कुडचडे जीसुडा मार्केटला भीषण आग तर परतीच्या पावसाने उडाली लोकांची तारांबळ

पणजी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोव्यात नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी केली. तर, परतीच्या पावसामुळे लोकांची तारांबळ उडाली. कुडचडे जीसुडा मार्केटला भीषण आग लागून २२ दुकाने जळून खाक, होंडा येथे आवाजाच्या तीव्रतेवरून पोलिसांत तक्रार देण्यासाठी गेलेल्या तक्रारदाराची कार जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. यावरून बराच वादंग निर्माण झाला. याशिवाय अपघात, चोरी अशा घटना घडल्या. या आठवड्यातील घडामोडींचा घेतलेला आढावा.
रविवार

शेळ -मेळावली : आमदार बोरकर, मनोज परब यांच्यासह ५० जण आरोपमुक्त
शेळ -मेळावली येथील प्रस्तावित आयआयटी प्रकल्पाच्या विरोधकांवर दाखल केलेल्या तक्रारीत नमूद केलेल्या शब्दांमुळे शांततेचा भंग होत नाही. तसेच तक्रार मुख्यमंत्री किंवा आरोग्य मंत्री यांनी दाखल केल्या नाहीत, असे निरीक्षण नोंदवून आमदार वीरेश बोरकर, आरजीचे मनोज परब यांच्यासह ५० जणांना म्हापसा येथील प्रथमवर्ग न्यायालयाने आरोपमुक्त केले. याबाबतचा आदेश न्या. पूजा सरदेसाई यांनी दिला.
भरपाई मिळाल्याशिवाय मृतदेह स्वीकारण्यास कुटुंबियांचा नकार
लोटली येथील विजय मरीन शिपयार्ड येथील आगीत मृत्यू झालेल्या तिघा कामगारांच्या कुटुंबीयांनी भरपाई दिल्याशिवाय मृतदेह स्वीकारणार नसल्याचे सांगितले. कारखाने व बाष्पक खात्याच्या पाहणीत कोणतीही सुरक्षा यंत्रणा आढळून न आल्याने कंपनीने सात दिवसांच्या आत ऑडिट अहवाल सादर करावा, असे त्यांनी सांगितले.
घराशेजारी पडून जखमी वृद्धाचा मृत्यू
घराशेजारी पडल्याने जखमी झालेल्या ७७ वर्षीय जासिंटा फुर्तादो यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. कोलवा पोलिसांनी याप्रकरणी अनैसर्गिक मृत्यू म्हणून प्रकरण नोंद केले आहे. ओर्ली येथील जासिंटा फुर्तादो हे घराशेजारीच पडले. यात त्यांना गंभीर दुखापत झाली होती.
सोमवार
पंतप्रधान मोदींची गोव्यात नौसैनिकांसोबत दिवाळी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०२५ या वर्षाची दिवाळी गोव्यामध्ये नौसैनिकांसोबत साजरी केली. गोव्यातील नौदल तळावर त्यांनी जवानांना संबोधित करताना, "तुमच्यासोबत दिवाळी साजरी करणे हे माझे सौभाग्य आहे", असे सांगितले. यावेळी त्यांनी आयएनएस विक्रांतवरून पाकिस्तानलाही सूचक इशारा दिला.
कुडचडे जीसुडा मार्केटला भीषण आग; २२ दुकाने खाक
कुडचडे येथील जीसुडा मार्केटला भीषण आग लागली. या आगीत रस्त्याच्या कडेला असलेली सुमारे २२ विक्रेत्यांची दुकाने जळून भस्मसात झाली. सुदैवाने, या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
फोंड्यात कारने चिमुकलीला ठोकरले
सिल्वानगर, फोंडा येथे बालेनो कारने सायकल चालवत असलेल्या आठ वर्षीय चिमुकलीला ठोकरल्याने गंभीर जखमी झालेल्या चिमुकलीचा जागीच मृत्यू झाला. चिमुकली सायकल चालवत होती. चालक बालेनो कार पाठीमागे घेत होता. कार चालकाला ती चिमुकली दृष्टीस पडली नाही. पाठीमागे येणाऱ्या कारने सायकलला धडक दिली.
मंगळवार

