घडतंय आपल्यासमोर पण विचार करायचंच थांबवलंय!

'एकमेकां साह्य करू अवघे धरू सुपंथ' या विचारावर आपण आज चालतो का? देवाने प्रत्येकाला माणूस म्हणून जन्माला घातलेले आहे. म्हणूनच इतरांच्या वेदना समजून घेणे, त्यावर योग्य मार्ग काढणे हे माणसाचे मुख्य कार्य आहे. त्यामुळे स्वतःला माणुसकीत बहाल केले गेले तर काय हरकत आहे?

Story: ललित |
8 hours ago
घडतंय आपल्यासमोर पण विचार करायचंच थांबवलंय!

आजचा काळ व्यस्त आहे तर आजची  वेळ ही धावपळीची आहे. अशा धावपळीच्या युगात माणूस जीवन जगत आहे. पण जीवन जगताना आपल्या सभोवताली माणूस दुर्लक्ष करत आहे. 

खरंच असं आहे का? हा प्रश्न प्रत्येकाला पडणे गरजेचे आहे कारण आज माणूस प्रत्येक वाईट घटना स्वतःच्या डोळ्यांनी पाहतो, पण त्याकडे पाठ फिरवतो. आज प्रत्येकाला स्वतःची वेळ, स्वतःची कार्ये महत्त्वाची झालेली आहेत त्यामुळे दुसऱ्याकडे दुर्लक्ष करणे आज माणसांचा मुख्य स्वभाव बनलेला आहे. 

समाजात आज अनेक वाईट गोष्टी व घटना घडतात, पण त्यांची माहिती असूनही नसल्यासारखी करणारी माणसे आज समाजात भेटतात. आज आपण पाहायला गेलो तर अर्थहीन झालेल्या रस्त्यांचा एक महत्त्वाचा विषय बनलेला आहे. सगळीकडे रस्त्यांना खड्डे पडलेले आहेत. प्रत्येक माणूस त्यात गुरफटून जात आहे. त्यामुळे आज कित्येक माणसे अपघातामध्ये बळी पडत आहेत. अशा या गोष्टी माणूस पाहत असतो पण त्यावर आवाज मात्र कुणीही उठवत नाहीत आणि जरी यावर काही बोलले गेले तर उलट दोन दिवसांनी या गोष्टीवर पाठ फिरवली जाते. अर्थात, 'डोळ्यांनी पाहणे पण दुर्लक्ष करणे' या पध्दतीने समाजातील लोकांना आज सहाय्य केले जाते.

समाजात आजही गरिबी दिसून येते. आज रस्त्याच्या बाजूला, अनेक लहान - लहान मुले झोपलेली दिसतात. त्यांच्या पोटात अन्नाचा एक कण देखील जात नाही. भर रस्त्यावर ट्रॅफिक मध्ये देखील ही मुले पैसे मागायला फिरतात. पायात त्यांच्या चपला सुद्धा नसतात आणि रणरणत्या उन्हात अशी मुले चटके सोसत स्वतःचे पोट भरण्यासाठी फिरत असतात. आपण जे अन्न बाहेर फेकतो ते उचलून खाणारी हीच मुले असतात. पण समाजातील लोकांना याची जाणीव देखील होत नसते. कारण काय तर आज जीवन हे दुसऱ्यापेक्षा स्वतः पुरते मर्यादित झालेले आहे. 

वृद्धांची उपेक्षा हा विषय समाजात आजही रूढ आहे. आज मुलाबाळांनीच बाहेर सोडून दिलेले, आसरा नसलेले आई-वडील कधी रस्त्याच्या कडेला दिसतात तर कधी वृद्धाश्रमात दिवस घालवीत असतात. स्वतःची मुले जन्मदात्या आई-वडिलांना बेघर करतात. आई - वडील म्हणतात की, 'म्हातारपण वाईट असतं' पण खरं म्हणजे आपणच वाईट असतो. कारण त्यांची सेवा करण्याशिवाय आपण त्यांना त्यांच्या वृद्धपणात नाकारतो. समाजातील व्यक्तींना याची जाणीव नसते पण क्वचित अशी मने भेटतात ज्यांना या सगळ्यांचे दुःख होत असते. त्यामुळे प्रश्न पडतो की, माणसांच्या भावना गेल्या कुठे? आणि माणूस इतका मोठा झाला आहे का की तो स्वतःच्या आई-वडिलांना देखील नाकारू शकतो? 

