तज्ञांचा सल्ला : संसर्गजन्य आजारांपासून बचावासाठी खबरदार घेणे आवश्यक

पणजी : सध्या हवामानात सतत होणारे बदल आणि तापमानातील चढ-उतारामुळे सर्दी, खोकला, ताप आणि इतर संसर्गजन्य आजारांचे प्रमाण वाढले आहे. आरोग्य तज्ज्ञांनी नागरिकांना स्वतःची काळजी घेण्यासाठी काही महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. योग्य काळजी घेतल्यास अशा संसर्गांपासून मोठ्या प्रमाणावर बचाव करता येऊ शकतो.
शरीराचे तापमान आणि आर्द्रता संतुलित ठेवण्यासाठी पाणी व द्रव पदार्थ मुबलक प्रमाणात प्यावे. हवामानातील बदल लक्षात घेऊन कपडे थर वापरावेत. त्यामुळे थंडी अथवा उष्णतेपासून संरक्षण मिळते. आगामी दिवसांतील तापमानातील बदल आणि पावसाची शक्यता जाणून घेऊन त्यानुसार बाहेर पडण्याची योजना आखा, असे आरोग्य तज्ञांनी सुचविले आहे.
अतिश्रम किंवा हवामानाच्या प्रतिकूल परिस्थितीत दीर्घकाळ काम टाळावे. ताप, अंगदुखी, खोकला, थकवा यांसारखी लक्षणे दिसल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. डॉक्टरांनी दिलेली औषधे वेळेवर आणि नियमित घ्यावी, विशेषतः जुन्या आजार असलेल्या रुग्णांनी काळजी घ्यावी. खिडक्या उघड्या ठेवा, हवेचा प्रवाह संतुलित ठेवा. ताण कमी करण्यासाठी ध्यान, योग किंवा छंद जोपासा, असे डॉक्टरांनी सुचविले आहे.
सर्दी-खोकल्याचा त्रास होत असल्यास हात वारंवार धुणे आवश्यक आहे. कारण याच मार्गाने जंतू पसरतात. २४ तासांत किमान ७ ते ८ तास झोप घ्यावी. फळे, भाज्या, धान्ये आणि प्रथिनयुक्त पदार्थांचा आहारात समावेश करावा. उगडयावरचे अन्नपदार्थ तसेच जंकफुड खाणे टाळावे. हलका शारीरिक व्यायाम शरीराला तंदुरुस्त ठेवतो, परंतु अतिश्रम टाळा, असेही तज्ञांनी सुचविले आहे.
नागरिकांनी हवामानातील बदलाच्या काळात स्वतःची आणि आपल्या कुटुंबाची काळजी घेणे अत्यावश्यक आहे. योग्य आहार, पुरेशी विश्रांती, स्वच्छता आणि सावधगिरी या चार गोष्टींचे पालन केल्यास तापासह इतर विषाणूजन्य आजारांपासून प्रभावीपणे बचाव करता येऊ शकतो.
- डॉ. दयानंद राव, पणजी