महिलांमधील शारीरिक व्याधी आणि आत्महत्येचा संबंध

समाजात आत्महत्या हा एक गंभीर आरोग्यविषयक आणि सामाजिक प्रश्न आहे. महिला आत्महत्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. जागतिक नोंदीनुसार भारतात महिलांच्या आत्महत्येचे प्रमाण ४०% एवढे आहे. म्हणजेच जगातील १० महिलांच्या आत्महत्यांमागे ४ महिला भारतीय आहेत.

Story: आरोग्य |
8 hours ago
महिलांमधील शारीरिक व्याधी आणि  आत्महत्येचा  संबंध

महिलांमध्ये आत्महत्या ही केवळ मानसिक आरोग्याशी संबंधित नसून, यामागे अनेक सामाजिक, मानसिक, आर्थिक  किंवा इतर कारणे असू शकतात. यामधील शारीरिक आजार आणि मानसिक आरोग्य यांच्यातील परस्परसंबंध बहुतांश वेळा आपल्या समाजातील मानसिकतेमुळे समजून घेतला जात नाही. यामुळे एका महत्त्वाच्या पैलूचा विचार अनेकदा दुर्लक्षित राहतो – तो म्हणजे शारीरिक व्याधी आणि आत्महत्येतील संबंध. या लेखामध्ये आपण हेच पाहणार आहोत की कसे दीर्घकालीन किंवा तीव्र शारीरिक व्याधी, हार्मोनल बदल, वेदना आणि सामाजिक अनास्था, महिलांना मानसिकदृष्ट्या कोलमडायला भाग पाडतात व आत्महत्येचे विचार मनात रूजू शकतात.

राष्ट्रीय गुन्हे नोंदवणी २०२३ नुसार, आत्महत्या करणाऱ्या महिलांमध्ये मोठ्या प्रमाणावर म्हणजे सुमारे ५० % गृहिणी असतात. महिलांमध्ये आत्महत्येची प्रमुख कारणे - कौटुंबिक कलह, मानसिक आजार व शारीरिक आजार असू शकतात. यातील शारीरिक आजार हे विशेष करून मध्यमवयीन आणि वृद्ध महिलांमध्ये दिसून येतात. अभ्यासानुसार, शारीरिक आजार असलेल्या महिलांमध्ये आत्महत्येच्या विचारांची शक्यता दुहेरी असते.

शारीरिक आजार आणि त्यांचे मानसिक परिणाम

महिलांना भेडसावणारे अनेक शारीरिक आजार हे फक्त शरीरापुरतेच मर्यादित नसतात, जसे की

दीर्घकालीन शारीरिक आजार:

 कर्करोग (स्तन कॅन्सर, सर्वाय्कल कॅन्सर इत्यादी ) – उपचारांच्या प्रभावामुळे सौंदर्य, मातृत्व, लैंगिकता यांच्याशी संबंधित भावना दुखावल्या जाणे, आत्मसन्मान कमी होणे यामुळे मानसिक आरोग्य खालावू शकते.

 थायरॉईड विकार – थकवा, वजन वाढ/कमी होणे, मूड स्विंग्स, चिंता आणि नैराश्य येणे.

 हार्मोनल असंतुलन (पीसीओएस, पीएमएस, मेनोपॉज) व इतर मासिक पाळी संबंधित विकार – हार्मोनल असंतुलनामुळे तणाव, गर्भधारणेची अडचण, शरीराविषयी आत्मगंड निर्माण होणे.

 थकवा आणि रक्तक्षय 

-दैनंदिन वेदनादायक स्थिती:

 मायग्रेन किंवा तीव्र डोकेदुखी – सतत डोकेदुखी मानसिक थकवा निर्माण करते.

 स्नायू-वेदना (फाय्ब्रोमायाल्जिया) – हे महिलांमध्ये अधिक प्रमाणात आढळते, ज्यामुळे झोपेचा अभाव व नैराश्य निर्माण होते.

-प्रसूतीनंतरची मानसिक स्थिती 

* पोस्ट पार्टम डीप्रेशन, अॅन्जायटी आणि सायकोसिस – या स्थिती गंभीर आत्महत्येच्या विचारांना कारणीभूत ठरू शकतात.

