बार्देश बाजारच्या निवडणूक उमेदवारी शुल्कावरून भागधारकांची नाराजी

उमेदवारी अर्ज शुल्क १०० वरून २ हजार रुपये : प्रथमच १० हजार अनामत शुल्क

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
6 hours ago
बार्देश बाजारच्या निवडणूक उमेदवारी शुल्कावरून भागधारकांची नाराजी

म्हापसा : बार्देश बाजार ग्राहक सहकारी सोसायटीच्या संचालक मंडळाची निवडणूक ५ ऑक्टोबर रोजी होणार आहे. या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज शुल्कात अनेक पटींनी वाढ करण्यात आली असून यावेळी प्रथमच अनामत शुल्क म्हणून १० हजार रुपये रक्कम लागू केल्याबद्दल भागधारक तसेच इच्छुक उमेदवारांनी नाराजी व्यक्त केली आहे.
सहकारी सोसायटीचे उत्तर गोवा सहाय्यक निबंधक तथा बार्देश बाजारचे निवडणूक अधिकारी रामेश्वर दाबोळकर यांनी सोसायटीच्या निवडणुकीची वेळापत्रक नोटीस जारी केली आहे. या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज रक्कम २ हजार रुपये करण्यात आली आहे. गेल्यावेळी ही रक्कम फक्त १०० रुपये होती. तसेच अनामत रक्कम शून्य होती.
बार्देश बाजारच्या २०२५-३० या कालावधीसाठी संचालक मंडळाची निवडणूक ५ ऑक्टोबर रोजी सकाळी ८ ते ५ वाजेपर्यंत होणार आहे. गोवा सहकारी संस्था नियम २००३च्या नियम ६४ नुसार उमेदवारी अर्ज प्रत्येक २०० रुपये आणि १० हजार रुपये अनामत शुल्क भरून मिळू शकेल, असे या नोटिसीद्वारे कळविण्यात आले आहे. सहकार क्षेत्र हे सर्वसामान्यांसाठी आहे आणि शुल्क वाढवल्यामुळे सामान्य माणूस या क्षेत्रापासून दूर जाईल, असे मत सोसायटीच्या भागधारकांनी व्यक्त करत वाढीव शुल्कावर नाराजी व्यक्त केली आहे.

शुल्कवाढ न परवडणारी : खलप
सोसायटीचे माजी अध्यक्ष निखिलचंद्र खलप म्हणाले की, उमेदवारी अर्जासाठी शुल्क १०० रुपयांवरून २ हजार रुपये करण्यात आल्याने मला धक्का बसला आहे. शुल्क इतके वाढवता कामा नये. सहकार क्षेत्र सर्वसामान्य माणसासाठी असल्याने ही वाढ परवडणारी असायला हवी होती. हे क्षेत्र सामान्य माणसासाठी बनवले आहे आणि ते त्यांना परवडू शकतील व सर्वांसाठी स्वागतार्ह असले पाहिजे.

सर्वसामान्य भागधारक निवडणूक कसे लढणार?
माजी उपाध्यक्ष नारायण राटवड यांनीही शुल्क वाढीवर नाराजी व्यक्त केली. गेल्या निवडणुकीत उमेदवारी शुल्क हे १०० रुपये होते. जे सर्वांना परवडणारे होते. मात्र यंदा ते २ हजार करण्यात आले आहे, जे समर्थनीय नाही. गेल्या निवडणुकीत अनामत शुल्कही नव्हते. परंतु यावेळी हे शुल्क लागू करण्यात आले आहे, ज्यामुळे सर्वसामान्य भागधारक निवडणूक लढण्यापासून वंचित राहू शकेल. कारण आता बार्देश बाजारची निवणूक लढवण्यासाठी किमान १२ हजार रुपये आवश्यक आहेत, असे ते म्हणाले.