गोव्यात लवकरच मान्यताप्राप्त वजनमाप चाचणी केंद्र उभारणार : केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी

पणजीत एकदिवसीय राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन

Story: प्रतिनिधी | गोवन वार्ता |
2 hours ago
गोव्यात लवकरच मान्यताप्राप्त वजनमाप चाचणी केंद्र उभारणार : केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी

पणजी : राज्य सरकारच्या मागणीनुसार गोव्यात लवकरच केंद्र सरकारची मान्यता असणारे वजन आणि माप चाचणी केंद्र सुरू केले असल्याची माहिती केंद्रीय ग्राहक व्यवहार आणि सार्वजनिक वितरण मंत्री प्रल्हाद जोशी यांनी दिली. शनिवारी पणजीत आयोजित एक दिवसीय राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, वजन आणि माप खात्याचे मंत्री दिगंबर कामत, केंद्रीय अतिरिक्त सचिव भारत खेरा, राज्य सचिव संजीव गडकर व अन्य अधिकारी उपस्थित होते. 

मंत्री जोशी यांनी सांगितले की, केंद्र सरकार गोव्याला विविध उपकरणे देणार आहे. यामुळे तसेच मान्यता प्राप्त केंद्रामुळे येथील वजन आणि माप खात्याच्या कामात आणखी अचूकता येईल. तसेच खात्याचे काम पारदर्शक होऊन याचा फायदा ग्राहकाला तसेच व्यापाऱ्यांना होईल. केंद्र सरकार ग्राहकांना प्राधान्य देत आहेच. त्याशिवाय उत्पादक आणि व्यापाऱ्यांच्या हितासाठी प्रयत्न केले जात आहे. त्यांच्या ईझ ऑफ डुईंग बिझनेससाठी विशेष तरतुदी केल्या जात आहेत. आम्ही या ग्राहक तसेच व्यापारी, उद्योजकांमध्ये समतोल राखून पुढे जात आहोत. 

ते म्हणाले, केंद्राने वजन माप विषयक कायद्यातील जुन्या तरतुदी बदलल्या आहेत. पूर्वी सामान्य गुन्ह्यांसाठी मोठ्या शिक्षेची तरतूद होती. काही प्रकरणात व्यापारी अथवा उत्पादकांना तुरुंगवास देखील भोगावा लागत होता. यामध्ये आम्ही बदल करून नियम शिथिल केले आहे. असे असले तरी व्यापारी आणि उत्पादकांनी देखील जबाबदारीने वागणे आवश्यक आहे. त्यांनी ग्राहकांचा विश्वास तोडू नये. वजन आणि माप हे दैनंदिन जीवनातील एक महत्त्वाचा घटक आहे. आम्ही खात्यामध्ये डिजिटल तंत्रज्ञान आणत आहोत. वाजवी आणि पारदर्शक बाजारपेठेसाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. 

कुडचडे येथे अत्याधुनिक प्रयोग शाळा : मुख्यमंत्री

विकसित भारत २०४७ चे स्वप्न साकार करण्यामध्ये वजन आणि माप खाते खात्याची भूमिका महत्त्वाची ठरणार. केंद्राकडून देण्यात आलेल्या मदतीतून कुडचडे येथे अत्याधुनिक प्रयोगशाळा उभारली जाईल. यामुळे राज्यात अचूक मापन उपकरणांसह पडताळणी व तपासणी अधिक चांगली होईल असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले.

हेही वाचा