होंडाचे सरपंच, पंचांसह ८ जणांवर गुन्हा
सत्तरीतील होंडा येथे आवाजाच्या तीव्रतेवरून पोलिसांत तक्रार देण्यासाठी गेलेल्या तक्रारदाराची ३०० ते ४०० जणांच्या जमावाने पोलीस चौकीसमोरच कार जाळण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणात पोलिसांनी होंडाचे सरपंच, पंचांसह आठ जणांवर गुन्हा नोंद केला.
पोलिसांना धक्काबुक्की; प्रिन्स ऑफ मळाच्या १९ जणांविरुद्ध गुन्हा नोंद
नेवगीनगर-मळा, पणजी येथे प्रिन्स ऑफ मळा नरकासुर प्रतिमेच्या दहनानंतर आयोजनस्थळी सुरू असलेले कर्णकर्कश संगीत बंद करण्यासाठी गेलेल्या पोलिसांच्या जीपला घेराव घालून पोलिसांना धक्काबुक्की व शिवीगाळ करण्याचा प्रकार घडला. याप्रकरणी पणजी पोलिसांनी १९ जणांविरुद्ध गुन्हा नोंद केला आहे.
झुआरीनगर-सांकवाळ येथील फ्लॅट फोडून साडेआठ लाखांचा ऐवज लंपास
झुआरीनगर-सांकवाळ येथील फ्लॅट फोडून चोरांनी साडेआठ लाखांचा ऐवज लंपास केल्याची तक्रार गांधीनगर-मांगोरहिल येथील राज दुलारी राणा यांनी १९ ऑक्टोबरला वेर्णा पोलीस स्थानकात दिली आहे. याप्रकरणी वेर्णा पोलिसांनी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
बुधवार
पाळोळे येथे डेंटल क्लिनिक, दुकान फोडून रोख लंपास
पाळोळे येथे चोरांनी डेंटल क्लिनिकमध्ये प्रवेश करून रोख रक्कम आणि वैद्यकीय उपकरणे लंपास केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
सरपंच शिवदास माडकर यांचा अटकपूर्व जामिनासाठी अर्ज
होंडा येथे दिवाळीच्या पूर्वसंध्येला नरकासुर दहनावेळी निर्माण झालेल्या गोंधळाच्या प्रकरणात अजूनही प्रमुख आरोपी फरार असून पोलिसांच्या तुकड्या महाराष्ट्रात रवाना झाल्या आहेत. या प्रकरणी वाळपई पोलिसांनी आतापर्यंत आठ जणांना अटक केली असून काहींना जबाबासाठी ताब्यात घेण्यात आले आहे. दरम्यान, होंडा पंचायतीचे सरपंच शिवदास माडकर यांच्यावर देखील गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांनी अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला आहे.
मोरजीत बिगरमोसमी पावसाचा कहर
बिगरमोसमी पावसाने गोव्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले आहे. विशेषतः मोरजी पंचायत क्षेत्रातील अनेक भागांत सतत पडणाऱ्या पावसामुळे भातशेती पूर्णपणे उद्ध्वस्त झाली असून, शेतकऱ्यांवर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे उभी भातशेती पाण्याखाली गेली आहे.
गुरुवार
सकाळी सरपंचपदी निवड, दुपारी अविश्वास ठराव
गोव्यातील दवर्ली-दिकरपाल पंचायतीत मिनिनो कुलासो यांची ७ विरुद्ध ४ अशा फरकाने सरपंचपदी निवड झाली. मात्र, या निवडीनंतर लगेच दुपारी ६ पंचांनी एकत्र येत नव्या सरपंचाविरोधात अविश्वास ठराव दाखल केला. त्यामुळे या पंचायतीच्या निवडणुकीत पुन्हा एकदा मोठी राजकीय रंगत आली आहे.
बांबोळी अपघातात दोन ‘अग्निवीरां’चा मृत्यू
आगशी पोलीस स्थानकाच्या हद्दीत बांबोळी हॉली क्रॉसजवळ स्वयंअपघात झाला होता. त्यात हरिगोविंद पी. (२२, कोलम-केरळ) आणि विष्णू जयप्रकाश (२१, कन्नुर-केरळ) अग्निवीर नौदल कॅडेट युवक ठार झाले आहेत.

