गोवा : एमआरएफ कंपनीचा दुटप्पीपणा उघड

कुडाळच्या नाेकर भरतीचे वृत्त नाकारले, मात्र मनसे पदाधिकाऱ्याला पाठविलेल्या ईमेलमुळे बिंग फुटले

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
12th September, 11:50 pm
गोवा : एमआरएफ कंपनीचा दुटप्पीपणा उघड

पणजी : कुडाळ येथे होणाऱ्या नोकरभरती मेळाव्याची बातमी खोटी असल्याचे एमआरएफ कंपनीने पत्रक काढून जाहीर केले होते. मात्र गदारोळ झाल्यावर कंपनीने हा मेळावा रद्द केल्याचे मनसेचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष धीरज परब यांनी सांगितल्याने एमआरएफ कंपनीचा दुटप्पीपणा समोर आला. याबद्दल प्रचंड नाराजी व्यक्त होत आहे.

दरम्यान, शुक्रवारी फर्मागुडी येथे एमआरएफचा नोकर भरती मेळावा पार पडला.
धीरज परब म्हणाले की, एमआरएफ कंपनीकडून मला एक ईमेल आला आहे, ज्यात त्यांनी कुडाळ येथे होणारा रोजगार मेळावा रद्द झाल्याचे कळवले आहे.

एमआरएफ कंपनीने १२ सप्टेंबर रोजी कुडाळ येथे नोकरभरती मेळाव्याचे आयोजन केल्याची पोस्ट गुरुवारी व्हायरल झाली होती. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष धीरज परब यांच्या पुढाकाराने या मेळाव्याचे आयोजन केले होते. कंपनी २५० प्रशिक्षणार्थींची भरती करणार होती, ज्यामध्ये १७,५०० ते १९,५०० रुपये पगार, राहण्याची आणि जेवणाची सोय, आणि वार्षिक पगारवाढीची सुविधा होती. गोव्यातील कंपनी कुडाळ (महाराष्ट्र) मध्ये भरती मेळावा घेत असल्याबद्दल गोव्यात मोठा गदारोळ झाला. आरजीचे प्रमुख मनोज परब तसेच गोवा फॉरवर्डचे विजय सरदेसाई यांनी कुडाळमध्ये मेळावा घेण्यावर आक्षेप घेतला.

हा गदारोळ झाल्यावर एमआरएफ कंपनीने एक पत्रक जारी केले की, कुडाळमधील मेळाव्याची जाहिरात खोटी आहे. कंपनीने कोणत्याही प्रकारचा नोकरभरती मेळावा कुडाळमध्ये आयोजित केलेला नाही. या दुसऱ्याच दिवशी धीरज परब यांनी कुडाळचा मेळावा रद्द झाल्याची माहिती दिली. कंपनीने त्यांना ईमेलद्वारे हे कळवले असल्याचे त्यांनी सांगितले. यामुळे हे प्रकरण पुन्हा पेटण्याची चिन्हे दिसत आहेत.


खासगी नोकरभरतीवर सरकारची नजर : मुख्यमंत्री

खासगी नोकरभरतीवर सरकारच्या कामगार खात्याचे लक्ष आहे आणि एमआरएफ कंपनीने मेळ्याबाबत स्पष्टीकरण दिले आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले. कंपनीचा रोजगार भरती मेळावा कुडाळ येथे नसून तो गोव्यामध्येच होणार असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे. नोकरभरती मेळावे गोव्यातच व्हावेत आणि गोमंतकीयांना नोकऱ्या मिळाव्या यासाठीच सरकारचे प्रयत्न सुरू आहेत, असेही मुख्यमंत्री म्हणाले

हेही वाचा