सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी एलिट टी-२० स्पर्धा

कोलकाता : सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी एलिट टी-२० सामन्यात गोव्याने बिहारवर ५ गडी राखून विजय मिळवला. सॉल्ट लेक जेयू सेकंड कॅम्पस, कोलकाता येथे झालेल्या या सामन्यात १८१ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना गोव्याने १९.५ षटकांत विजयाची नोंद केली. शानदार खेळी करणाऱ्या सुयश प्रभुदेसाईला सामनावीर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
प्रथम फलंदाजी करताना बिहारने २० षटकांत ७ बाद १८० धावा केल्या. एस. अग्नीने ४१ चेंडूत ६० आणि वैभव सूर्यवंशीने २५ चेंडूत झळकावलेल्या ४६ धावांमुळे बिहारला जबरदस्त सुरुवात मिळाली होती. तिसऱ्या क्रमांकावरील आकाश राजने ३१ चेंडूत ४० धावांचे योगदान दिले. त्यानंतर बिहारचा डाव कोलमडला. गोव्याकडून दीपराज गावकरने उत्कृष्ट गोलंदाजी करत ३८ धावांत ४ बाद अशी कामगिरी केली, तर अर्जुन तेंडुलकरने ३२ धावांत २ गडी बाद केले.
धावांचा पाठलाग करणाऱ्या गोव्याच्या संघाला सुयश प्रभुदेसाईच्या जबरदस्त ४६ चेंडूत ७९ धावांच्या खेळीच्या आधारावर सहज विजय मिळविणे शक्य झाले. त्याला कश्यप बखलेने ४९ चेंडूत ६४ धावा काडून मौल्यवान साथ दिली. तर ललित यादवने १२ चेंडूत नाबाद २१ धावा करून शेवटपर्यंत किल्ला भक्कम राखला. गोव्याने १९.५ षटकांत ५ बाद १८४ धावा काढत विजय साजरा केला.