शिरोडा येथील डोईफोडे कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर
शिरोडा: गोवा राज्यातील शिरोडा येथील डोईफोडे कुटुंबावर एकाच दिवशी काळाने घाला घातला आहे. मुलाच्या निधनाची बातमी ऐकून आईनेही जगाचा निरोप घेतल्याने, संपूर्ण कुटुंबावर आणि शिरोडावासीयांवर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला आहे. ही अत्यंत ह्रदयद्रावक घटना आहे. मिळालेल्या माहितीनुसार, डोईफोडे कुटुंबातील बाबू (नानू) रामा डोईफोडे (वय ४०) यांचे काल मडगाव येथील रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले.
बाबू डोईफोडे यांच्या निधनाची बातमी कुटुंबासाठी मोठा धक्का होती. मात्र, नियतीला इथेच थांबायचे नव्हते. जेव्हा बाबू डोईफोडे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्याची तयारी सुरू होती. आपल्या मुलाच्या अकाली निधनाची बातमी जनी डोईफोडे यांना सहन झाली नाही. मुलाच्या मृत्यूची बातमी ऐकताच त्या जागीच कोसळल्या आणि त्यांची प्राणज्योत मालवली. एकाच कुटुंबातील माय-लेकराचा एकाच दिवशी झालेला हा अनपेक्षित मृत्यू पाहून डोईफोडे कुटुंबातील इतर सदस्य आणि स्थानिक ग्रामस्थ सुन्न झाले आहेत.