देव आपल्या जीवनाचा खरा मित्र, रक्षक आणि मार्गदर्शक आहे. तो आपल्याला रोज पाहत असतो, मार्ग दाखवत असतो, फक्त आपण त्याच्यावर विश्वास ठेवला पाहिजे आणि दररोज मनात सकारात्मक विचार जोपासले पाहिजेत.
आपल्या जीवनात अनेक वेळा चांगले-वाईट प्रसंग येत असतात. कधी यश आपल्याला सहज मिळते, तर कधी अपयशाने मन खचून जाते. पण या सर्व काळात जर आपण देवावर विश्वास ठेवला आणि मनात सकारात्मक विचार जोपासले, तर कोणतीही अडचण आपल्या मार्गात अडथळा ठरत नाही. देव आपल्याला कधीच एकटे सोडत नाही, तो नेहमी आपल्या पाठीशी उभा असतो. फक्त आपण त्याच्यावर विश्वास ठेवला पाहिजे आणि स्वतःवर श्रद्धा ठेवली पाहिजे.
जीवनात देवावर असलेला विश्वास हा आपल्या आत्मविश्वासाचा आधार असतो. जेव्हा आपण एखाद्या संकटात सापडतो, तेव्हा देव आपल्याला मार्ग दाखवतो, धैर्य देतो आणि योग्य निर्णय घेण्याची प्रेरणा देतो. अनेक वेळा आपल्याला असे वाटते की, सगळं आपल्या विरोधात चाललं आहे, पण त्याच क्षणी काहीतरी अनपेक्षित घडतं आणि समस्या सुटते. हेच तर देवाचं अस्तित्व आहे. तो कधीच आपल्या आयुष्यातून दूर जात नाही, फक्त आपण त्याची उपस्थिती ओळखली पाहिजे.
सकारात्मक विचार म्हणजेच मनाची शक्ती. जर आपण रोज सकाळी उठून आजचा दिवस चांगला जाईल असा विचार केला, तर दिवस खरंच चांगला जातो. मन जे विचार करतं, तसंच आयुष्य घडतं; म्हणूनच नकारात्मक विचारांना मनात जागा देऊ नये. जे काही होतंय ते चांगल्यासाठीच होतं असा विश्वास ठेवला पाहिजे. देव आपल्याला प्रत्येक परीक्षेत काहीतरी शिकवतो आणि पुढच्या प्रवासासाठी मजबूत बनवतो.
अडचणी म्हणजे देवाने दिलेल्या परीक्षा. तो आपली सहनशीलता, धैर्य आणि श्रद्धा तपासतो. उदाहरणार्थ, एखाद्या विद्यार्थ्याला अपयश आल्यावर जर त्याने हार न मानता पुन्हा प्रयत्न केला, तर यश नक्कीच मिळतो. हा पुनःप्रयत्न म्हणजे देवावरचा विश्वास आणि सकारात्मकतेचा परिणाम. देव आपल्या पाठीशी असतो, पण आपण त्याच्याकडे मनापासून मदतीची प्रार्थना केली पाहिजे.
सकारात्मक विचार फक्त मन नाही, तर शरीरही निरोगी ठेवतात. जेव्हा मन शांत आणि आनंदी असतं, तेव्हा शरीरावर त्याचा थेट परिणाम होतो. चिंता किंवा राग या गोष्टी आपले मन आणि शरीर दोन्ही थकवतात; म्हणून दररोज काही वेळ ध्यान, प्रार्थना किंवा चांगले विचार वाचण्यात घालवला पाहिजे. हेच क्षण आपल्याला देवाजवळ नेतात आणि जीवनात समाधान देतात.
जर प्रत्येक व्यक्तीने देवावर विश्वास ठेवून सकारात्मक विचारांचा प्रसार केला, तर समाजातही शांतता आणि आनंद नांदेल. नकारात्मकता पसरवणाऱ्या गोष्टींपासून दूर राहून, इतरांना प्रोत्साहन देणं ही सुद्धा देवसेवा आहे. एखाद्याला आशेचा किरण दाखवणं म्हणजे त्याच्यामध्ये देवाची शक्ती जागवणं.
शेवटी एवढंच म्हणता येईल की, देव आपल्या जीवनाचा खरा मित्र, रक्षक आणि मार्गदर्शक आहे. तो आपल्याला रोज पाहत असतो, मार्ग दाखवत असतो, फक्त आपण त्याच्यावर विश्वास ठेवला पाहिजे आणि दररोज मनात सकारात्मक विचार जोपासले पाहिजेत. प्रत्येक दिवसाची सुरुवात श्रद्धा आणि आशेने केली, तर प्रत्येक संध्याकाळ समाधानाने संपते.
वर्धा हरमलकर