रेडकरांना बळीचा बकरा बनवण्याचा प्रयत्न असल्याचा समर्थकांचा आरोप

हणजूण: हडफडे येथील नाइटक्लब अग्नितांडव प्रकरणी हणजूण पोलिसांनी हडफडे-नागवाचे सरपंच रोशन रेडकर यांना चौकशीसाठी ताब्यात घेतल्यामुळे आज संध्याकाळी हणजूण पोलीस स्थानकात मोठा तणाव निर्माण झाला होता.

रेडकर समर्थकांचा जमाव
सरपंच रेडकर यांना चौकशीसाठी पोलीस स्थानकात आणल्याची माहिती मिळताच त्यांचे मोठ्या संख्येने समर्थक पोलिस ठाण्याबाहेर जमा झाले. जमावाने पोलिसांच्या या कृतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली आणि रेडकर यांना 'बळीचा बकरा' (Scapegoat) बनवण्याचा पोलिसांकडून प्रयत्न होत असल्याचा आरोप केला.

रेडकरांचा आरोप
पोलिसांनी आपल्याला अडवून ठेवल्याबद्दल सरपंच रेडकर यांनीही संताप व्यक्त केला. आग लागलेल्या क्लबला आपण पंचायतीकडून कुठलाच परवाना दिलेला नव्हता, असे असतानाही पोलीस आपल्याला त्रास देत असल्याचा आरोप रेडकरांनी केला. भाजप सदस्य पदाचा आपण राजीनामा देत असून २०२७ मध्ये कळंगुट मतदारसंघात भाजपचा उमेदवार जिंकणार नाही याची काळजी घेऊ असेही रेडकर म्हणाले.

या भीषण दुर्घटनेवर सकाळी प्रतिक्रिया देताना सरपंच रेडकर यांनी स्पष्ट केले होते की, खोसला नामक व्यावसायिकाची ही मालमत्ता सौरव लुथरा यांना भाड्याने देण्यात आली होती. लुथराच हा क्लब चालवत होते. हा क्लब बेकायदा बांधकाम असल्यामुळे पंचायतीने ते पाडण्याचा आदेश दिला होता. मात्र, क्लब व्यवस्थापनाने न्यायालयाकडून स्थगिती मिळवल्यामुळे पंचायतीला पुढील कारवाई करता आली नाही. दरम्यान, समर्थकांनी तातडीने चौकशीचे कारण स्पष्ट करण्याची मागणी केली आणि पोलिसांचे उत्तर मिळेपर्यंत पोलीस स्थानकासमोरून हटण्यास नकार दिला. यामुळे या भागात बराच वेळ तणावपूर्ण परिस्थिती राहिली.

बातमी अपडेट होत आहे.