गोव्याचा ५६६ धावांचा डोंगर : चंदीगड १ बाद ३४ धावा
पणजी : रणजी ट्रॉफीच्या २०२५–२६ हंगामात गोवा संघाने आपल्या पहिल्या डावात जबरदस्त फलंदाजी करत ५६६ धावांचा डोंगर उभा केला. गोव्याच्या डावात दोन द्विशतके ठळक ठरली अभिनव तेजराणा (२०५) आणि ललित यादव (२१३) यांनी संयमी पण प्रभावी खेळी करत संघाला मजबूत स्थितीत पोहोचवले.
सलामीवीर अभिनव तेजराणाने ३२० चेंडूत २१ चौकारांसह २०५ धावा झळकावल्या. तो रणजी पदार्पणात द्विशतक ठोकणारा पहिला गोमंतकीय आणि १३ वा भारतीय खेळाडू ठरला. ललित यादवने ३९३ चेंडूत २२ चौकारांसह २१३ धावा करत अप्रतिम साथ दिली. या जोडीने गोव्याच्या डावाला भक्कम आकार दिला.
इतर फलंदाजांत सुयश प्रभुदेसाई (४७) आणि दर्शन मिसाळ (३२) यांनीही महत्त्वाचे योगदान दिले. चंदीगडतर्फे विशू कश्यप सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला; त्याने ७ बळी घेत गोव्याच्या डावावर काही प्रमाणात नियंत्रण ठेवले. निशुंक बिर्लाने ३ बळी बाद केले.
प्रत्युत्तरात चंदीगडने दुसऱ्या दिवसअखेर ८ षटकांत १ बाद ३४ अशी सावध सुरुवात केली. गोव्याचा वेगवान गोलंदाज अर्जुन तेंडुलकर याने ४ षटकांत फक्त १० धावा देत १ बळी घेतला.
या दमदार कामगिरीमुळे गोवा संघाने हंगामाच्या पहिल्याच सामन्यात आपली ताकद दाखवून दिली आहे. दिवस अखेर अर्जुन आझाद २१ तर चंदीगडचा कर्णधार मनन व्होरा ११ धावांवर खेळत आहेत.