इंस्टाग्राम किंवा फेसबुकवर ‘Khann Sakhi’ पेजला भेट द्या आणि या नवाथे सिस्टर्सच्या सुंदर कलाकृतींची झलक पाहा. यंदाच्या दिवाळीत आपल्या घराला पारंपरिक पण आधुनिक सौंदर्य देण्यासाठी भेट देऊया Khann sakhi by Navathe sister's ला.
दिवाळी म्हणजे प्रकाशाचा, रंगांचा आणि आनंदाचा उत्सव! हा सण फक्त दिवे लावण्यापुरता मर्यादित नसून, तो सर्वांना एकत्र आणण्याचा सण आहे. घराघरांत दिवे लावले जातात, फुलांच्या तोरणांनी सजावट होते, रांगोळ्या उमटतात, मिठाईचा सुगंध दरवळतो आणि सगळीकडे उत्साहाचं वातावरण निर्माण होतं. दिवाळी कोणत्याही एका धर्मापुरती मर्यादित नसून ती सगळ्यांची आहे, प्रत्येक मनाला उजळवणारी आहे.
गोव्यात तर दिवाळीचं एक वेगळंच स्वरूप पहायला मिळतं. दिवाळीच्या अगोदर एक महिना नरकासुर बनविण्याची लगबग आणि दिवाळीच्या दिवशी प्रातःकाळी नरकासुर दहनाच्या झगमगाटाने प्रत्येक गल्ली उजळते. लोक सकाळी एकमेकांच्या घरी जाऊन विविध प्रकारच्या पोह्यांचा आस्वाद घेतात, पारंपरिक कंदील बनवतात आणि आपल्या घरांना प्रकाशाने सजवतात.
यंदाची दिवाळी जरा अनोखी ठरली आहे गोव्यातल्या या दोन बहिणींसाठी. सर्जनशीलतेची ओढ आणि नवनवीन काहीतरी करण्याची इच्छा या दोन बहिणींना नेहमीच होती. प्रत्येक सण आणि उत्सवाला घर सजवताना त्या काहीतरी वेगळं, आकर्षक आणि अर्थपूर्ण करण्याचा प्रयत्न करत असत. संपदा नवाथे आणि श्रुती नवाथे दोघींनीही नेहमीच आपली आवड जपली. सणासुदीला घर सजवणं, नवीन गोष्टींचे प्रयोग करणं आणि परंपरेतून काहीतरी नवं घडवणं हा त्यांचा आवडीचा विषय. त्यांच्या जीवनातला एक खास क्षण म्हणजे, जेव्हा त्यांच्या आजोबांनी त्यांना एक शिवणयंत्र भेट दिलं. तो त्यांच्या आयुष्यातला अत्यंत मौल्यवान क्षण ठरला. परंतु काही काळातच आजोबांचं निधन झाल्याने त्यांनी दिलेलं ते शिवणयंत्र त्यांच्या जीवनातील शेवटचं आशीर्वादाचं प्रतीक ठरलं. त्या भेटीमागचा भावनिक अर्थ ओळखून, दोघींनी ठरवलं की, या शिवणयंत्राचा उपयोग संपूर्ण अंतःकरणाने आणि कौशल्याने करावा आणि तेव्हाच त्यांच्या स्वप्नाला खरी दिशा मिळाली.
