
पणजी: अरबी समुद्रात तयार झालेला कमी दाबाचा पट्टा आणि बंगालच्या उपसागरातील हवामान बदलांमुळे गोव्यात शुक्रवारी दिवसभर पावसाची संततधार सुरू राहिली. हा कमी दाबाचा पट्टा सध्या पणजीच्या नैऋत्य दिशेला अरबी समुद्रात ४३० किमी अंतरावर सक्रिय आहे.
हवामान खात्याने येत्या दोन दिवसांसाठी, म्हणजेच २५ आणि २६ ऑक्टोबर रोजी, वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता वर्तवली असून, या कालावधीसाठी 'यलो अलर्ट' जारी करण्यात आला आहे.
समुद्रात न जाण्याचे मच्छीमारांना आवाहन
राज्यात २५ ते २८ ऑक्टोबर दरम्यान वाऱ्याचा वेग ताशी ३५ ते ५५ किमीपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. यामुळे समुद्रात वातावरण अस्थिर राहू शकते. त्यामुळे मच्छीमारांनी या कालावधीत समुद्रात मासेमारीसाठी उतरू नये, असे आवाहन हवामान खात्याने केले आहे. शुक्रवारी पणजीसह अनेक भागांत दुपारनंतर पावसाचा जोर कायम होता. सततच्या पावसामुळे काही ठिकाणी झाडे पडून किरकोळ नुकसानीच्या घटनाही घडल्या आहेत.
पावसाची नोंद
गेल्या चोवीस तासांत राज्यात सरासरी ८.५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली, ज्यात धारबांदोडा येथे सर्वाधिक १६.४ मिमी पाऊस पडला. चालू महिन्यात (१ ते २४ ऑक्टोबर दरम्यान) राज्यात सरासरी ४.३० इंच पाऊस झाला आहे. या काळात पेडणे (८.४३ इंच), धारबांदोडा (५.७८ इंच), साखळी (५.१५ इंच) आणि पणजी (५.१४ इंच) येथे चांगला पाऊस झाला आहे. दरम्यान, राज्यात २७ ते ३० ऑक्टोबर दरम्यान तुरळक पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.