विर्नोडा येथील वेदांत तिळवे कुक्कुटपालनातून ‘आत्मनिर्भर’

आर्थिक स्थैर्य देणारा व्यवसाय : स्थानिक बाजारपेठ उपलब्ध

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
2 hours ago
विर्नोडा येथील वेदांत तिळवे कुक्कुटपालनातून ‘आत्मनिर्भर’

पेडणे : चिवई-विर्नोडा येथील वेदांत प्रवीण तिळवे यांनी कुक्कुटपालन क्षेत्रात उतरून सरकारी नोकरीपेक्षाही हा व्यवसाय अधिक उत्पन्न देऊ शकतो, हे आपल्या कर्तृत्वातून सिद्ध केले आहे. सुशिक्षित युवकांनी सरकारी नोकरीच्या मागे धावण्याऐवजी स्वतःचा व्यवसाय उभा करून स्वावलंबी व्हावे आणि इतरांना रोजगार उपलब्ध करून द्यावा, असे आवाहन वेदांत यांनी केले आहे.

राज्यात दररोज परराज्यातून मोठ्या प्रमाणावर कोंबड्या, अंडी, दूध आणि दुग्धजन्य पदार्थ येतात. या परिस्थितीत स्थानिक उत्पादन वाढवण्याची गरज ओळखून, प्रगतशील शेतकरी प्रवीण तिळवे यांनी आपल्या सुशिक्षित मुलाला, वेदांत तिळवे यांना, कुक्कुटपालन क्षेत्रात उतरवले.

वेदांत सांगतात, मी सुरुवातीला ३ हजार कोंबड्यांची पिल्ले आणली. त्यांची काळजी घेण्यासाठी नियमित आहार, पाणी आणि योग्य वातावरण उपलब्ध करून दिले. त्यांच्या गरजा समजून घेतल्यावर त्या नियमितपणे अंडी देतात. त्यामुळे हा व्यवसाय केवळ फायदेशीरच नाही तर समाधान देणारा आहे. त्यांच्या कुक्कुटपालनातून मिळणारी अंडी किनारपट्टी भागातील हॉटेल्स, रिसॉर्ट्स आणि खाद्यगृहांकडून मोठ्या प्रमाणात मागवली जातात. त्यामुळे स्थानिक बाजारपेठेत त्यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे.

आजारी कोंबडी ओळखण्याबाबत विचारल्यावर वेदांत म्हणतात, जर एखादी कोंबडी नियमित अंडी देण्याचे थांबविल्यास लगेच लक्षात येते. त्यानंतर आम्ही तिच्यावर आवश्यक उपचार करतो.

ते पुढे सांगतात, सरकार सर्व बेरोजगारांना नोकरी देऊ शकत नाही. त्यामुळे युवकांनी स्वतःचा व्यवसाय सुरू करून स्वावलंबी व्हावे. आपल्या प्रयत्नांतून इतरांनाही रोजगाराची संधी दिली, तर ती समाजसेवाच होईल.

रात्री सात ते आठच्या दरम्यान कोंबड्यांना विजेचा प्रकाश देऊन त्यांची वाढ योग्यरित्या होईल, याची काळजी घेतली जाते. कुक्कुटपालन केंद्र घरापासून थोड्या अंतरावर ठेवण्यात आले आहे, जेणेकरून वास किंवा दुर्गंधी वस्तीपर्यंत पोहोचू नये. तसेच रानटी जनावरांच्या धोक्यापासून संरक्षण मिळावे म्हणून घरकुलाभोवती सुरक्षायंत्रणा बसवण्यात आली आहे.

युवकांनी कुक्कुटपालन क्षेत्रात यावे!

युवकांनी या क्षेत्रात करिअर करावे. मन लावून, नियोजनबद्ध पद्धतीने काम केले, तर कोणताही व्यवसाय यशस्वी ठरू शकतो. भविष्यात माझा उद्देश हा व्यवसाय आणखी वाढवण्याचा आहे, असे वेदांत तिळवे यांनी सांगितले. कुक्कुटपालनातून स्वावलंबनाचा मार्ग दाखवणारे वेदांत तिळवे हे आज युवकांसाठी प्रेरणादायी उदाहरण ठरत आहेत.

हेही वाचा