विजय मरीन स्फोटातील मृतांची संख्या पोहोचली तीनवर
मडगाव : लोटली येथील जहाज बांधणी प्रकल्पात शुक्रवारी भीषण स्फोट होऊन आग लागली. यात शुक्रवारी दोघांचा तर शनिवारी सकाळी आणखी एका कामगाराचा मृत्यू झाला. या प्रकरणात शिपयार्डचे सुरक्षा अधिकारी राजू बोरा (रा. आसाम) याला अटक करण्यात आली आहे.
रासई-लोटली येथील विजय मरीन जहाज बांधणी प्रकल्पात बोट तयार करण्याचे काम सुरू असताना शुक्रवारी सायंकाळी ५.१५ वाजता स्फोट झाला व आग लागली. यात सात कामगार जखमी झाले. त्यातील दोघांचा जास्त भाजल्याने उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. तर, चार कामगारांवर गोमेकॉत व एका कामगारावर दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात उपचार सुरू होते. सर्व कामगार अलिबाग (उत्तरप्रदेश) येथील असून सध्या वेर्णा येथे रहात होते. बंद टँकमध्ये सहा कामगार व एक कामगार टँकच्या बाहेर होता. मोहम्मद बाबूल (२५), संतोष कुमार (२५), मनीष चव्हाण (२६) आणि अभिषेक सिंग (२५ सर्व रा. अलिबाग, उत्तरप्रदेश) यांच्यावर गोमेकॉत उपचार सुरू होते. शनिवारी सकाळी यातील आणखी एका कामगाराचा मृत्यू झाला. जिल्हाधिकाऱ्यांनी सदर घटना ही आगीची असून स्फोट नसल्याचे म्हटले आहे. तसेच घटनेचा अहवाल सादर करण्यास सांगण्यात आले आहे.
विजय मरीन शिपयार्ड सील करण्याचे आदेश
फॅक्टरी व बॉयलर खात्याने विजय मरीन शिपयार्ड सील करण्याचे आदेश दिले होते. या प्रकरणी मायणा-कुडतरी पोलिसांनी विजय मरीन वर्कशॉपचे सुरक्षा अधिकारी राजू बोरा (मूळ रा. आसाम) यांना कामगारांना संरक्षणात्मक उपकरणे पुरवण्यात हलगर्जीपणा केला. तसेच अग्निसुरक्षा उपाययोजना करण्यात अयशस्वी झाल्यामुळे कामगारांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण झाला. या प्रकरणी त्याला अटक केली. पोलीस निरीक्षक अरुण गावस देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सागर कामत पुढील तपास करीत आहेत.