मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत : ५० नव्या सरकारी कर्मचाऱ्यांना नियुक्तीपत्रे प्रदान

मूळ गोंयकारांना सरकारी नोकरीत संधी मिळावी म्हणून कर्मचारी भरती आयोगाच्या परीक्षांमध्ये कोकणीचा समावेश करण्यात आला आहे. १५ वर्षांचा निवासी दाखला असला किंवा आवश्यक गुणवत्ता असली, तरीदेखील कोकणी विषयात उत्तीर्ण होणे आवश्यक आहे, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते नियुक्ती झालेल्या ५० नव्या सरकारी कर्मचाऱ्यांना नियुक्तीपत्रे देण्यात आली. यावेळी ते बोलत होते.
राष्ट्रीय रोजगार मेळ्याअंतर्गत आयोजित केलेल्या या कार्यक्रमात मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्यासोबत वीजमंत्री सुदिन ढवळीकर, क्रीडामंत्री डॉ. रमेश तवडकर, समाज कल्याणमंत्री सुभाष फळदेसाई, मुख्य सचिव डॉ. व्ही. कांदावेलू व इतर मान्यवर उपस्थित होते.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत पुढे म्हणाले की, विकसित भारत हे ध्येय ठेवून केंद्र व राज्य सरकार कार्यरत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ‘राष्ट्रीय रोजगार मेळ्या’चे उद्घाटन केले. त्याअंतर्गत गोव्यात ही ‘राष्ट्रीय रोजगार मेळ्या’चे आयोजन केले आहे. या मेळ्यात स्टेनोग्राफर, प्रोगामर, तांत्रिक सहाय्यक मिळून ५० नवनियुक्त कर्मचाऱ्यांना नियुक्तीपत्रे देण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
गोमंतकीय युवकांनाच सरकारी नोकरी मिळावी यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. त्यासाठीच १५ वर्षांच्या गोव्यात वास्तव्यात असल्याच्या दाखल्याबरोबरच कोकणी पेपर ही ठेवण्यात आला आहे व कोकणीत जास्त गुण मिळालेल्या उमेदवारांना निवडले जात आहे. कोकणीत नापास झालेल्यांना नोकरी दिली जात नाही. त्यामुळे गोमंतकीय युवकांनाच नोकरीची संधी मिळत असल्याचे मुख्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले.
पुस्तिकेचे अनावरण
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या ‘स्वयंपूर्ण मित्र’ योजनेला ५ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल काढण्यात आलेल्या पुस्तिकेचे यावेळी विमोचन करण्यात आले. त्यात अनेकांच्या यशोगाथांचा समावेश असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
नवनियुक्त कर्मचाऱ्यांनी चांगली सेवा द्यावी
नवीन नियुक्तीपत्रे दिलेल्या कर्मचाऱ्यांनी चांगले काम करावे व लोकांना चांगली सेवा द्यावी, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले. यापू्र्वी सरकारी कर्मचारी नियुक्त करताना अनेक परीक्षा द्यावा लागत होत्या. मात्र, आता त्यात सुधारणा करताना एकच परीक्षा ठेवून त्यात पारदर्शकता आणण्यात आली आहे. पात्र उमेदवारांनाच नोकरी मिळावी यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.