सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी; गोव्याचा मध्य प्रदेशवर दणदणीत विजय

सुयश, अभिनवची अर्धशतके : महाराष्ट्रची बिहारवर मात

Story: क्रीडा प्रतिनिधी। गोवन वार्ता |
02nd December, 08:51 pm
सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी; गोव्याचा मध्य प्रदेशवर दणदणीत विजय

पणजी : कोलकाता येथे सुरू असलेल्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी एलिट टी-२० स्पर्धेत मंगळवारी रोमांचक सामने झाले. गोव्याने सांघिक खेळाचे प्रदर्शन करत मध्य प्रदेशवर ७ गडी राखून शानदार विजय मिळवला. तर दुसरीकडे, ईडन गार्डन्सवर झालेल्या सामन्यात बिहारचा युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी याचे विक्रमी शतक व्यर्थ ठरवत महाराष्ट्राने बाजी मारली.

गोव्याचा मध्य प्रदेशवर ७ गडी राखून विजय
कोलकाता येथील सॉल्ट लेक जेयू सेकंड कॅम्पस येथे झालेल्या सामन्यात गोव्याने मध्य प्रदेशचा ७ गडी व ९ चेंडू राखून पराभव केला. गोव्याने नाणेफेक जिंकून मध्य प्रदेशला प्रथम फलंदाजी दिली. मध्य प्रदेशने २० षटकांत ६ बाद १७० धावा केल्या. गोव्याने हे लक्ष्य केवळ ३ गड्यांच्या मोबदल्यात १८.३ षटकांत पार केले. अभिनव तेजराणा (५५ धावा) व कर्णधार सुयश प्रभुदेसाई (नाबाद ७५) यांची अर्धशतके गोव्याच्या विजयाची खासियत ठरली.

सुयश आणि अभिनवची भागीदारी
आव्हानात्मक लक्ष्याचा पाठलाग करताना, गोव्याने ईशान गडेकर (५) व अर्जुन तेंडुलकर (१६) यांना लवकर गमावले. त्यानंतर अभिनव तेजराणा व सुयश प्रभुदेसाई यांनी तिसऱ्या गड्यासाठी ८९ धावांची भागीदारी केली. अभिनवने ३३ चेंडूंत ५५ धावा केल्या. तर सुयशने ५० चेंडूंत ६ चौकार व ३ षटकारांसह नाबाद ७५ धावांची खेळी केली. ललित यादव (१२) याच्यासह सुयशने चौथ्या गड्यासाठी ५७ धावांची अविभक्त भागीदारी केली.

अर्जुन तेंडुलकरचे तीन बळी
मध्य प्रदेशकडून हरप्रीत सिंग भाटियाने नाबाद ८० धावा केल्या. गोव्याकडून अर्जुन तेंडुलकर याने ३६ धावांत ३, हेरंब परबने २७ धावांत २ व कौशिकने १ गडी बाद केला. या विजयामुळे ‘ब’ गटात गोव्याचे ८ गुण झाले असून पुढील सामना ४ डिसेंबर रोजी बिहारविरुद्ध होईल.

वैभव सूर्यवंशीचे विक्रमी शतक व्यर्थ
ईडन गार्डन्सवर झालेल्या दुसऱ्या सामन्यात बिहारचा युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये शतक झळकवणारा सर्वात युवा फलंदाज ठरला. त्याने अवघ्या ६१ चेंडूंत ७ चौकार आणि ७ षटकारांसह १०८ धावा केल्या. बिहारने २० षटकांत ३ बाद १७६ धावा केल्या होत्या. वैभवने यापूर्वी १४ वर्षे वयात आयपीएलमध्येही विक्रम नोंदवला होता.

पृथ्वी शॉची खेळी भारी, महाराष्ट्राचा विजय
वैभवचे शतक व्यर्थ ठरवत महाराष्ट्राने हा सामना ३ गडी राखून जिंकला. महाराष्ट्राचा कर्णधार पृथ्वी शॉ याने ३० चेंडूंत ११ चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने ६६ धावांची खेळी केली. या खेळीमुळे महाराष्ट्राने १९.१ षटकांत ७ बाद १८२ धावा करत विजय मिळवला. पृथ्वी शॉ सामनावीर ठरला.

#SyedMushtaqAliTrophy #GoaCricket #SuyashPrabhudessai #ArjunTendulkar #VaibhavSuryavanshi #PrithviShaw #CricketNews