मुले ही समाजाचे भविष्य आहेत. ते आपल्याला पाहून घडतात. आपण जसे बोलतो, वागतो, वागताना जसा आदर्श ठेवतो, तसाच समाज उद्या उभा राहतो. त्यामुळे, आपल्या प्रत्येक कृतीचा विचारपूर्वक उपयोग केला पाहिजे.
अाजच्या धावपळीच्या जीवनशैलीत माणसाचा स्वभाव, बोलण्याची ढब आणि वागणूक यामध्ये मोठे बदल होताना दिसतात. समाजात आपण अनेकदा पाहतो की लोक एकमेकांशी तुच्छतेने बोलतात, अपशब्दांचा वापर करतात किंवा अगदी किरकोळ कारणावरूनही भांडतात. हे वर्तन फक्त त्या क्षणापुरते मर्यादित राहत नाही, तर लहान मुलांच्या मनावर खोलवर ठसा उमटवते. मुले ही कोऱ्या पाटीसारखी असतात. त्यांच्यावर घरातील वातावरण, शेजार, शाळा आणि समाजातील वागणुकीचे रंग उमटतात. म्हणूनच, मोठ्यांनी आपल्या वर्तनाची जबाबदारी स्वीकारली पाहिजे.
मुले म्हणजे आई-वडिलांचा, शिक्षकांचा आणि समाजाचा आरसा असतो. आपण जसे बोलतो, वागतो, वागणुकीतून काय दाखवतो, त्याचे प्रतिबिंब थेट त्यांच्या व्यक्तिमत्त्वात उमटते. मुले मोठ्यांच्या प्रत्येक कृतीकडे बारकाईने पाहतात. एखादे मूल आईला रागाने उत्तर देताना बघते आणि नंतर नकळत तसेच उत्तर द्यायला शिकते. उलट, जर पालक शांतपणे, संयमाने समस्या सोडवत असतील तर त्यातून मुलाला संयमाचे महत्त्व कळते. त्यामुळे, मुले शिकवलेल्या गोष्टींपेक्षा पाहिलेल्या गोष्टींवरून जास्त शिकतात, ही म्हण तर आपण ऐकलीच आहे. आपल्या बोलण्यातली गोडी, सौजन्य किंवा उद्धटपणा मुले थेट आत्मसात करतात. अनेकदा घरात पालक एकमेकांशी अपशब्द वापरतात, टीका करतात, एकमेकांचा अपमान करतात. हे पाहिलेली मुले नकळत अशाच भाषेत बोलायला लागतात. दुसरीकडे, जर पालक सौम्य भाषेत संवाद साधत असतील, एकमेकांचे कौतुक करत असतील, तर मुलांच्या बोलण्यातही गोडवा येतो. लहान मुले ऐकून घेण्यापेक्षा, ऐकून घेऊन पुनरावृत्ती करण्यात पटाईत असतात. त्यामुळे, मोठ्यांनी बोलताना शब्दांची निवड काळजीपूर्वक करायला हवी.
मुलांना फक्त शब्दांनी नाही, तर वागण्यातून जास्त शिकायला मिळते. उदाहरणार्थ, एखाद्या वडिलांनी रस्त्यावर वाहतूक सिग्नल तोडला, तर मूलही समजून घेते की नियम मोडणे चुकीचे नाही. त्याचप्रमाणे, बसमध्ये जागा पाहिजे असलेल्या वृद्धाला जागा दिली तर मुले आपोआप इतरांचा सन्मान करायला शिकतात. लहान मुले ही पाहिलेली प्रत्येक गोष्ट खेळताना किंवा वागण्यातून व्यक्त करतात. म्हणूनच, त्यांना योग्य आदर्श दाखवणे ही मोठ्यांची सर्वात मोठी जबाबदारी आहे.
आजची पिढी मोबाईल, टीव्ही आणि सोशल मीडियामध्ये वाढत आहे. घरात जर सतत उग्र वादविवादाचे कार्यक्रम पाहिले जात असतील किंवा सोशल मीडियावर टीका-टिप्पणी करणारी भाषा वापरली जात असेल, तर मुले तशीच वाणी आत्मसात करतात. माध्यमांचा प्रभाव टाळता येत नाही, म्हणून पालकांनी काय पाहावे, काय टाळावे, हे ठरवणे गरजेचे आहे. मुलांना सकारात्मक, शैक्षणिक आणि प्रेरणादायी गोष्टी दाखवल्या तर त्यांचा स्वभावही सकारात्मकतेकडे वळतो. घर हेच मुलांची पहिली शाळा असते. घरात आई-वडिलांचे नाते चांगले, प्रेमळ असेल, तर मुलेही शांत, समजूतदार बनतात. उलट, घरात सतत भांडणे, वाद, अपमान होत असेल, तर मुलांच्या मनावर त्याचा नकारात्मक ठसा उमटतो. घरातला प्रत्येक छोटा प्रसंग- जेवताना गप्पा मारणे, एकमेकांची विचारपूस करणे, पाहुण्यांचा सन्मान करणे- हे सर्व मुलांसाठी शिकण्याची शाळा असते. म्हणून, पालकांनी घरचे वातावरण सुरक्षित, आपुलकीचे आणि सकारात्मक ठेवणे फार महत्त्वाचे आहे.