हे सर्व आजार महिलांच्या मानसिक स्वास्थ्यावर खोल परिणाम करतात. जेव्हा शारीरिक वेदना सातत्याने असतात आणि त्याला सामाजिक आधार किंवा समजून घेणारी सोबत मिळत नाहीत, तेव्हा नैराश्य वाढते आणि आत्महत्येच्या विचारांकडे झुकाव होऊ शकतो.

दीर्घकालीन शारीरिक व्याधींमुळे सामाजिक आणि मानसिक पैलूंवरही परिणाम दिसून येतो.

॰कमी महत्त्व दिले जाणे: अनेक महिलांचे आजार हे “मनाचे भास आहेत” म्हणून दुर्लक्षित केले जातात. शारीरिक आजारांची तक्रार केल्यावरही, त्यांचे म्हणणे गांभीर्याने घेतले जात नाही. वैद्यकीय तपासण्या उशिरा होतात किंवा होतच नाहीत.

॰एकटेपणा आणि दुर्लक्ष: महिलांच्या वेदनेकडे दुर्लक्ष केले गेल्याने व सहानुभूती न मिळाल्याने एकटेपणा वाटू शकतो. वृद्ध, विधवा किंवा आर्थिकदृष्ट्या अवलंबून असलेल्या महिलांमध्ये ही भावना अधिक तीव्रपणे दिसून येते.

॰वैयक्तिक जीवनावर परिणाम: आजारामुळे प्रजननक्षमता कमी होणे, गर्भधारणेतील अडचणी यामुळे आत्ममूल्य कमी होणे तसेच लैंगिक आरोग्य बिघडल्यामुळे वैवाहिक संबंधांमध्ये ताण येऊ शकतो.

वरील कारणांमुळे असहाय्य वाटणे, आपण इतरांवर ओझे असल्याची भावना निर्माण होणे, कार्य व निर्णयक्षमतेवर परिणाम होणे, जगण्याची आस्था कमी होणे या सारख्या आत्महत्येच्या साखळीच्या मानसिक प्रक्रिया वाढत जातात. अशा वेळेस वारंवार मृत्यूचा किंवा आपण नसण्याचा उल्लेख करणे, एकटे व अलिप्त राहणे, औषधे घेणे थांबवणे, आपल्या वस्तू वाटून टाकणे, “आपल्याशिवाय सगळे ठीक होईल” सारख्या गोष्टी बोलून दाखविणे हे आत्महत्येच्या दिशेने जाणारे इशारे आपण उमगून घेणे आवश्यक आहे.

उपचार आणि मार्गदर्शन
-मानसिक आरोग्य सुधारणे:

दीर्घकालीन आजारामध्ये समुपदेशन, कोग्नीटीव बीहेवीयरल थेरपी, सपोर्ट ग्रुप्समध्ये इतर महिलांशी संवाद साधल्याने मदत मिळू शकते. 

 कौटुंबिक आणि सामाजिक पाठबळ देणे:

संवाद वाढवणे, महिलांच्या वेदनांकडे सहानुभूतीने पाहणे, आधार देणारे कौटुंबिक वातावरण निर्माण करणे यामुळे स्थिती सुधारली जाऊ शकते.

 सामाजिक पातळीवर मदत उपलब्ध करणे:

महिलांना मदतीसाठी मानसिक आरोग्य केंद्रे उभारणे, हेल्पलाइन उपलब्ध करणे, प्राथमिक पातळीवर आरोग्य शिक्षण देणे यामुळे त्यांना योग्य मार्गदर्शन मिळू शकते.

दरवर्षी १० सप्टेंबरला जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिवस साजरा केला जातो. या दिवसाची या वर्षीची थीम ‘आत्महत्येबद्दलचा दृष्टिकोन बदलणे’ होती. म्हणजेच महिलांचा आत्महत्येच्या दिशेने जात असलेला दृष्टिकोन बदलणे तसेच बाकी सगळ्यांचा तो बदलण्यासाठी हवी असलेली जाणीव तयार होणे आवश्यक आहे. शारीरिक व्याधी ही आत्महत्या घडवणारी 'सायलेंट किलर' ठरू शकते – ती वेळीच ओळखून, योग्य वेळी आटोक्यात आणणे हे आपले सामाजिक कर्तव्य आहे.


डॉ. श्वेता राऊत मुळगावकर