बेली डान्सर स्टेजवर असतानाच छताला लागली आग

पणजी: गोव्यातील हडफडे येथील 'बर्च बाय रोमिओ लेन' (Birch by Romeo Lane) क्लबमध्ये २५ जणांचा बळी घेणाऱ्या भीषण अग्नितांडवाच्या आधीचे थरारक दृश्य एका व्हायरल व्हिडिओमधून समोर आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हा व्हिडिओ दुर्घटनेच्या अगदी काही क्षण आधीचा असल्याचे सांगितले जात आहे. क्लिपमध्ये, एक बेली डान्सर (Belly Dancer) स्टेजवर परफॉर्म करत असताना, व्हिडिओ सुरू झाल्यानंतर सुमारे दहा सेकंदांतच छताला अचानक आग लागल्याचे दिसते. क्षणार्धात ही आग वेगाने संपूर्ण छतावर पसरते, ज्यामुळे क्लबमध्ये मोठा गोंधळ उडाल्याचे स्पष्ट होते.
डोळ्यांदेखत सुरू झालेल्या या भयंकर आगीमुळे क्लबमधील सुरक्षा व्यवस्थेवर आणि आपत्कालीन परिस्थिती हाताळण्याच्या क्षमतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. तसेच या व्हिडिओमुळे घटनेची तीव्रता आणि भयावहता अधिक स्पष्ट झाली आहे.