते. या घटनेमुळे संशय वाढल्याने पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी बांबोळी येथील गोमेकॉ इस्पितळात पाठवला. विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शवविच्छेदन अहवालात मुलीचा मृत्यू नाक आणि तोंड दाबल्याने गुदमरून झाल्याचे स्पष्ट झाले आहे. यावरून हे प्रकरण खुनाचेच असल्याचे सिद्ध झाले.

मृत चिमुकलीच्या आईच्या प्रियकराला पोलिसांनी तातडीने ताब्यात घेतले. सध्या ताब्यात घेतलेल्या व्यक्तीची कसून चौकशी केली जात असून, खून कशासाठी आणि कोणत्या कारणातून करण्यात आला, याचा उलगडा होण्याची शक्यता आहे. या धक्कादायक घटनेमुळे वन-म्हावळिंगे परिसरात हळहळ आणि संतापाचे वातावरण पसरले आहे.

हेही वाचा