कलकत्ता राऊंड, टेबल बॉल,अष्टगंधाचा समावेश
वाळपई : गोव्यात दिवसेंदिवस झेंडूच्या (Marigold) फुलांची मागणी वाढत आहे. गोव्यात ही आता बऱ्यापैकी ही फुलांची लागवड केली जात आहे. सत्तरी (Sattari) तालुक्यातील शेतकऱ्यांच्या (Farmer) कष्टाला यश आले आहे. झेंडूच्या फुलांची केलेली लागवड फळास पावली आहे. दिवाळीला विक्रीसाठी मुबलक फुले उपलब्ध होणार आहेत.
कृषी खात्याच्या सहकार्याने सत्तरी तालुक्यातील ४३ शेतकऱ्यांनी ७० हजार झेंडूच्या झाडांची लागवड केली. मशागत करून शेतकऱ्यांनी ही रोपटी वाढवली व आता फुलांनी बहरली आहेत. त्यामुळे दिवाळी सणासाठी मोठ्या प्रमाणात फुले उपलब्ध होणार आहेत. किंमत ही कमीच असणार आहे. लोकांनी ही फुले खरेदी करावी व स्थानिक शेतकऱ्यांना सहकार्य करावे, असे आवाहन कृषी खात्याच्या वाळपई कार्यालयातर्फे करण्यात आले आहे.
७० हजार झाडांची लागवड
कृषी खात्याच्या वाळपई कार्यालयाचे क्षेत्रीय अधिकारी विश्वनाथ गावस यांनी सांगितले की, ४३ शेतकऱ्यांनी मिळून एकूण ७० हजार झाडांची लागवड केली होती. ‘नॅशनल हॉर्टिकल्चर मिशन’ या योजनेखाली लागवड केली होती. त्यातून २.५० टन पेक्षा जास्त फुले तयार होणार आहेत. वाळपई व इतरत्र ही फुले विक्री करून दिवाळीच्या दिवसांत त्यांना चांगली कमाई होणार आहे. गोव्यात फुललेली ही फुले ताजी, टवटवीत असणार. १०० ते १२० रुपये प्रती किलो याप्रमाणे विकण्यात येणार आहेत.
तीन जातींची फुले उपलब्ध
विश्वनाथ गावस यांनी पुढे सांगितले की, सत्तरी तालुक्यामध्ये ज्या ठिकाणी लागवड करण्यात आलेली आहे, त्या ठिकाणी एकूण तीन प्रकारची फुले उपलब्ध आहेत. यामध्ये कलकत्ता टेनिस, बॉल पिवळा, कलकत्ता राऊंड ऑरेंज व अष्टगंधा नारिंगी या तीन जातींचा समावेश आहे. सर्व फुले चांगल्या दर्जाची व आकाराने मोठी आहेत. दिवाळी, लक्ष्मीपूजनासाठी उपयुक्त ठरणार आहेत. गेल्यावर्षी ५० हजार झाडांची लागवड करण्यात आली होती. यावर्षी ७० हजार झाडांची लागवड करण्यात आली.
जमीन झेंडूसाठी पोषक
सत्तरी तालुक्याची जमीन झेंडूच्या लागवडीसाठी अत्यंत पोषक स्वरूपाची आहे. पोषक घटक असल्याने याठिकाणी चांगल्या प्रकारे फुलांची लागवड करून त्यातून चांगल्या प्रकारचे उत्पादन करणे शक्य असल्याचे विश्वनाथ गावस यांनी सांगितले.