या प्रवासाची सुरुवात झाली त्यांच्या आजीकडून शिकलेल्या शिवणकलेपासून. पारंपरिक तंत्र, फॅब्रिक वाया न घालवता शिवणकाम आणि प्रत्येक वस्तूत आत्मीयता ओतणं, हे त्यांचं ब्रीद बनलं. आजीकडून त्यांनी फॅब्रिक वाया न घालवता शिवणकाम करण्याची कला आणि पारंपरिक कापडाला नवं रूप देण्याचं तंत्रं शिकून घेतलं. त्याच काळात त्यांच्या मनात एक सुंदर कल्पना जन्माला आली ती म्हणजे खण या पारंपरिक कापडाला गोव्यात नवी ओळख द्यायची. खण कापडापासून तोरण, पर्सेस, फ्रेम्स, नैवेद्य पान, पूजेचं आसन, टोपी अशा अनेक वस्तूंनी त्यांनी त्यांच्या कल्पनेला आकार दिला. फेब्रुवारी २०२५ मध्ये त्यांनी त्यांच्या या स्वप्नाला नाव दिलं – ‘खण सखी’. काही दिवसांतच ‘खण सखी’ ला गोव्यात आणि इतर राज्यांमधूनही अप्रतिम प्रतिसाद मिळू लागला. धर्म, संस्कृती, प्रांत या सगळ्या सीमांपलीकडे जाऊन लोकांनी त्यांच्या कलाकृतीवर प्रेम दाखवलं.
‘खण’ हे कापड फक्त वस्त्र नाही, तर परंपरेचा जिवंत वारसा आहे.
काळाच्या ओघात थोडं विस्मृतीत गेलं असलं, तरी त्याचं सौंदर्य आणि वैशिष्ट्य आजही तितकंच तेजस्वी आहे. खण हे कापड उन्हाळ्यात थंडावा आणि हिवाळ्यात उबदारपणा देतं, त्यामुळे ते ऋतूनुसार आपला स्वभाव बदलतं, अगदी आपल्या संस्कृतीसारखंच! ‘खण सखी’ने या कापडाला आधुनिक डिझाइन आणि नव्या दृष्टिकोनातून सादर केलं, ज्यामुळे परंपरा आणि आधुनिकता यांचा सुवर्ण संगम घडला.
यंदाची दिवाळी ‘खण सखी’साठी अत्यंत विशेष ठरली आहे
या वर्षी त्यांनी आणली आहे एक हटके आणि पारंपरिकतेने नटलेली नवी कलाकृती साकारली ती म्हणजे ‘खण आकाश कंदील.’ खणाच्या रंगीबेरंगी कापडाने बनवलेले हे कंदील ग्राहकांच्या घरांना प्रकाश आणि परंपरेचा सुगंध देत आहेत. प्रत्येक कंदील ही एक कलाकृती आहे — दोन बहिणींच्या हातांनी साकारलेली, त्यांच्या आजोबांच्या आशीर्वादाने उजळलेली आणि गोव्यातील घराघरात झळकणारी. या नव्या उपक्रमाला लोकांचा जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे आणि ‘खण सखी’च्या ऑर्डर्स गोव्यातून राज्याबाहेरही झपाट्याने वाढत आहेत. या दोघींच्या प्रवासात त्यांना पालकांचा आणि कुटुंबाचा मोलाचा आधार मिळाला. सुरुवातीचं भांडवलही पालकांनीच दिलं आणि त्यांचा विश्वासच ‘खण सखी’चा पाया ठरला.
गोव्यातील लोकांनी या निर्मितीला मनापासून दाद दिली असून, आज ‘खण सखी’चे कंदील आणि इतर हस्तकला वस्तू, अनेक घरांना सजवत आहेत. ही गोष्ट फक्त दोन बहिणींच्या व्यवसायाची नसून ती आहे आशीर्वाद, परंपरा आणि सर्जनशीलतेने उजळलेल्या प्रवासाची.
म्हणूनच, गोव्यातील सर्वांना या लेखाच्या माध्यमातून एक छोटं आवाहन आहे की या दिवाळीत आपल्या घराला नवा स्पर्श द्या. इंस्टाग्राम किंवा फेसबुकवर ‘Khann Sakhi’ पेजला भेट द्या आणि या नवाथे सिस्टर्सच्या सुंदर कलाकृतींची झलक पाहा. यंदाच्या दिवाळीत आपल्या घराला पारंपरिक पण आधुनिक सौंदर्य देण्यासाठी भेट देऊया Khann sakhi by Navathe sister's ला. किंवा ९३०७०६२९१४ / ९०४९२६४१३७ या क्रमांकावर आजच संपर्क साधा.
- स्वाती नवाथे