मुक्या प्राण्यांसाठी थोडं प्रेम

आपल्या आसपास दररोज दिसणाऱ्या भटक्या कुत्र्यांकडे अनेकदा लोक भीती किंवा तिरस्काराने पाहतात. पण थोडं प्रेम, थोडीशी दया आणि समजूत दाखवली, तर त्यांच्यातही माणुसकीचं खरं रूप दिसतं.

Story: लेखणी |
17th October, 09:49 pm
मुक्या प्राण्यांसाठी थोडं प्रेम

माझी गोष्ट — स्कायला

मी आणि माझा होणारा नवरा; आम्हा दोघांचेही कुत्र्यांवर खूप प्रेम आहे, विशेषतः भटक्या कुत्र्यांवर. जेव्हा आम्ही एखादं कुत्रं बघतो, तेव्हा त्याला काहीतरी खायला देतो बिस्कीट, ब्रेडचा तुकडा किंवा उरलेलं अन्न. त्यांच्या चमकत्या डोळ्यांमध्ये दिसणारं “धन्यवाद” हे खूप समाधान देणारं असतं.

एकेदिवशी माझ्या भावाने एक छोटंसं पिल्लू घरी आणलं — तीन महिन्यांचं जर्मन शेफर्ड. ते अगदी लोभस, मऊ आणि निरागस होतं. पण एक अडचण होती — आईला मात्र ते घरात नको होतं. यापाठीमागे कारण होतं की, आमचं सगळ्यांचं काम असायचं, दिवसभर घरी कोणी नसायचं. तिला वाटायचं की मग त्या छोट्या पिल्लाची काळजी नीट घेता येणार नाही, ते एकटं राहील, उपाशी राहील. त्यामुळे ती तयार नव्हती. पण माझा भाऊ थोडा अपरिपक्व होता, त्याला आईचं कारण समजत नव्हतं. त्याला वाटायचं आई हट्टीपणा करते आहे, पण ती फक्त त्या छोट्या जीवाचं भलं बघत होती.

दोन दिवस आम्ही आईला समजवण्याचा प्रयत्न केला, पण ती तयार झाली नाही. तोवर मी त्या पिल्लाशी खूप जोडले गेले. मी तिचं नाव ठेवलं स्कायला. ती माझ्यासाठी जणू माझं बाळच झाली होती. मी तिची प्रत्येक गोष्ट सांभाळायची. खाणं, खेळणं, झोपणं सगळं.

स्कायला लवकरच माझ्या आयुष्याचा भाग बनली. मी जिमला जायचे तेव्हा ती दाराशी थांबून राहायची. मी परत आले की आनंदाने उड्या मारायची, शेपटी हलवत माझ्याभोवती फिरायची. तिचे निरागस डोळे नेहमी माझ्याकडेच असायचे. त्या २० दिवसांमध्ये मला जणू दुसरं काहीच नको होतं.

पण आई अजूनही तयार नव्हती. रोज ती भावाला सांगायची की “पिल्लू देऊन टाक.” एके दिवशी, रागाच्या भरात भावाने तिला एका ओळखीच्या माणसाला दिली. नीट चौकशी न करता. मला जेव्हा हे समजलं, तेव्हा मी रात्रभर रडत राहिले. काही खाल्लं नाही, झोपही नाही. मन अगदी अस्वस्थ होतं.

दोन दिवसांनी मी भावाला विनंती केली की कमीतकमी त्या माणसाला विचार, स्कायला ठीक आहे का? त्याने फोन केला आणि समोरच्याने सांगितलं की ती काही खात नाही, एका कोपऱ्यात बसलेली असते आणि रडते. हे ऐकून माझं हृदय पिळवटून गेलं. मला जाणवलं ती माझ्यावर तितकीच प्रेम करते, जितकं मी तिच्यावर करत होते.

आम्ही त्या माणसाला परत आणायला सांगितलं. स्कायला परत आली तेव्हा ती अशक्त, घाबरलेली आणि गप्प बसलेली होती. तिची अवस्था पाहून आईलाही अश्रू आले.

ती म्हणाली, “खरंच, या छोट्या जीवालाही भावना असतात.”

तरीही आम्ही तिला कायमची ठेवू शकलो नाही. भावाने सांगितलं की आपण तिच्यासाठी एक प्रेमळ घर शोधू, जिथे तिची नीट काळजी घेतली जाईल. शेवटी आम्हाला एक मुलगी मिळाली दयाळू आणि प्रेमळ. आम्ही स्कायला तिच्याकडे दिली. निरोप देताना माझे डोळे पाणावले, पण मनात समाधान होतं की ती सुरक्षित आहे.

आजही जेव्हा मी स्कायला आठवते, तेव्हा माझं मन भारावून जातं. तिचं प्रेम खरंच नि:स्वार्थी होतं. तिने मला शिकवलं की प्राण्यांनाही आपल्याइतकं प्रेम वाटतं आणि ते फक्त आपल्या दयाळूपणावर जगतात.

त्या अनुभवाने माझा जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलला. भटकी कुत्री धोकादायक नाहीत, ती फक्त घाबरलेली असतात. त्यांना माणसं वाईट वाटत नाहीत, फक्त पुन्हा त्रास होईल या भीतीत ती असतात. त्यांना हवं असतं थोडं अन्न, थोडं प्रेम आणि थोडीशी माया.

माझी सगळ्यांना एकच विनंती, रस्त्यावर कुत्रं दिसलं तर दगड फेकू नका, हुसकावू नका. उलट त्याला थोडं काहीतरी खायला द्या किंवा प्रेमाने आवाज द्या. तुमच्या त्या छोट्याशा कृतीचं त्यांच्यासाठी फार मोठं महत्त्व असतं.

आणि अजून एक गोष्ट — गणेशोत्सव, दिवाळी सारख्या सणांमध्ये कृपया प्राण्यांचाही विचार करा. आपल्याला फटाके फोडण्यात काही क्षणांचा आनंद मिळतो, पण त्या आवाजामुळे प्राणी घाबरतात, पळून जातात आणि अनेकदा पुन्हा सापडत नाहीत. त्यांच्या मालकांसाठी ही खूप वेदनादायक गोष्ट असते.

फटाक्यांमुळे केवळ प्राण्यांना नाही, तर पर्यावरणालाही मोठं नुकसान होतं. धूर, आवाज, प्रदूषण यातून काहीच चांगलं होत नाही. त्यामुळे आपण आता पर्यावरणपूरक आणि शांत मार्गाने सण साजरे करू या, जिथे माणसांसोबत प्राण्यांनाही आनंद मिळेल.

मग चला, त्यांच्याबद्दलचा दृष्टिकोन बदलू या. भीतीऐवजी दया, रागाऐवजी प्रेम आणि अज्ञानाऐवजी समजूतजारपणा अंगी बानवूया. एखाद्या भटक्या कुत्र्याला खायला द्या, हलकेच हात फिरवा किंवा फक्त प्रेमाने बघा मग तुम्हाला कळेल की तुम्हाला आयुष्यभराचा मित्र मिळालाय.

कारण कधी कधी खरं प्रेम शब्दांत नाही मांडता येत — ते फक्त शेपटी हलवत सांगितलं जातं. 


- श्रेया प्रभू सीनारी 

म्हापसा