आज जगासमोर हवामानबदल, प्रदूषण आणि जैवविविधतेचं नुकसान यांसारखी गंभीर आव्हाने उभी आहेत. अशा वेळी डॉ. साने यांचा संदेश अधिक महत्त्वाचा ठरतो. त्यांनी दाखवून दिलं की शाश्वत जीवनशैली ही केवळ कल्पना किंवा स्वप्न नसून ती घराघरांतल्या साध्या निवडींमधून साकार करता येते.
डॉ.हेमा साने, ज्यांचे नुकतेच वयाच्या ८५ व्या वर्षी निधन झाले. या पुण्यातील प्रसिद्ध वनस्पतिशास्त्रज्ञ, शिक्षिका व लेखिका होत्या. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य वनस्पतींच्या अभ्यासासाठी आणि निसर्गाशी जवळीक साधून जगण्यासाठी अर्पण केले. १९४० साली जन्मलेल्या डॉ. साने यांनी वनस्पतिशास्त्रात एम.एस्सी. आणि पीएच.डी. पूर्ण केली तसेच इंडॉलॉजीचेही अध्ययन केले, ज्यामुळे त्यांना विज्ञान, इतिहास आणि संस्कृती यांचा सुंदर संगम साधता आला. १९६२ साली त्या पुण्यातील आबासाहेब गरवारे महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून रुजू झाल्या आणि जवळपास चाळीस वर्षे अध्यापन करून २००० साली वनस्पतिशास्त्र विभागप्रमुख म्हणून निवृत्त झाल्या. विद्यार्थ्यांच्या मते त्या अपार ज्ञान असलेल्या, वनस्पतींविषयी गाढ प्रेम बाळगणाऱ्या आणि “चालती बोलती वनस्पतींची विश्वकोश” अशा होत्या.
शिक्षणाबरोबरच त्यांनी ३० हून अधिक पुस्तके लिहिली. Medicinal Plants, Plant Morphology and Anatomy, कहाणी मसाल्यांची, बुद्ध परंपरा आणि बोधिवृक्ष, तसेच मार्ग शाश्वत विकासाचा ही त्यांची प्रसिद्ध पुस्तके आहेत. त्यांच्या लेखनातून वनस्पती हे केवळ विज्ञानाचा भाग नसून मानवी जीवनाचा, आरोग्याचा आणि संस्कृतीचा अविभाज्य घटक आहेत हे त्यांनी दाखवून दिले. अन्न, औषधी, निवारा आणि प्रेरणा देणाऱ्या वनस्पतींविषयीचे परंपरागत ज्ञान जपणे आणि जैवविविधतेचे संरक्षण करणे किती आवश्यक आहे हे त्यांनी खूप आधीपासून मांडले.
डॉ. साने यांचं खरं वैशिष्ट्य त्यांच्या जीवनशैलीत दिसत होते. पुण्याच्या बुधवार पेठेतील जुन्या वाड्यात त्या अनेक दशकांपासून विजेशिवाय राहत होत्या. त्यांनी कधीही घरात वीज कनेक्शन घेतले नाही. दिवसाचा उजेड, सुरुवातीला कंदिल, नंतर छोट्या सौरदिव्यावर त्या अवलंबून राहिल्या. घरात फ्रीज, पंखा किंवा दूरदर्शन नव्हते. त्या नेहमी म्हणायच्या, "वीज ही माणसाची मूलभूत गरज नाही, अन्न, वस्त्र आणि निवारा एवढं पुरेसं आहे." अनेकदा त्या विनोदी पद्धतीने पाहुण्यांना विचारायच्या, “तुम्ही विजेसह कसे राहता?”
त्यांच्या घरात मांजरे, पक्षी, अगदी मुंगूससुद्धा मुक्तपणे राहत असत. भोवतालच्या झाडांना त्या घरचे सदस्य मानायच्या आणि हे घर माझे नाही, त्यांचे आहे असे म्हणायच्या. साधेपणाने आणि निसर्गाशी तादात्म्य पावून राहणे ही त्यांची जीवनशैली होती. ही साधी जीवनपद्धती गरीबीमुळे नव्हती, तर जाणीवपूर्वक घेतलेला निर्णय होता, कारण त्या मानायच्या की माणसाने पृथ्वीवर हलक्याच पावलांनी चालले पाहिजे.
निवृत्तीनंतरही त्यांनी लेखन सुरू ठेवले. त्यांच्या पुस्तकांतून त्यांनी विज्ञान साध्या आणि सोप्या भाषेत मांडले, ज्यामुळे सामान्य माणसांनाही ते सहज समजले. त्या फक्त वैज्ञानिकच नव्हत्या तर समाजाला दिशा देणाऱ्या मार्गदर्शकही होत्या. विज्ञान, तत्त्वज्ञान आणि आचरण यांचा सुंदर संगम त्यांच्या आयुष्यात दिसून येतो. त्यांनी निसर्गसंरक्षणाचा केवळ उपदेश केला नाही तर स्वतः ते आपल्या दैनंदिन जीवनात पाळले.
डाॅ. साने यांचे आयुष्य विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी, वाचकांसाठी ज्ञानदायी, शेजाऱ्यांसाठी आदरणीय आणि पर्यावरणवाद्यांसाठी आदर्श होते. अनेकांना त्यांची जीवनशैली वेगळी वाटली, पण त्यांच्या धाडसाचे आणि आत्मशिस्तीचे कौतुक नक्कीच झाले. त्यांचे निधन ही केवळ पुण्यासाठीच नव्हे तर संपूर्ण वनस्पतिशास्त्र क्षेत्रासाठी मोठी हानी आहे. तरीसुद्धा त्यांची जीवनकहाणी आजही प्रेरणा देते की खरी संपत्ती वस्तूंमध्ये नसून ज्ञान, मूल्ये आणि निसर्गाशी असलेल्या नात्यात आहे.
आज जगासमोर हवामानबदल, प्रदूषण आणि जैवविविधतेचं नुकसान यांसारखी गंभीर आव्हाने उभी आहेत. अशा वेळी डॉ. साने यांचा संदेश अधिक महत्त्वाचा ठरतो. त्यांनी दाखवून दिलं की शाश्वत जीवनशैली ही केवळ कल्पना किंवा स्वप्न नसून ती घराघरांतल्या साध्या निवडींमधून साकार करता येते. त्यांच्या पुस्तकांतून, अध्यापनातून आणि वेगळ्या जीवनपद्धतीतून त्यांनी अशी परंपरा निर्माण केली आहे जी पुढील अनेक वर्षे विद्यार्थ्यांना, वैज्ञानिकांना आणि सामान्य माणसांना मार्गदर्शन करत राहील. समृद्ध जीवन हे जास्त उपभोगात नसून निसर्गाची जाण, जीवनाचे भान आणि साधेपणात आहे, हेच त्यांनी जीवनभर शिकविले.
- डॉ. सुजाता दाबोळकर