चालता चालता मात्र मावशीने हजारो शिव्यांच्या लाखोल्या त्यावेळी त्या झाडावरच्या भुताला वाहिल्या. दुसऱ्या दिवशी सकाळी घडलेला प्रकार त्यांनी सर्वांना सांगितला. सर्वांनी आईच्या मावशीच्या धाडसाचे कौतुक केले. पण त्या दिवसापासून आईने सुट्टीच्या दिवसात मावशीकडे राहायला जाणे बंद केले.
माझी आई ही मूळची म्हापशाची. तिच्या मावशीचे घर बोर्डे, डिचोली इथे आहे. लहान असताना आई दिवाळीच्या सुट्टीत आपल्या मावशीकडे डिचोलीला राहायला जायची. मावशीची मुलगी तिच्याच वयाची होती, त्यामुळे दोघींनाही मजा येई.
ही गोष्ट १९९० मधील असेल. त्यावेळी प्रत्येक घरात आता आहेत तशी पाण्याची व स्वच्छतागृहाची सोय नव्हती. त्यामुळे परसाकडे जाण्यासाठी लोक घरापासून लांब झाडीत जात असत. रात्रीची अशी बाहेर जाण्याची पाळी आल्यास कोणालातरी घेऊन जावे लागत असे.
एकदा असेच दिवाळीच्या सुट्टीत आई मावशीकडे राहायला आली असताना, रात्री बाहेर जाण्याची वेळ आली. आईबरोबर मावशी पण होती. आईची मावशी खूप धीट होती. ती कुठल्याही वेळी घराबाहेर जाण्यास घाबरत नसे. ज्यावेळी त्या दोघी झाडापाशी बसल्या, त्यावेळी त्यांना पाठ करून तिथेच दगडावर झाडाच्या खाली पांढऱ्या रंगाची साडी नेसून एक बाई पाठमोरी बसलेली दिसली. अचानक केस जळल्यासारखा उग्र वास येऊ लागला. आई 'शी शी' करू लागली. मावशीने तिला गप्प राहण्याचा इशारा केला. आईला त्यावेळी लहान असल्यामुळे तेवढी समज नव्हतीच. त्यांचे झाल्यावर आई व मावशी परतल्या व आईने मावशीला विचारले, "ती बाई उठत का नव्हती? कोण आहे ती?"
मावशीने ती आपली गंमत करत आहे म्हटले व आपणही तिची गंमत करू, तू डोळे बंद कर म्हटले व आईचा हात घट्ट पकडला. मावशीने परतून त्या जागेवर पाहिले, तर तिला झाडावर लोंबणारी हडळ दिसली. मावशीला ती झाडावरची हडळ त्यापूर्वी खूपदा दिसली होती. आई घाबरू नये म्हणून मावशीने 'तुझी गंमत करते' म्हणून डोळे झाकूनच तिला हात पकडून घरी आणले. घडलेल्या प्रकाराला मावशी घाबरली नाही व त्यावेळी ती मोठमोठ्याने शिव्या घालत चालत राहिली. त्यावेळी मावशीने आईला काहीच सांगितले नाही.
चालता चालता मात्र मावशीने हजारो शिव्यांच्या लाखोल्या त्यावेळी त्या झाडावरच्या भुताला वाहिल्या. दुसऱ्या दिवशी सकाळी घडलेला प्रकार त्यांनी सर्वांना सांगितला. सर्वांनी आईच्या मावशीच्या धाडसाचे कौतुक केले. पण त्या दिवसापासून आईने सुट्टीच्या दिवसात मावशीकडे राहायला जाणे बंद केले. कारण झाडावरच्या हडळीला शिव्यांनी घाबरवण्याची ताकद फक्त मावशीकडेच आहे.
श्रुती नाईक परब