एफडीएची कारवाई : राज्यातील हॉटेल्सना होत होता पुरवठा

म्हापसा : गोव्यात अन्न व औषध प्रशासन (एफडीए) सतत छापासत्र कारवाया राबवत असून, या कारवायांमधून राज्यात अनेक ठिकाणी बनावट व दर्जाहीन अन्नपदार्थांचे जाळे उघडकीस येत आहे. अशाच कारवाईत म्हापसा येथील गावसावाडा भागात सुरू असलेल्या एका बेकायदा दही तयार करणाऱ्या युनिटवर शुक्रवारी (दि. १२) सकाळी एफडीएच्या पथकाने छापा टाकला.
सदर युनिट गेली तीन वर्षे कोणत्याही कायदेशीर परवानगीशिवाय कार्यरत होते. गलिच्छ जागेत चालणाऱ्या या आस्थापनात दही, पनीर आणि इतर दुग्धजन्य पदार्थ तयार करून त्यांचा बार्देश, तिसवाडी, पेडणे तसेच इतर भागांतील हॉटेल्स व रेस्टॉरंट्समध्ये पुरवठा केला जात होता.
प्राथमिक तपासात आस्थापनाने उत्पादनासाठी कोणताही परवाना घेतलेला नसल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे एफडीएने मालकावर २० हजार रुपयांचा दंड ठोठावला असून, सर्व दही व दुग्धजन्य पदार्थ जप्त करून ही जागा तत्काळ रिकामी करण्याचे आदेश दिले आहेत.
एफडीएचे अधिकारी म्हणाले, गेल्या काही दिवसांपासून या युनिटवर आमची पाळत होती. शेवटी गावसावाड्यातील युनिटचा ठावठिकाणा लागल्यानंतर छापा टाकला असता, अत्यंत गलिच्छ वातावरणात दही तयार केले जात असल्याचे आढळून आले. त्यामुळे मालकाविरुद्ध दंडात्मक कारवाई करून आस्थापन बंद करण्याचे आदेश दिले आहेत.
युनिटचे चालक चंद्रपाल यांनी सांगितले की, येथे दही तयार केले जाते. तसेच कोल्हापूरहून येणाऱ्या एका डेअरी कंपनीचे दूध, दही व पनीर हॉटेल्स व रेस्टॉरंटना पुरवले जाते. आमच्याकडे वितरणाचा परवाना आहे; मात्र दही तयार करण्याचा परवाना नाही.
ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ
एफडीएच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, या युनिटमध्ये पनीरचा मोठा साठा आढळून आला. याच पनीरच्या साहाय्याने कृत्रिम पद्धतीने दही तयार केले जात असावे, असा संशय त्यांनी व्यक्त केला आहे. युनिटमधून तयार झालेले दही प्लास्टिकच्या कंटेनरमध्ये पॅक करून मोठ्या प्रमाणात पुरवठा होत असल्याने शेकडो ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ झाला असावा, अशीही शक्यता वर्तवण्यात आली.