दृष्टी मरीनच्या जीवरक्षकांनी वाचविले ४२ जणांचे प्राण
सिकेरी आग्वाद परिसरात दोन बचाव मोहिमांमध्ये दृष्टी मरीनच्या जीवरक्षकांनी ४२ जणांचे प्राण वाचवले. यामध्ये ३८ पर्यटक असलेली एक क्रूझ बोट आणि चार जण असलेली लहान बोट दगडांमध्ये अडकली होती.
म्हापसा बसस्थानकावर नायजेरियनाकडून कोकेन जप्त
गोवा पोलिसांच्या गुन्हा शाखेने म्हापसा येथील आंतरराज्य बस स्थानकावर छापा टाकून चिनेड्ड आमोस उर्फ व्हिक्टर इगवे (४२, रा. बागा कळंगुट) या नायजेरियन नागरिकाला अटक केली. त्याच्याकडून १ लाख रुपये किमतीचे १०.७९० ग्रॅम कोकेन जप्त केले.
शुक्रवार
रासई-लोटली येथील स्फोटात जखमी झालेल्या आणखी दोघांचा मृत्यू
लोटली येथील जहाज बांधणी प्रकल्पात भीषण स्फोट होऊन आग लागली होती. यात तिघा कामगारांचा मृत्यू झाला होता. आता आणखी दोन कामगारांचा मृत्यू झाला आहे. अभिषेक कुमार (२५) व मनीष चव्हाण (२६) अशी मृतांची नावे आहेत.
कोलवाळ कारागृहात कैदी शरीफला पूर्ववैमनस्यातून मारहाण
कोलवाळ कारागृहात मोहम्मद रिहान शरीफ याला मुंगूल टोळीयुद्धातील व्हेली डिकॉस्ता व सहकारी कैदी गटाकडून लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण करण्याचा प्रकार घडला. ड्रग्ज तस्करीच्या व्यवहारातील पूर्ववैमनस्यातून ही मारहाण झाली असून तुरूंग प्रशासनाकडून याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत कोलवाळ पोलिसांत तक्रार देण्यात आली नव्हती.
शनिवार
पणजी पोलीस स्थानकातून पाच जण सेवेतून मुक्त
एकाच ठिकाणी चिकटून बसलेल्या पोलिसांच्या बदली आदेशाची अखेर अंमलबजावणी झाली. पणजी पोलीस स्थानकाने पाच जणांना सेवेतून मुक्त केले. काहीजण अद्यापही त्याच जागी आहेत.

चापोली धरण भरले
परतीच्या पावसामुळे काणकोण येथील चापोली धरण पुन्हा एकदा तुडुंब भरून वाहू लागले आहे. मान्सून पावसामुळे जुलै महिन्यातच चापोली धरण तुडुंब भरून वाहू लागले होते. त्यानंतर धरणातील पाणी कमी झाले होते. मात्र, दोन दिवस पडलेल्या पावसामुळे धरणाने पुन्हा भरती रेषा ओलांडली आहे.
परतीच्या पावसाने झोडपले
पणजीसह गोव्याला परतीच्या पावसाने झोडपले. अनेक ठिकाणी पडझड झाली. आल्तिनोत चर्च व्यू इमारतीनजिक असलेल्या घरांजवळ पहाटे २.३० वाजता दरड कोसळली.
लक्षवेधी
माजी मुख्यमंत्री आणि कृषिमंत्री कै. रवी नाईक यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी गोवा सरकारतर्फे कला अकादमीत शोकसभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, आरोग्यमंत्री विश्वजीत राणे, वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांच्यासह अनेक मंत्री, आमदार, सद्गुरु ब्रह्मेशानंद स्वामी, उद्योजक अवधूत तिंबलो, माजी केंद्रीय मंत्री अॅड. रमाकांत खलप, रवी यांचे पुत्र रितेश, रॉय नाईक आदी उपस्थित होते.
कामातून चांगला मोबदला मिळेल असे सांगत म्हापसा येथील युवतीवर लैंगिक अत्याचार करण्यात आला होता. त्यानंतर व्हिडीओ काढून ब्लॅकमेल करत पैसे उकळले होते. या प्रकरणी फातोर्डा पोलिसांनी राज प्रशांत ठाकूर याला पुण्यातून अटक केली आहे.
२०१७ मध्ये गोव्यातील १८ गुंतवणूकदारांना जास्त परताव्याचे आमिष दाखवून २.३ कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आली होती. या प्रकरणी गोवा पोलिसांच्या आर्थिक गुन्हा विभागाने (ईओसी) रॉयल ट्विंकल स्टार क्लब व सिट्रस चेक इन्स या कंपन्यांचे व्यवस्थापकीय संचालक ओम प्रकाश गोएंका, संचालक प्रकाश उत्तेकर, व्यंकटराम नटराजन आणि नारायण कोटनीस यांच्याविरोधात मेरशी येथील विशेष न्यायालयात ५६५ पानी आरोपपत्र दाखल केले आहे. त्यात २२ साक्षीदारांची साक्ष नोंद करण्यात आले आहे.