मुले जितकी घरातून शिकतात, तितकीच शाळेतूनही शिकतात. शिक्षक हा विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील मोठा आदर्श असतो. शिक्षक मुलांशी कसे वागतात, चुका दाखवताना कोणती भाषा वापरतात, विद्यार्थ्यांच्या कल्पनांना कसे प्रोत्साहन देतात, यावरून मुलांची शैक्षणिक तसेच वैयक्तिक प्रगती घडते. शाळेचे वातावरणही मुलांना शिस्त, सहकार्य आणि आदर शिकवते. म्हणूनच, शिक्षकांची वागणूक ही समाजात संस्कार घडवण्याचा महत्त्वाचा घटक आहे. फक्त पालक किंवा शिक्षक नव्हे, तर प्रत्येक समाजातील व्यक्तीची जबाबदारी आहे. सार्वजनिक ठिकाणी सभ्यता पाळणे, शेजाऱ्यांशी सौजन्याने वागणे, वाहतुकीचे नियम पाळणे, स्वच्छतेची काळजी घेणे- हे सर्व समाजातील प्रत्येक वर्तन मुलांच्या डोळ्यांसमोर घडत असते. त्यामुळे, प्रत्येकाने आपल्या वर्तनाने समाजाचे उत्तम उदाहरण मुलांसमोर ठेवणे गरजेचे आहे. आपण कसे वागतो, त्यावरून उद्याचा समाज कसा असेल हे ठरते.
समाजात अशी अनेक उदाहरणे आहेत जी मुलांसाठी प्रेरणादायी ठरतात. एखाद्या मुलाने आपल्या आई-वडिलांना वृद्धाश्रमाऐवजी घरी सन्मानाने ठेवताना पाहिले, तर त्याच्यात कृतज्ञतेची भावना जागी राहते. एखाद्या शिक्षकाने वर्गात एखाद्या गरीब विद्यार्थ्याला मदत केली, तर मुलांमध्ये सहानुभूती विकसित होते. चांगल्या गोष्टींची छोट्या-छोट्या कृतींतून प्रेरणा मिळते. त्यामुळे, सकारात्मक उदाहरणे निर्माण करणे ही आपली जबाबदारी आहे. पालकांनी मुलांशी नियमित संवाद साधावा, त्यांच्या मनातल्या शंका-प्रश्न ऐकून घ्यावेत. शिक्षकांनी मुलांना फक्त अभ्यासाचे नाही, तर आयुष्याचे धडे द्यावेत. समाजाने सार्वजनिक ठिकाणी सभ्यतेचे भान ठेवावे. स्वतःच्या वागणुकीवर नियंत्रण ठेवणे, रागाऐवजी संयम दाखवणे, टीकेऐवजी कौतुक करणे आणि दोष दाखवण्याऐवजी उपाय सुचवणे, या छोट्या गोष्टींमुळेच मुलांमध्ये योग्य संस्कार वाढतात.
मुले ही समाजाचे भविष्य आहेत. ते आपल्याला पाहून घडतात. आपण जसे बोलतो, वागतो, वागताना जसा आदर्श ठेवतो, तसाच समाज उद्या उभा राहतो. त्यामुळे, आपल्या प्रत्येक कृतीचा विचारपूर्वक उपयोग केला पाहिजे. आज आपण आपल्या मुलांना जे शिकवतो, तेच उद्या त्यांच्या वागणुकीत, त्यांच्या संस्कृतीत आणि शेवटी संपूर्ण समाजात दिसणार आहे. म्हणूनच, मोठ्यांनी नेहमी लक्षात ठेवायला हवे- मुले आपल्याकडून शिकतात, म्हणून आपली वागणूक हीच त्यांच्या संस्काराची पायरी आहे.
वर्धा हरमलकर
भांडोळ