कोलवाळ कारागृहात कैद्याला मारहाण; सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह

Story: प्रतिनिधी | गोवन वार्ता |
3 hours ago
कोलवाळ कारागृहात कैद्याला मारहाण; सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह

म्हापसा: कोलवाळ कारागृहात शुक्रवारी (२४ ऑक्टोबर) सकाळी मोहम्मद रेहान शरीफ नावाच्या एका कैद्याला आठ ते दहा कैद्यांनी मारहाण केली. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या रेहानवर म्हापसा येथील जिल्हा इस्पितळात उपचार सुरू आहेत.

नेमकी घटना काय?

सकाळी कारागृहाच्या आवारात ही घटना घडली. आठ ते दहा कैद्यांनी अंडरट्रायल असलेल्या मोहम्मद रेहान या कैद्याला घेरले आणि त्याला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. या हल्ल्यात त्याच्या चेहऱ्यावर आणि शरीराच्या इतर भागांवर जबर दुखापत झाली आहे.उपचारासाठी इस्पितळात आणले जात असताना रेहानने पत्रकारांना सांगितले की, संशयित कैद्यांनी त्याला त्यांच्या विभागात बोलावून घेतले आणि त्यानंतर हा हल्ला केला.

या  घटनेनंतर दुपारपर्यंत कारागृह प्रशासनाने कोलवाळ पोलिसांत कोणतीही तक्रार नोंदवली नव्हती. त्यामुळे या मारहाणीमागील नेमके कारण काय आहे, तसेच संशयित कैद्यांची नावे अद्याप समजू शकलेली नाहीत.

दरम्यान, कारागृहासारख्या ठिकाणी मारहाणीची ही घटना घडल्यामुळे कैद्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. हल्ल्यात जखमी झालेला कैदी मोहम्मद रेहान शरीफ याला गेल्या जानेवारीमध्ये गुन्हा शाखेने ड्रग्ज प्रकरणी अटक केली होती आणि त्याच्याकडून १ लाखांचा गांजा जप्त करण्यात आला होता.

हेही वाचा