हडफडेत नाईटक्लबमध्ये अग्नितांडव! २५ जणांचा दुर्दैवी मृत्यू

सुरक्षा उपायांकडे डोळेझाक झाल्याचे स्पष्ट; पुढील तपास सुरू : पोलीस महासंचालक आलोक कुमार

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
3 hours ago
हडफडेत नाईटक्लबमध्ये अग्नितांडव! २५ जणांचा दुर्दैवी मृत्यू

पणजी: गोव्यातील हडफडे (Arpora) येथील प्रसिद्ध 'बर्च बाय रोमिओ लेन' (Birch by Romeo Lane) या रेस्टॉरंट-कम-नाइटक्लबमध्ये आज, रविवार (७ डिसेंबर) उत्तर रात्री १:०० वाजण्याच्या सुमारास लागलेल्या भीषण आगीमुळे मोठी दुर्घटना घडली आहे. या हृदयद्रावक घटनेत सकाळपर्यंत एकूण २५ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.





गुदमरून २३ जणांचा तर होरपळून दोघांचा मृत्यू

आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दल, पोलीस यंत्रणा आणि बचाव पथके तातडीने घटनास्थळी दाखल झाली आणि त्यांनी युद्धपातळीवर बचावकार्य सुरू केले. मृतांमध्ये २३ जणांचा मृत्यू गुदमरून, तर दोघांचा होरपळून झाला आहे. एकूण २५ मृतांमध्ये तीन महिलांसह बहुतेक क्लब कर्मचारी होते, ज्यात किचनमधील कामगारांची संख्या अधिक आहे. तसेच, मृतांमध्ये चार पर्यटकांचा देखील समावेश असल्याची प्राथमिक माहिती आहे.


प्रशासनाकडून तातडीने पाहणी

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, स्थानिक आमदार मायकल लोबो आणि पोलीस महासंचालक आलोक कुमार यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला. प्राथमिक माहितीनुसार, क्लबच्या किचनजवळ झालेल्या गॅस सिलिंडरच्या स्फोटामुळे ही आग लागल्याचा अंदाज आहे.



उच्चस्तरीय चौकशीचे आदेश आणि मदत

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी या घटनेला 'गोमंतकीयांसाठी अत्यंत दुःखाचा दिवस' असल्याचे नमूद केले. त्यांनी या संपूर्ण प्रकरणाच्या सखोल तपासासाठी दंडाधिकाऱ्यांमार्फत (Magisterial Inquiry) चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. या चौकशीतून आगीचे नेमके कारण आणि सुरक्षा नियमांचे उल्लंघन झाले असल्यास जबाबदारी निश्चित केली जाईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घटनेबद्दल दुःख व्यक्त करत, मृतांच्या कुटुंबियांना पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून २ लाख रुपये आणि जखमींना ५० हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे.




जखमींवर उपचार सुरू

या दुर्घटनेत जखमी झालेल्या ६ जणांना गोमेकॉ (Goa Medical College) येथे उपचारांसाठी दाखल करण्यात आले होते. त्यापैकी एकाला डिस्चार्ज देण्यात आला असून, उर्वरित ५ जखमींची प्रकृती सध्या स्थिर आहे आणि त्यांच्यावर सर्वोत्तम वैद्यकीय उपचार सुरू आहेत, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. सर्व मृतदेह शवविच्छेदनासाठी बांबोळी येथील गोमेकॉमध्ये हलवण्यात आले आहेत.


Goa Arpora blaze: 23 dead in nightclub fire from suspected cylinder blast;  what we know so far


बेकायदा बांधकामाचे आरोप आणि टीका

हडफडेचे सरपंच रोशन रेडकर यांनी क्लबचे बांधकाम बेकायदा असल्याचा आरोप करत, पंचायतीने सदर बांधकाम पाडण्याचे आदेश देऊनही मालकांनी न्यायालयाकडून स्थगिती मिळवली होती. त्यांनी सरकारने आता कठोर कारवाई करावी अशी मागणी केली आहे. दरम्यान, प्रदेश काँग्रेस अध्यक्ष अमित पाटकर यांनी ही दुर्दैवी घटना म्हणजे भाजप सरकारच्या काळात सार्वजनिक सुरक्षा आणि प्रशासन कोलमडल्याचा हा परिणाम असल्याचे म्हटले आहे.


Four tourists, 14 staff among 25 killed in massive fire at Goa nightclub |  India News


सुरक्षा उपायांकडे डोळेझाक झाल्याचे स्पष्ट : पोलीस महासंचालक 

पोलीस महासंचालक आलोक कुमार यांनीही, क्लबची संरचना, अग्निसुरक्षा नियमांचे पालन आणि आपत्कालीन बाहेर पडण्याच्या मार्गांची तपासणी करण्याचे निर्देश दिले असून, पोलिसांनी क्लब सील करून पुढील तपास सुरू केला आहे. या घटनेनंतर इतर नाईटलाइफ आस्थापनांचीही अग्निसुरक्षा तपासणी करण्याची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. गोव्याच्या पर्यटन इतिहासातील काळा दिवस म्हणून आजचा दिवस गोमंतकीय जनतेच्या कायमच स्मरणात राहील.


Birch Goa Fire: अरपोरा नाइटक्लब में भयानक आग, 23 लोगों की मौत-आखिर हुआ क्या  था? | Asianet News Hindi


हेही वाचा