कूचबिहार करंडक क्रिकेट : तीन दिवसांपेक्षा कमी वेळेत जिंकला सामना

कूच बिहार करंडक एलिट क्रिकेट स्पर्धेतील गोव्याचा विजेता संघ.
पणजी : कूच बिहार करंडक (Cooch Behar Karandak) एलिट क्रिकेट स्पर्धेत (elite cricket tournament) बुधवारी गोव्याने (goa) उत्तर प्रदेशचा (Uttar Pradesh) ७ गडी राखून पराभव केला. सांगे येथील जीसीए मैदानावरील (GCA Ground) चार दिवसीय हा सामना पूर्ण तीन दिवस देखील चालला नाही. उत्तर प्रदेशचा पहिला डाव गोव्याने ४२.४ षटकांत १२५ धावांत गुंडाळला होता. यानंतर गोव्याने आपल्या पहिल्या डावात १०२.५ षटकांच्या खेळात २८९ धावांपर्यंत मजल मारताना पहिल्या डावाच्या आधारे १६४ धावांची आघाडी घेतली होती.
उत्तर प्रदेशने आपल्या दुसर्या डावात ८६.१ षटकांत २०७ धावा करत गोव्यासमोर ४४ धावांचे किरकोळ लक्ष्य ठेवले. गोव्याने ३ गडी गमावून विजयी लक्ष्य गाठले. दुसर्या दिवसअखेर उत्तर प्रदेशने आपल्या दुसर्या डावात ३ बाद ५४ अशी मजल मारली होती. उत्तर प्रदेशकडून दुसर्या डावात कर्णधार भव्य गोयल याने सर्वाधिक ६१ धावा केल्या. कैफ रेहमान (५६) व आदित्य कुमार सिंग (नाबाद ४२) यांच्यामुळे गोव्याला पुन्हा फलंदाजीला उतरावे लागले.
विजयासाठी ४४ धावांचा पाठलाग करताना गोव्याने शांतनू नेवगी (०) व सार्थक भिके (०) यांना लवकर गमावले. आदित्य कोटा २२ धावा करून बाद झाला. यश कसवणकर (नाबाद १५) व दिशांक मिस्किन (नाबाद २) यांनी विजयाची औपचारिकता पूर्ण केली.
गोव्याची प्रभावी गोलंदाजी :
गोव्याकडून दुसर्या डावात ऑफस्पिनर मिहीर कुडाळकर याने ४० धावांत सर्वाधिक ३ गडी बाद केले. समर्थ राणेने २७ धावांत २, चिगुरुपती व्यंकटने २६ धावांत २, यश कसवणकरने ६९ धावांत १ व शिवेन बोरकरने ३८ धावांत १ गडी बाद केला.
गोवा ‘ड’ गटात प्रथमस्थानी
गोव्याने या सामन्यातील विजयाद्वारे ६ गुणांची कमाई केली. या विजयासह गोव्याचे ३ सामन्यांतून ३ विजयांसह एकूण २० गुण झाले आहेत. ‘ड’ गटात गोव्याचा संघ प्रथम क्रमांकावर आहे. गोव्याचा पुढील सामना ८ ते ११ डिसेंबर या कालावधीत बिहारशी होणार आहे.