सुरक्षा उपायांकडे सपशेल दुर्लक्ष केल्यानेच घडली दुर्घटना : मुख्यमंत्री डॉ. सावंत

पणजी: गोव्यातील हडफडे येथील 'बर्च बाय रोमिओ लेन' (Birch by Romeo Lane) या प्रसिद्ध क्लबमध्ये रविवार (आज) उत्तर रात्री १:०० वाजता लागलेल्या भीषण आगीत २५ जणांचा हकनाक बळी गेला आहे. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेत गोवा पोलिसांनी तातडीने कारवाई करत क्लब व्यवस्थापनातील चार जणांना ताब्यात घेतले आहे.
सुरक्षा नियमांचे उघड उल्लंघन
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, स्थानिक आमदार मायकल लोबो आणि पोलीस महासंचालक आलोक कुमार यांनी पहाटेच घटनास्थळी धाव घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला. प्राथमिक माहितीनुसार, क्लबच्या किचनजवळ झालेल्या गॅस सिलिंडरच्या स्फोटामुळे आग लागल्याचा अंदाज आहे. मुख्यमंत्र्यांनी या दुर्घटनेमागे सुरक्षा उपायांकडे सपशेल दुर्लक्ष हेच मुख्य कारण असल्याचे नमूद केले आहे.
मुख्यमंत्री सावंत म्हणाले, गोव्याच्या पर्यटन इतिहासातील ही पहिलीच इतकी मोठी आणि दुर्दैवी घटना आहे. आग अर्ध्या तासात विझवण्यात आली, पण ज्या क्लबमध्ये हे घडले, तिथून काही लोक बाहेर पडू शकले नाहीत आणि गुदमरल्यामुळे अनेकांचा मृत्यू झाला. मृतांपैकी ४ जण पर्यटक आणि उर्वरित क्लबचे कर्मचारी होते. मृतांच्या कुटुंबियांना सरकारकडून भरपाई दिली जाईल. जखमी ६ जणांवर गोमेकॉमध्ये सर्वोत्तम उपचार सुरू आहेत. या घटनेसंदर्भात चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत असे ते म्हणाले.
तासाभरापूर्वीच पणजी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत काँग्रेस प्रदेश अध्यक्ष अमित पाटकर यांनी सरकारवर जोरदार टीका केली. ते म्हणाले, ही घटना गोव्याच्या पर्यटन इतिहासातील काळा दिवस आहे. २५ निष्पाप लोकांचा मृत्यू ही जाणूनबुजून केलेली हत्या वाटते. या क्लबला पाडण्याचे आदेश जारी झाले असतानाही, मंत्र्यांचा दबाव वापरून ते काम थांबवण्यात आले होते. स्थानिक प्रशासनाने बेकायदा बांधकामांना कोणतीही परवानगी देऊ नये. क्लबकडे अग्निसुरक्षा परवानाही नव्हता. मुख्यमंत्र्यांनी स्वतः 'सुरक्षा नियम पाळले जात नाहीत' असे म्हणून आपल्या प्रशासनाचे अपयश मान्य केले आहे. २५ लोकांच्या मृत्यूची जबाबदारी कोण घेणार? असा सवाल त्यांनी केला.
मृतक कर्मचाऱ्याच्या कुटुंबाची व्यथा
या दुर्घटनेत जीव गमावलेल्या एका कर्मचाऱ्याच्या नातेवाईकाने आपली व्यथा मांडली. ते म्हणाले, मृत्यू झालेल्यांपैकी एक जण पूर्णा बहादूर हा आमच्या कुटुंबातील सदस्य होता. तो किचनमध्ये शेफ म्हणून काम करत होता... रात्रीच्या या घटनेत त्याचा मृत्यू झाला.
झारखंडमधील दोन सख्ख्या भावांचा अंत
क्लबमध्ये लागलेल्या भीषण आगीत जीव गमावलेल्यांमध्ये झारखंड राज्यातील दोन सख्ख्या भावांचा समावेश आहे. मृतांच्या कुटुंबियांपैकी एक असलेल्या नारायण माथुर यांनी घटनास्थळी येऊन ही माहिती दिली. ते म्हणाले, मृत्यू पावलेले दोघे माझे पुतणे, म्हणजे माझ्या मोठ्या भावाचे मुलगे होते. मी त्यांच्यासाठी येथे आलो आहे. ते दोघेही या रेस्टॉरंटच्या किचनमध्ये काम करत होते आणि या दुर्घटनेत त्यांचा दुर्दैवी अंत झाला आहे. मला आज सकाळी याबद्दल समजले. आमच्या शेजारील एका व्यक्तीचाही या आगीत मृत्यू झाला असून, आम्ही सर्वजण झारखंडचे रहिवासी आहोत, असे ते म्हणाले.
पर्यटकाची प्रतिक्रिया:
दिल्लीतून गोव्यात आलेला पर्यटक निखनेश म्हणाला, आमचे विमान रात्री १०:३० वाजता उतरले आणि आम्ही १२ च्या सुमारास बुक केलेल्या हॉस्टेलमध्ये पोहोचलो. पोहोचताच खिडकीतून आम्हाला धुराचे लोट दिसले. काल रात्री आम्ही येथे पार्टीचा बेत केला होता, पण आग लागल्याची माहिती मिळताच आम्ही गेलो नाही. काल इथे डीजे पार्टी होती, अशी माहिती कुणीतरी दिली, या भीषण दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर, उत्तर गोवा जिल्हाधिकाऱ्यांनी मदत किंवा तक्रारींसाठी आपत्कालीन संपर्क क्रमांक जाहीर केला आहे.
फोन लागत नाहीये, मित्राचे काय झाले कळत नाहीये...
हडफडे येथील क्लब दुर्घटनेनंतर घटनास्थळी आलेल्या किरण पाटील नावाच्या व्यक्तीने आपल्या मित्राबद्दल चिंता व्यक्त केली. किरण पाटील म्हणाले, ...माझ्या मित्राला फोन लागत नाहीये. तो इथे शेफ म्हणून काम करायचा आणि त्याची रात्रीची शिफ्ट होती. तो इथे कसा अडकला, हे शोधण्याचा मी प्रयत्न करत आहे. अधिकाऱ्यांनी मला अधिक माहितीसाठी हणजुण पोलीस स्थानकात जाऊन चौकशी करण्यास सांगितले आहे.
या भीषण दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर, उत्तर गोवा जिल्हाधिकाऱ्यांनी मदत किंवा तक्रारींसाठी आपत्कालीन संपर्क क्रमांक जाहीर केला आहे. मुख्यमंत्र्यांनी दंडाधिकाऱ्यांमार्फत या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश जारी केलेत. दरम्यान, पोलीस महासंचालक आलोक कुमार यांनीही, क्लबची संरचना, अग्निसुरक्षा नियमांचे पालन आणि आपत्कालीन बाहेर पडण्याच्या मार्गांची तपासणी करण्याचे निर्देश दिले असून, पोलिसांनी क्लब सील करून पुढील तपास सुरू केला आहे. या घटनेनंतर इतर नाईटलाइफ आस्थापनांचीही अग्निसुरक्षा तपासणी करण्याची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. गोव्याच्या पर्यटन इतिहासातील काळा दिवस म्हणून आजचा दिवस गोमंतकीय जनतेच्या कायमच स्मरणात राहील.
VIDEO CREDIT : ANI (TWITTER)