ते त्याच संध्याकाळी लगेच विमानाची तिकिटे बुक करून घरी परतले. त्यांना ‘आदनेरी’चा खरोखर प्रत्यक्ष अनुभव आला होता आणि ते तो कधीच विसरणार नव्हते.

अतुल आणि शिवानी आज खूप आनंदी होते. त्यांनी एका दिवसात अर्धा गोवा फिरून काढला होता. हे दोघेही पंजाबी होते. शिवानीच्या हातात तांबडा चुडा होता. ते हनिमूनसाठी गोव्यात आले होते. त्यांचा पर्वरी येथील हॉटेलमध्ये मुक्काम होता. त्यांनी ‘रेंट अ बाईक’ बुक करून गोवा फिरणे सुरू केले. रात्रीचे जेवण त्यांनी डिचोली येथे केले. जेवण उरकेपर्यंत अकरा वाजले. मयेमार्गे सालवी पुलावरून पर्वरी जवळ होते. त्यांनी ‘गुगल मॅप्स’च्या आधारे सालवीहून जायचे ठरवले.
वाटेत जास्त रहदारी नव्हती. वळणदार आणि नागमोडी वाट होती. शिवानीला मागे बसल्यामुळे अंधाराची भीती वाटत होती. दोघेही रात्रीच्या शांत वातावरणात खूपच बिनधास्त होते. तेवढ्यात वाटेत एक मोठा रेडा आला. काही केल्या तो हलेना. बाटलीतील पाणी त्याच्यावर शिंपडल्यावर तो बाजूला झाला. शिवानी त्या रेड्याला पाहून खूपच घाबरली, पण तुषारने तिला बळ दिले.
पुढे जाऊन ते सालवी पुलावर पोहोचले. तुषारने हेल्मेट घातले असल्यामुळे त्याला हळूच आवाज ऐकू आला, पण शिवानीला मात्र कोणीतरी मोठ्याने किंचाळल्याचा आवाज आला. शिवानीने तुषारला घट्ट मिठी मारली. तुषारने हेल्मेट काढले. शिवानीने “थांबू नकोस,” असे बजावले. तुषारने पुढे जाऊन जोरात ब्रेक लावला. ते दोघेही जवळजवळ पडणारच होते. तुषारला काही छोटी मुले हातात हात घालून पुलाच्या रस्त्यावर दिसली, पण शिवानीला काहीच दिसत नव्हते. तिला फक्त भयानक आवाज येत होते. तुषारला जणू वाटच मिळत नव्हती. तो आडवी-तिडवी कशीही गाडी चालवत होता. तुषारला पुन्हा पुन्हा शाळेचा गणवेश घातलेली मुले गाडीसमोर येताना दिसत होती. शिवानी आणि तुषारला हा रस्ता भयानक आहे हे समजले. दोघेही भीतीने थरथर कापत होते. तुषारने एकदम वेगाने एक्सेलरेटर ओढला आणि जलद गतीने गाडी सुसाट सोडली.
पुलाच्या जरा पुढे गेल्यावर त्यांना एक गतिरोधक दिसला. तुषारने कचकन पुढचा ब्रेक लावला. दोघेही जमिनीवर पडले. शिवानी उठली, तुषारही उठला. शिवानीला काही लागले नव्हते, पण तुषारच्या हाताच्या कोपरातून रक्त येत होते. शिवानीने तुषारला मागे बसवले आणि ती स्वतः गाडी चालवू लागली.
मदतीसाठी कोणी मिळते का, ते दोघे शोधत होते. रात्रीचे दीड वाजले होते. वाटेत मध्ये मध्ये कुत्रेही त्यांच्या गाडीकडे पाहून भुंकत होते. पर्वरीला पोहोचायला अजून वेळ होता. तेवढ्यात त्यांना ‘रोमाना आंटीचे कॅफे’ दिसले. ‘पाणी घेऊ या,’ म्हणून ते आत गेले. त्यांनी घडलेली सारी हकीकत तेथे असलेल्या रोमाना आंटीला सांगितली. तुषार आणि शिवानीची स्थिती पाहून रोमाना आंटीने त्यांना बसायला सांगितले आणि पाणी दिले. रोमानांचा मोठा मुलगा मेडिकल विद्यार्थी होता. कॅफेच्या मागे त्यांचे घर होते. रोमाना आणि त्यांचे पती पीटर त्यांना घेऊन घरी गेले. मुलाला उठवले. मुलाने त्यांच्या जखमांवर मलमपट्टी केली. “तुम्हाला पुलावर 'आदनेरी' झाली,” असे ती सांगायला लागली. “तुम्ही आज रात्र इथेच झोपा,” असे रोमाना आंटीने सांगितले. पीटर आणि रोमाना त्यांना जणू देवदूतांप्रमाणे भेटले होते. तुषार आणि शिवानीने ती रात्र तिथेच काढली.
दुसऱ्या दिवशी रोमाना आणि पीटरने त्यांना आपल्या गाडीने पर्वरी येथील हॉटेलवर पोहोचवले. पीटरच्या मुलाने त्यांची बाईक परत केली. रोमाना आंटीने सांगितले की, “काही वर्षांपूर्वी सालवी पुलावरून शाळेची बस नदीत बुडून नऊ मुलांचा बुडून मृत्यू झाला होता. कधी कधी त्यांचा आवाज येतो आणि ती दिसतात असे लोक सांगतात. तुम्हालाही तसेच दिसले असेल. तुम्हाला ‘आदनेरी’ झाली होती. सुदैवाने तुम्ही वाचलात.” तुषार आणि शिवानीने रोमाना आंटी आणि पीटरचे आभार मानले. ते त्याच संध्याकाळी लगेच विमानाची तिकिटे बुक करून घरी परतले. त्यांना ‘आदनेरी’चा खरोखर प्रत्यक्ष अनुभव आला होता आणि ते तो कधीच विसरणार नव्हते.
