आमदार क्रूझ सिल्वा यांचे दक्षिण गोवा पोलीस अधीक्षकांना निवेदन
मडगाव : बिट्स पिलानी कॅम्पसमधील घटनेमुळे शैक्षणिक संस्थांमधील वाढत्या ड्रग्जच्या धोक्यावर आमदार क्रूझ सिल्वा यांनी चिंता व्यक्त केली आहे. त्यांनी दक्षिण गोवा पोलीस अधीक्षक टिकम सिंग वर्मा यांना निवेदन देऊन या प्रकरणात तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे.
आम आदमी पक्षाच्या शिष्टमंडळाने पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन त्यांना सांगितले की, बिट्स पिलानी कॅम्पसमध्ये वर्षभरात पाच विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी अलीकडेच मृत पावलेल्या ऋषी नायरच्या वैद्यकीय अहवालात त्याच्या शरीरात ड्रग्जचे अंश आढळले. ही गंभीर परिस्थिती शैक्षणिक संस्था आणि त्यांच्या आजूबाजूला अमली पदार्थांचा अनियंत्रित प्रसार झाल्याचे दर्शवते.
या पार्श्वभूमीवर, आमदार सिल्वा यांनी शैक्षणिक संस्थांजवळील ड्रग्ज पुरवठादारांना शोधून त्यांच्यावर कारवाई करण्याची, तसेच विद्यार्थ्यांची गर्दी असलेल्या ठिकाणी तपासणी वाढवण्याची मागणी केली आहे. त्यांनी पोलिसांसाठी ड्रग्जविषयी माहिती देणारी व्यवस्था निर्माण करण्याची सूचनाही केली.
यावर बोलताना पोलीस अधीक्षक टिकम सिंग वर्मा यांनी दक्षिण गोव्यातील अंमली पदार्थ विरोधी मोहीम अधिक तीव्र करण्याचे आश्वासन दिले. विद्यार्थ्यांपर्यंत अमली पदार्थ पोहोचणार नाहीत, याची दक्षता घेतली जाईल, असे सांगत शाळा आणि महाविद्यालयांच्या आजूबाजूच्या परिसराचीही तपासणी केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.