आज स्त्रीला समाजात स्वतंत्र्य आहे का? प्रत्येक ठिकाणी व जगाच्या प्रत्येक कोपऱ्यात आज एक मुलगी, एक स्त्री, एक महिला सुरक्षित आहे का?. तिच्यावर होणारे बलात्कार, तिचा छळ, तिच्यावर होणारा अन्याय या सर्व वाईट गोष्टींची जाणीव समाजाला असते पण आवाज उठवणे कोणालाही जमत नाही. इतकेच नव्हे तर घरातदेखील महिलांचे शोषण होते. प्रत्येक शोषित स्त्री 'हे घरचं प्रकरण आहे' असे म्हणून शांत राहते. आपण एका स्त्रीचे दुःख ऐकतो, पाहतो पण आपण स्वतः त्यावर काही बोलत नाही. कारण दुसऱ्याच्या मध्ये पडणे ही गोष्ट आज समाज मान्य करत नाही. म्हणूनच, कदाचित आज जी स्त्री घाव सोसत असते ती स्वतःच्या मानसिक आरोग्याकडे देखील दुर्लक्ष करते. कारण आपण कधीही विचारपूस करत नाही आणि जेव्हा वेळ निघून जाते तेव्हा आपण म्हणतो, 'शेवटपर्यंत ती हसत होती, म्हणून तिचे दुःख आम्हाला दिसले नाही'.

भ्रष्टाचाराचा विषय समाजासाठी काही नवीन नाही. गरिबांचे हक्क लुबाडले जातात. त्यांना गुरफटून त्यांचेच पैसे श्रीमंत माणूस खातो. आज समाजात अनेक गोष्टी आहेत ज्याकडे आपण दुर्लक्ष करतो. एक माणूस म्हणून माणुसकीच्या रूपाने दुसऱ्याला मदत न करता आपण फक्त बघत बसतो. आपल्या आजूबाजूला आज जग कोसळत चाललेले आहे पण आपण त्याकडे बघणेच विसरलो आहोत. त्यामुळे समाजातील प्रत्येक व्यक्तीने आज स्वतःबरोबर दुसऱ्याचा देखील विचार करणे महत्त्वाचे आहे.

'एकमेकां साह्य करू अवघे धरू सुपंथ' या विचारावर आपण आज चालतो का? देवाने प्रत्येकाला माणूस म्हणून जन्माला घातलेले आहे. म्हणूनच इतरांच्या वेदना समजून घेणे, त्यावर योग्य मार्ग काढणे हे माणसाचे मुख्य कार्य आहे. त्यामुळे स्वतःला माणुसकीत बहाल केले गेले तर काय हरकत आहे? कारण जर समाजातील प्रत्येक वाईट गोष्ट आपल्याला बदलायची असेल तर ती एकट्याने होणे अशक्य आहे त्यामुळे जेव्हा सर्व समाज एकत्र येऊन एकजुटीने कार्य करेल तेव्हाच समाजात माणूसकीचा विजय होऊ शकतो आणि प्रत्येकाच्या दुःखांना, वेदनांना सावरण्याचा मार्ग निघू शकतो. त्यामुळे फक्त डोळ्यांनी पाहण्यापेक्षा स्वतःचे विचार कृतीत उतरविणे गरजेचे आहेत. कारण आज 'दृष्टी आहे पण दृष्टिकोन मात्र हरवत चाललेला आहे'.


पूजा भिवा परब

 पालये, पेडणे