निर्बंध कडक
पणजी : राज्यात पर्यटन मौसम, धार्मिक उत्सव, लग्नसमारंभ यांसारखे कार्यक्रम जवळ येत असतानाच रात्री उशीरापर्यंत संगीत वाजवण्यास बरेच निर्बंध लागू करण्यात आले आहेत. १० नंतर विनापरवाना संगीत (Music) वाजवल्यास, नियमांचे उल्लंघन केल्यास १ लाखापर्यंत दंड भरावा लागणार आहे. व्यावासायिक आस्थापने किंवा आस्थापनांनी दोन वेळ आवाजाच्या नियमांचे उल्लंघन केल्यास आस्थापनाला सील ठोकण्यात येणार. तीन महिन्यांसाठी परवानेही रद्द करण्यात येणार आहेत.
गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण बोर्डाच्या (Goa State Pollution Controll Board) बोर्ड बैठकीत यासंदर्भात सविस्तर चर्चा करून वरील निर्णय घेण्यात आला आहे. एसओपीही निश्चित करण्यात आली आहे.
बोर्डाने घेतलेल्या निर्णयानुसार, पहिल्यांदा नियम मोडल्यास आस्थापन किंवा मालकाला २० हजार रुपयांचा दंड आकारण्यात येणार आहे. दुसऱ्यांदा ४० हजार रुपये दंड आकारण्यात येणार आहे. दंड भरेपर्यंत परवानाही रद्द करण्यात येणार आहे. नियम तोडण्याचे सत्र चालूच राहिल्यास जबर दंड आकारण्यात येणार आहे.
असा भरावा लागणार दंड
पहिल्या वेळी नियम मोडल्यास २० हजार रुपये, दुसऱ्यांदा नियम मोडल्यास ४० हजार रुपये दंड. त्यानंतर १ लाख रुपयांपर्यंत दंड, आस्थापन जप्त करणे, ३ महिन्यांसाठी परवाना रद्द करण्यात येणर आहे.
नियुक्त अधिकारी नियमांचे उल्लंघन झाल्यास सरळ कारवाई करणार. लाऊडस्पीकर लावण्यासाठी लेखी परवानगी घ्यावी लागणार.
आवाजाची मर्यादा
व्यावसायिक: ६६ डिबी (दिवसाला), ५५ डिबी (रात्री), रहिवासी परिसर ५५ डिबी (दिवसा), ४५ डिबी (रात्री), सायलेंट झोन्स ५० डिबी (दिवसा), ४० डिबी (रात्री).
पोलिसांकडून हवी अतिरिक्त परवानगी
ट्रांन्समिटर्स किंवा हेडफोन किंवा इतर तंत्रज्ञानाचा वापर करून संगीत वाजवण्यास पोलिसांकडून अतिरिक्त परवानगी घ्यावी लागणार.
आवाजाच्या नियमांचे उल्लंघन होऊ नये यासाठी गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण बोर्डाचे अधिकारी नियंत्रण ठेवणार आहेत. एखादे आस्थापन नियम तोडत असल्याचे दिसल्यास कारवाई करण्यात येणार आहे. परवानगी न घेता लाऊडस्पीकर वाजवण्यास किंवा सार्वजनीक ठिकाणी बैठका घेता येणार नाहीत.