हणजुण पोलिसांची कारवाई

पणजी: गोव्यातील हडफडे येथील 'बर्च बाय रोमिओ लेन' (Birch by Romeo Lane) या प्रसिद्ध क्लबमध्ये रविवार (आज) पहाटे लागलेल्या भीषण आगीत २५ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतर हणजूण पोलिसांनी तातडीने कठोर कारवाई केली आहे. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेत क्लब व्यवस्थापनातील चार जणांना अटक करण्यात आली असून, क्लबचे मालक सौरभ लुथरा, गौरव लुथरा आणि इतरांवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

अटक केलेले व्यवस्थापन अधिकारी:
हणजूण पोलिसांनी भा.न्या.सं. (BNS) २०२३ च्या कलम १०५, १२५, १२५(अ), १२५(ब), २८७ सह ३(५) अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये खालील चार जणांचा समावेश आहे.
१) राजीव मोडक (४९): चीफ जनरल मॅनेजर
२) प्रियांशू ठाकूर (३२): गेट मॅनेजर
३) राजवीर सिंघानिया (३२): बार मॅनेजर
४) विवेक सिंग (२७): जनरल मॅनेजर.
गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सूरज एच. गावस यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

दरम्यान मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाची दंडाधिकाऱ्यांमार्फत चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. पोलीस महासंचालक आलोक कुमार यांनीही क्लबची संरचना, अग्निसुरक्षा नियमांचे पालन आणि आपत्कालीन बाहेर पडण्याच्या मार्गांची तपासणी करण्याचे निर्देश दिले आहेत. पोलिसांनी क्लब सील करून पुढील तपास सुरू केला असून, या घटनेनंतर इतर नाईटलाइफ आस्थापनांचीही अग्निसुरक्षा तपासणी करण्याची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे.
या दुर्घटनेत २५ जणांचा मृत्यू झाला असून, त्यापैकी पाच जणांची ओळख पटली आहे. मृतांमध्ये मोहित मुंडा (१८, झारखंड), प्रदीप महतो (२२, रांची), बिनोद महतो (१९, रांची), राहुल तांती (आसाम), आणि सतीश सिंह राणा (२६, उत्तराखंड) यांचा समावेश आहे. या दुर्घटनेत क्लबच्या कर्मचाऱ्यांचा अधिक समावेश असून, मृतांच्या कुटुंबियांना तातडीने माहिती देण्याचे काम प्रशासन करत आहे. दरम्यान, उत्तर गोवा जिल्हाधिकाऱ्यांनी मदत किंवा तक्रारींसाठी आपत्कालीन संपर्क क्रमांक जाहीर केला आहे.

बातमी अपडेट होत आहे.