जाणून घ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीतील इतर महत्त्वाचे निर्णय

पणजी: पूर्वीच्या खाण लिज धारकांनी लिज क्षेत्राच्या बाहेर डंप केलेले लोहखनिजाच्या साठ्याची माहिती गोळा करून ती सूचीबद्ध केली जाणार आहे. असे लोहखनिज सरकारच्या यादीत आणण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी बैठकीनंतर ही माहिती दिली. यावेळी जलस्रोत मंत्री सुभाष शिरोडकर उपस्थित होते. अशा खनिजाच्या लिलावाबाबत नंतर निर्णय घेण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, पूर्वीच्या लिज धारकांनी लिज क्षेत्राच्या बाहेर डंप केलेले लोहखनिजाच्या साठ्याची माहिती दिली नव्हती. असे लोहखनिज पडून होते. मंत्रिमंडळाच्या निर्णयानंतर हे लोहखनिज सरकारच्या यादीत येईल. यामुळे याचे मूल्यांकन करणे, व्यवस्थापन करणे सुलभ होणार आहे. यासाठी गोवा खनिज धोरण २०१३ नुसार याचे नियमन केले जाणार आहे. यासाठी पूर्वीच्या लीज धारकाकडून अशा लोहखनिजाची माहिती घेतली जाणार आहे.
याशिवाय मंत्रिमंडळ बैठकीत गोमेकॉच्या रक्तपेढीमध्ये वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या ४ जागा कंत्राटी तत्त्वावर भरण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे. नवीन पशुवैद्यकीय महाविद्यालयासाठी कुर्टी येथे सध्या असणाऱ्या दवाखान्याच्या इमारतीची दुरुस्ती व नूतनीकरणास मंजुरी देण्यात आली आहे. गोवा लोकसेवा आयोगाच्या भरती नियमातील बदलांना मंजुरी देण्यात आली. गृहनिर्माण मंडळात कायदा आणि आयटी विभाग सुरू करण्यास देखील मंजुरी देण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
विविध पदांच्या नियुक्तीसाठी मंजुरी
ईएसआय इस्पितळात फिजिओथेरपीस्ट आणि फार्मासिस्टची कंत्राटी पदावर नियुक्ती करण्यास मंजुरी देण्यात आली. गोमेकोमधील विविध विभागात एक लेक्चरर व तीन सहाय्यक प्राध्यापकांची कंत्राटी पदावर नियुक्ती करण्यास मंजुरी देण्यात आली. तसेच आदिवासी कल्याण खात्यात तीन कनिष्ठ अभियंतांच्या नियुक्तीस मंजुरी देण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.