पणजी : फोंड्याचे आमदार तथा माजी मुख्यमंत्री रवी नाईक यांच्या निधनानंतर आता फोंडा विधानसभा मतदारसंघात सहा महिन्यांत पोटनिवडणूक होणार आहे. मात्र, रवी नाईक यांचे पुत्र रितेश नाईक यांना बिनविरोध निवडून आणण्याची मागणी काही राजकीय नेत्यांनी केली आहे. प्रियोळचे आमदार गोविंद गावडे यांनीही विधानसभेचा राहिलेला कार्यकाळ पूर्ण करण्यासाठी फोंडा मतदारसंघातून रितेश नाईक यांना निवडून आणण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी सहकार्य करावे, असे आवाहन केले आहे.
आमदार गोविंद गावडे रवी नाईक यांना आपले राजकीय गुरू मानत आले आहेत. त्याच भावनेने त्यांनी रितेश नाईक यांना निवडून आणण्यासाठी सर्व राजकीय पक्षांनी सहकार्य करावे, असे आवाहन केले आहे. माजी मुख्यमंत्री रवी नाईक यांचे निधन झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. सरकारी पातळीवर तीन दिवसांचा दुखटाही जाहीर करण्यात आला. फोंडा विधानसभा मतदारसंघात ही राजकीय हालचाली सुरू झाल्या आहेत. त्याच पार्श्वभूमीवर सध्या रितेश नाईक यांना निवडून आणण्यासाठी राजकीय हालचाली सुरू झाल्या आहेत. तरीही विरोधी पक्षांनी अजून आपले पत्ते खोललेले नाहीत.