सरकारी कर्मचारी नाराज : कार्यालयांच्या स्थलांतराची जबाबदारी खात्याने झटकली

पणजी : पणजीतील धोकादायक जुन्ता हाऊस इमारतीतील सरकारी कार्यालये तत्काळ स्थलांतरित करा, अन्यथा दुर्घटना घडल्यास आम्ही जबाबदार नाही, असा आदेश सर्वसामान्य प्रशासन खात्याने दिला आहे. यामुळे सरकारी कर्मचार्यांत नाराजीचा सूर उमटत आहे. कार्यालये स्थलांतरित करण्याचे काम सर्वसामान्य प्रशासन खात्याचेच आहे. मात्र खात्याकडूनच नोटीस पाठविली गेल्याने कर्मचाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
उत्तर गोवा जिल्हाधिकाऱ्यांनी आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत इमारत खाली करण्याचे आदेश दिले असून तेथील विविध सरकारी कार्यालयांचे स्थलांतर करण्यासाठी नोटीस बजावण्यात आली असूनही काही कार्यालये अजून इमारतीत कार्यरत आहेत. त्यामुळे सर्वसामान्य प्रशासन खात्याकडून जुन्ता हाऊसमध्ये कार्यरत असलेल्या खात्यांना लवकरात लवकर इमारत खाली करण्याचे आदेश दिले आहेत. इमारत धोकादायक असल्याने कोणताही अनर्थ घडल्यास सरकार जबाबदार राहणार नाही, असे या सूचनेतून स्पष्ट सांगण्यात आले आहे. याविषयी जुन्ता हाऊसमध्ये असलेल्या विविध खात्यांच्या कार्यालयांना भेट देऊन चौकशी केली असता, जुन्ता हाऊसमध्ये काम करणार्या सरकारी कर्मचारीवर्गाने सरकारच्या या निर्णयावर नाराजी व्यक्त केली.
कुठलाही कर्मचारी आपला जीव धोक्यात घालून स्वखुशीने या इमारतीत येत नाही. कार्यालये इतर सोयीच्या ठिकाणी स्थलांतरित करण्याचे काम सरकारच्या सर्वसामान्य प्रशासन खात्याचेच आहे. मात्र खात्याकडूनच नोटीस पाठविली जाते, याबद्दल कर्मचाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
इमारतीत सध्या कार्यरत कार्यालये, आस्थापने...
जुन्ता हाऊस इमारतीत सध्या १४ सरकारी कार्यालये आहेत. ग्राऊंड फ्लोअरवर एक हॉटेल, एक मोबाईल विक्री दुकान, दोन गादी विक्री दुकाने तसेच गोवा सहकार भांडार आणि गोवा सहकार भांडाराचे फळभाजी विक्री केंद्र आहे.
जागा मिळत नसल्याने सहकार भांडारचे स्थलांतर रखडले
एका खासगी दुकानाच्या मालकाला विचारले असता त्यांनी सांगितले की, आम्ही लवकरात लवकर आमची दुकाने खाली करणार आहोत. गोवा सहकार भांडाराला पणजीत सोयीनुसार जागा मिळत नसल्याने त्यांचे स्थलांतर लांबणीवर पडले आहे.
विविध कारणांमुळे रखडले स्थलांतर...
१. काही खात्यांची कार्यालये आल्तिनो येतील सरकारी क्वॉर्टर्समध्ये स्थलांतरित करण्यात येणार आहेत, तर काही कार्यालये पणजीतील जुन्या विक्रीकर भवन इमारतीत स्थलांतरित करण्यात येणार आहेत.
२. जुन्या विक्रीकर भवनची इमारत सुस्थितीत नसल्याने यापूर्वीच काही अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी या इमारतीत न जाण्याचा विचार केला होता. तरीही विक्रीकर भवनची (जुनी इमारत) डागडुजी करून तिथे जुन्ता हाऊसमधील चार-पाच कार्यालयांचे स्थलांतर करण्यात येणार आहे.
३. दोन-तीन कार्यालये खासगी इमारतीत स्थलांतरित करण्याचा विचार आहे. काही कार्यालयांचे दुसऱ्या ठिकाणी ऑफिस फर्निचरचे काम चालू असल्याने ते पूर्ण झाल्यानंतर ती कार्यालये स्थलांतरित करण्यात येणार आहेत.